भाषाविषयक नियतकालिके
नियतकालिक युग
आधुनिक काळाने जी अनेक आयुधे माणसाला मिळाली, त्यात मुद्रणाचा शोध हे खूपच महत्त्वाचे साधन होते. या एका शोधामुळे जग बदलून गेले. शिक्षण आणि ज्ञान यांचे सार्वत्रिकीकरण यामुळेच शक्य झाले. माणसा-माणसांतील संपर्क वाढवून अंतर कमी करण्याचे मोठेच काम या शोधामुळे घडले. त्यामुळेच वृत्तपत्रे-नियतकालिके-ग्रंथ प्रकाशित होऊ शकले. ज्ञानाची गंगा प्रवाही झाली.
मराठी साहित्यात तर १८१८ ते १८७४ या कालखंडाला नियतकालिक युग असेही म्हणले जाते. कारण या कालखंडात मोठ्या प्रमाणावर नियतकालिके निर्माण झाली. विविध विषयांना स्पर्श झाला. ज्ञानसंग्रह आणि ज्ञानप्रसार ही या युगाची प्रेरणा होती.
नियतकालिकांचा इतिहास
इ.स. १८३२मध्ये 'दर्पण' या नियतकालिकाचा पहिला अंक ६ जानेवारी रोजी प्रकाशित झाला, ही मराठी साहित्यविश्वातील महत्त्वाची घटना म्हणता येते. बाळशास्त्री जांभेकर यांनी सलग १४ वर्षे ह्या नियतकालिकाचे प्रकाशन केले. पुढे ‘दर्पण’, ‘दिग्दर्शन’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘विविधज्ञानविस्तार’, ‘ज्ञानोदय’ ही नियतकालिकेही सुरू झाली. एतद्देशीयांचं अज्ञान संपवणे, शास्त्रीय विषयांचे ज्ञान वाढवणे, धर्मरक्षण करणे, धर्मप्रचार करणे, कायदेविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, जुनी मराठी कविता प्रकाशित करणे, समकालीन घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवणे, असे हेतू या प्रकाशनांमागे स्पष्टपणे जाणवतात.
मासिके
नियतकालिकांच्या प्रेरणेतूनच मासिकांना आकार प्राप्त होत गेला. मासिकांचं स्वरूप नियतकालिकांपेक्षा वेगळं होतं. मासिकांत बातम्यांना स्थान नव्हतं. त्यांचा सर्वस्वी भर लेखांवर होता. मोठ्या लेखांना क्रमशः प्रसिद्धी मिळत असे. अधूनमधून ललित वाङ्मयालाही स्थान दिले जाई. 'ज्ञानप्रसारक'मध्ये 'विक्रमोर्वशीय' नाटकाचं भाषांतर किंवा 'जिपोलीची गोष्ट'सारखी दीर्घकथा बघण्यास मिळते. रूढार्थाने 'दिग्दर्शन' हे पहिले मासिक. सर्व विषयांचा संग्रह' याच उद्दिष्टानं हे मासिक चालवले गेले. 'ज्ञानोदय'ने ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चालवले होतं. त्याला प्रतिकार म्हणून 'उपदेशचंद्रिका' हे मासिक सुरू झाले. 'दंभहारक' हे मासिकही वैशिष्ट्यपूर्ण होतं, कारण लेखनशुद्धतेवर यात भर दिला जाई.
