भाषेमध्ये करिअर
भाषेमध्ये व्यवसायाच्या संधी
भाषा ... संवादाचे एक माध्यम ... माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारे एक प्रमुख लक्षण ... याच भाषेत कारकीर्दच्याही अनेक संधी उपलब्ध आहेत . त्यात शिक्षकी पेशा किंवा संशोधन असे काही ठळक मार्ग असतात . पण त्यापेक्षा वेगळे मार्ग अनेकांना माहितीच नसतात . त्यामुळे भाषेला स्कोप नसल्याची ओरड सुरू होते .
भाषेतील संधी
भाषेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द मनी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी आहेत .' भाषेच्या विद्यार्थ्यांना कारकीर्दसाठी ' स्कोप ' नाही , असे म्हणणे चुकीचे आहे . आजच्या काळामध्ये भाषांतराला मोठी मागणी आहे . त्यासोबतच आपल्याकडे अनेक ठिकाणी ' अप्लाइड लॅंग्वेजेस ' किंवा व्यावहारिक भाषांचे अभ्यासक्रम चालवले जातात . या अभ्यासक्रमांमधून त्या - त्या क्षेत्राशी निगडित विशिष्ट भाषाशैलीचे प्रशिक्षण दिले जाते . त्या आधारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात . भाषेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने निर्माण होत असलेल्या टेक्नॉलॉजीविषयीची माहिती त्या - त्या भाषेमध्ये भाषांतरित करून देण्यासाठी , जाहिरात क्षेत्रामध्ये , वेब डिझायनिंगच्या क्षेत्रात , माध्यमांच्या क्षेत्रामध्ये , बीपीओ , टेक्निकल रायटिंग आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत . आपल्याकडे कायमच नावाजल्या जाणाऱ्या सूत्रसंचालनाच्या क्षेत्रामध्येही भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना चांगला वाव आहे . त्यासोबतच पब्लिकेशन हाऊसेसमध्ये क्रिएटिव्ह रायटिंग , स्क्रिप्ट रायटिंग यांसारख्या अनोख्या क्षेत्रांमध्येही भाषेचे विद्यार्थी पाय रोवून उभे राहू शकतात.
भाषेसाठी कारकीर्द पर्याय -
भाषा संशोधन,भाषांचा तौलनिक अभ्यास आणि भाषांतर,प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया,प्रकाशन संस्थांमध्ये प्रूफ रीडर , लेखक , उपसंपादक म्हणून संधी,व्यावहारिक भाषांच्या आधारे कोर्टाच्या कामकाजासाठी मदत,टेक्निकल रायटिंग,जाहिरात लेखन,वेब डिझायनिंगसाठी मजकूर तयार करणे,बीपीओ आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री,सूत्रसंचालन,स्क्रिप्ट रायटिंग