मराठीतील विविध नियतकालिके
पुढे 'मराठी ज्ञानप्रसारक', 'विविधज्ञानविस्तार' वगैरे नियतकालिके सुरू झाली. या मालिकेत डोकावून पाहिले तर; पुणे पाठशालापत्रक, निबंधमाला, दंभहारक, निबंधचंद्रिका, मासिक मनोरंजन, केरळकोकीळ, काव्यरत्नावली, रंगभूमी, चित्रमयजगत, लोकशिक्षण, रत्नाकर, यशवंत, किर्लोस्कर, नवयुग, वागीश्वरी, प्रगती, प्रतिभा, हंस, विहंगम, सत्यकथा, मनोहर, सह्याद्री, ज्योत्स्ना, पारिजात, वाङ्मयशोभा, वसंत, दीपावली, समीक्षक, अभिरुची, युगवाणी, साहित्य-प्रतिष्ठान, छंद, अनुष्टुभ इत्यादी इत्यादी नियतकालिके डोळ्यांपुढे येतात. याशिवाय संशोधनपर आणि समीक्षात्मक लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य पत्रिका, मुंबई मराठी संशोधनपत्रिका, आलोचना इत्यादी वेगळी नियतकालिके आहेतच. करमणूक, हिंदुपंच, मौज ही साप्ताहिके वेगळीच चूल मांडणारी होती. अशा तऱ्हेने ही परंपरा सतत वृद्धिंगत होत आहे.
महाराष्ट्राबाहेरील प्रान्तामधूनही मराठी नियतकालिके प्रकाशित केली जात आहेत. त्यामध्ये १९५० पासून प्रकाशित होणाऱ्या संजीवन या त्रैमासिकाचा आणि १९७६ सालपासून प्रकाशित होत असलेल्या अभीप्सा या मासिकाचा उल्लेख करावा लागेल. ही दोन्ही नियतकालिके पाँडिचेरी येथून नियमितपणे प्रकाशित केली जातात.
मराठी अभ्यास परिषद स्थापना आणि ‘भाषा आणि जीवन’ चा प्रारंभ
मराठी राजभाषा वर्ष म्हणून, इ. स. १९७९ हे वर्ष महाराष्ट्र शासनाने घोषित केले. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक अभ्यासक्रमात आणि प्रशासनात मराठी भाषेचे स्थान या विषयावर एक परिषद बोलावली. त्यामध्ये, एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचे एक सदस्य म्हणून अशोक केळकर यांनी काम केले. या समितीने ‘राज्य मराठी विकास संस्था’ स्थापन करावी, असे सरकारला सुचवले. मात्र नंतर राष्ट्रपती राजवट आल्यामुळे ते सरकारच बरखास्त केले गेले. या संस्थेचा आराखडा, लेखरूपाने, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या १८ मे, १९८० च्या अंकात अशोक केळकर यांनी प्रसिद्ध केला. तो वाचून, प्रा. प्र. ना. परांजपे आणि मॅक्सिन बर्नसन यांनी अशोक केळकर यांची भेट घेऊन, जर शासन अशी संस्था स्थापन करत नसेल, तर आपणच अशी संस्था स्थापन करावी, अशी कल्पना मांडली. त्यानुसार १९८२ मध्ये, ‘भाषेचे समग्र अध्ययन’ हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्र. ना. परांजपे, डॉ. अशोक केळकर, मॅक्सिन बर्नसन इत्यादी समविचारी मंडळी एकत्र आली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘मराठी अभ्यास परिषद’ या संस्थेचा आणि त्या संस्थेने १९८३ मध्ये सुरू केलेल्या ‘मराठी अभ्यास परिषद पत्रिका - भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाचा मराठी वाङ्मयाच्या इतिहासात विशेष विचार केला पाहिजे.
महाराष्ट्राच्या प्रकृतीला अनुसरून; महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, यांसारख्या अनेक साहित्यसंस्था स्थापन झाल्या. त्यांनी अनुक्रमे ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, ‘प्रतिष्ठान’ आणि ‘युगवाणी’ सारखी नियतकालिक-मुखपत्रेही सुरू केली आणि जी आजही नियमितपणे प्रकाशित केली जातात. याच श्रेणीमध्ये बसणारे ‘भाषा आणि जीवन’ हे मराठी अभ्यास परिषदेचे मुखपत्र असणारे नियतकालिक, सलग ३५ वर्षे निरपवादपणे नियमित प्रकाशित झाले आहे. सद्यस्थितीत, कोणतेही शासकीय/निमशासकीय पाठबळ लाभलेली आर्थिक संस्था पाठीशी नसताना, एवढ्या सातत्याने चालणारे कोणतेही अन्य नियतकालिक दिसत नाही. त्यामुळेच ‘मराठी अभ्यास परिषद’ या संस्थेचे हे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
मराठी अभ्यास परिषद - उद्दिष्टे
- मराठी भाषेची अभिवृद्धी करणे,
- त्यासाठी पायाशुद्ध सैद्धांतिक बैठक तयार व्हावी आणि व्यावहारिक पातळीवर अभ्यास व संशोधन व्हावे यासाठी प्रयत्न करणे
- आणि निरनिराळ्या क्षेत्रात मराठीचा वापर वाढावा, परिणामकारक व्हावा, यासाठी प्रयत्न करणे. [१]
मराठी अभ्यास परिषद - उपाययोजना
या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी; मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन यात सुधारणा करणे, मराठी भाषकांनी इतर भाषा शिकून आपली भाषिक क्षमता आणि अनुभवाचा आवाका वाढवणे, इतर भाषकांना मराठी भाषा शिकवण्याची सोय करणे, भाषिक प्रश्न आणि भाषाव्यवहाराची सुधारणा यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टीने आणि नियोजनशील वृत्तीने पाहण्यास शिकणे, लोकजागृती करणे आणि सरकार, विद्यापीठे यांचे भाषाविषयक प्रश्नांकडे लक्ष वेधणे, या उपायांची चर्चाही परिषद सभासदांनी केलेली आहे.
यासाठी व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद यांचे आयोजन करणे, त्रैमासिक चालवणे, पुस्तिका प्रकाशित करणे, भाषांचे वर्ग चालवणे, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन करणे, भाषिक संशोधन करणे, भाषांतराला चालना देणे इत्यादी मार्गांचाही विचार झालेला दिसतो.
आपल्या या उद्दिष्टांच्या आधारे, विविध कार्यक्रमांचे आयोजनही आजपर्यंत सातत्याने होत आले असल्याचे आपल्याला दिसते.
भाषा आणि जीवन
भाषेला वाहिलेले मराठीतील पहिले नियतकालिक म्हणून 'भाषा आणि जीवन'चा उल्लेख केला पाहिजे.
‘भाषा आणि जीवन’चे अंतरंग
१. संपादकीय – एक विषय घेऊन लिहिली जाणारी संपादकीये, हे ‘भाषा आणि जीवन’चे खास वैशिष्ट्य. पूर्वकालीन किंवा समकालीन नियतकालिकांप्रमाणे उगाचच अंतरंगाची ओळख करून देणारी संपादकीये, यात आलेली नाहीत. त्यामुळे संपादकीयांतूनदेखील भाषिक चर्चा घडलेली दिसते. कधी विशिष्ट विषयाला धरून तर कधी एखादा तात्त्विक प्रश्न समोर ठेवून, ही संपादकीये लिहिली गेली आहेत.
२. अनुवाद / भाषांतर – भाषांतरित कथा, कविता, लेख आणि तात्त्विक चर्चा यांचा समावेश ‘भाषा आणि जीवन’मध्ये नियमितपणे झाला. मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी, हा मुख्य प्रयत्न असल्याने विविध भाषांतील दर्जेदार कथा – कविता – लेख इत्यादींचे मराठी भाषांतर प्रकाशित झाले आहे. हे अनुवाद प्रामुख्याने हिंदी, जर्मन, फ्रेंच, रशियन या भाषांतले अधिक आहेत, असे दिसते.
३. शब्दायन – एखाद्या शब्दाचा उगम कसा झाला, त्या शब्दात बदल कसा घडला, त्या शब्दाची व्युत्पत्ती काय, असे विविध प्रश्न आपल्याला सतावत असतात. अभ्यासक अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना क्वचित हैराणही होतात. पण जेव्हा नेमके उत्तर गवसते, तेव्हा त्या अभ्यासकाला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते. शब्दाचा असा शोध घेणारे हे सदर बऱ्याच अंकात प्रकाशित झाले आहे आणि लोकप्रियही ठरले आहे.
४. भाषानिरीक्षण – वास्तविक पाहता ‘ज्याची त्याची प्रचीती’ हे सदर आणि ‘भाषानिरीक्षण’ हे सदर यांमध्ये येणाऱ्या विषयांमध्ये साधर्म्य आहे. त्यातील विषयही सारखे आहेत. पण ही दोन वेगवेगळी सदरे का चालवली गेली? असाच प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात, ‘भाषानिरीक्षण’ या सदरात, अभ्यासकांनी मांडलेली निरीक्षणे आणि ‘ज्याची त्याची प्रचीती’ मध्ये सामान्य वाचकाने मांडलेली निरीक्षणे, असा फरक असल्याचा अंदाज बांधता येतो.
५. ज्याची त्याची प्रचीती – वाचकांपैकी अनेकांना लेखक बनवण्याचे काम या सदराने केलेले दिसते. आसपासच्या परिसरात जाणवणाऱ्या, घरात अनुभवास येणाऱ्या भाषिक घटनांना, या सदरात स्थान मिळालेले दिसते. या सदरामुळे समाजभाषाविज्ञान या विषयातली अनेक उदाहरणे मिळालेली दिसतात. लहान मुलांची भाषा, बायकांची भाषा, डॉक्टरांची भाषा यांसारख्या लेखांचा यासाठी विशेष उल्लेख करता येईल.
६. दखलपात्र / दखलयोग्य - ‘भाषा आणि जीवन’च्या संपादक मंडळाने चौकस वृत्तीने आजूबाजूला लक्ष ठेवले आहे. समकालीन नियतकालिकांत प्रकाशित होणाऱ्या, अनेक चांगल्या लेखांना, त्या लेखांतील महत्त्वाच्या भागाला ‘भाषा आणि जीवन’मध्ये, प्रस्तुत सदरात पुन्हा प्रकाशित केलेले दिसते. यामुळे भाषा या विषयाला स्पर्श करणारे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेले विविधांगी लेख वाचायला देणारे, एकमेव नियतकालिक म्हणून ‘भाषा आणि जीवन’ ओळखले जाऊ लागले.
७. पानपूरके – अतिशय सूचक आणि सुरेख भाषाविषयक पानपूरके ‘भाषा आणि जीवन’मध्ये आलेली दिसतात. वास्तविक या पानपूरकांचेच एक स्वतंत्र पुस्तक बनवायला हवे, ज्यामुळे अनौपचारिकपणे भाषाशिक्षण करण्याचा मार्ग तयार होऊ शकेल.
८. पुनर्भेट – अनेक चांगले लेख, पुस्तकात रुपांतरित न झाल्याने किंवा दुर्मिळ पुस्तकांत समाविष्ट असल्याने, वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या लेखांतील विचारांपासून वाचक/अभ्यासक वंचित राहतो, हे ओळखून संपादक मंडळाने हे सदर चालवलेले दिसते. या सदरामुळे, भूतकाळातील अनेक चांगले लेख योग्य त्या संपादकीय टिप्पणीसह वाचकांना आणि अभ्यासकांना वाचायला मिळतात. त्या निमित्ताने, वर्तमानातील अनेक विषयांना पूरक असे संदर्भ मिळण्यास मदत होते.
९. पुस्तक परीक्षणे – परीक्षण करण्यासाठी विविध पुस्तके ‘भाषा आणि जीवन’च्या संपादक मंडळाकडे येत असतात. त्यापैकी भाषिकदृष्ट्या महत्त्वाच्या निवडक पुस्तकांची परीक्षणे प्रसिद्ध करून ‘भाषा आणि जीवन’ने आपल्या अंकाचे वेगळेपण तर जपलेच, पण त्याचबरोबर भाषिक जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पाहा – परिशिष्ट २
१०. कविता – भाषिक नियतकालिकात कविता नसाव्यात, असा समज होणे स्वाभाविक आहे. पण अनेक कवींनी केलेल्या भाष्याची, भाषिक प्रयोगांची दखल ‘भाषा आणि जीवन’ने घेतली आहे. त्यामुळेच अनेक कवितांनाही स्थान मिळालेले आहे. कधीकधी एखाद्या लेखाला पूरक अशा कविता समाविष्ट करण्याचे कसबही संपादक मंडळाने दाखवले आहे. उदा. ‘एकूण सर्वनामे चार’ ही कृ. ब. निकुंब यांची, वाचकाला क्षणभर रेंगाळायला लावणारी कविता; सर्वनामांच्या समाजशास्त्रासारख्या लेखाला (वर्ष २: अंक २ / उन्हाळा १९८४, पृ. २६-२७) पूरक तर ठरतेच पण त्या सर्वनामांच्या लेखावर भाष्यही करते.
११. जाता जाता – सर्वांच्याच नजरेला सहज पडणाऱ्या, भाषिक घटना एखाद्याच लेखकाला लिहावयास उद्युक्त करतात. अशा भावलेल्या भाषिक घडामोडी चित्रित करणारे सदर म्हणून, ‘जाता जाता’ ओळखले जाते.
१२. भाषावार्ता – आजूबाजूला घडणाऱ्या भाषिक घडामोडी, कार्यक्रम यांविषयी ‘भाषा आणि जीवन’च्या वाचकांना माहिती देण्याच्या हेतूने हे सदर चालवले जाते. आपल्या नियतकालिकातून, फक्त आपल्याच बातम्या देण्याची संकुचित वृत्ती सभोवार दिसत असताना ‘भाषा आणि जीवन’ने दाखवलेली ही व्यापक भूमिका उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे. त्यामुळेच ‘समाजात भाषिक जागृती करणे’ या संस्थेच्या ध्येयाचीही पूर्तता झाल्याचे दिसते.
१३. परिषद वार्ता – मराठी अभ्यास परिषदेने आयोजित केलेले कार्यक्रम, चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद इत्यादीच्या प्रसिद्धीचे हे सदर देखील भाषिक हालचालींना गती देणारे आहे. भाषिक जागृती करणे, मराठी ज्ञानभाषा करणे इत्यादी ध्येय बाळगणारी संस्था नेमके काय उपक्रम करते, हे सर्व आजीव सभासदांना आणि वाचकांना कळावे हा हेतू या सदरामागे आहे. ‘भाषा आणि जीवन’ हे मराठी अभ्यास परिषदेचे मुखपत्र असल्याने, अशी वृत्ते प्रकाशित होणे, अभिप्रेत आहेच. पण त्याचबरोबर या सदराची नियमितता ही संस्था उपक्रमशील आहे आणि सतत कार्यरत आहे, हेसुद्धा सिद्ध करते.
१४. भाषाविचार – या सदरात, भाषिक विचार मांडण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. अर्थात हे सदर तसे अनियमितच आहे. विविध लेखकांनी मांडलेले भाषिक सिद्धान्त, या सदरात समाविष्ट झालेले दिसतात. म्हणजेच भाषेच्या जाणकारांनी आणि अभ्यासकांनी केलेला अभ्यासच यातून दिसतो.
१५. मुखपृष्ठे – प्रारंभापासूनच अनिल अवचट यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखक आणि चित्रकाराने काढलेल्या चित्रांनी – मुख्यतः मोराच्या चित्रांनी ‘भाषा आणि जीवन’चे अंक सजलेले दिसतात. पुढे तर मराठी अभ्यास परिषदेचे बोधचिन्हच अवचटांनी रेखाटलेला मोर हेच ठरले. मात्र नंतर या मुखपृष्ठांवर बरेचसे प्रयोग झालेले दिसतात. एकरंगी, दुरंगी आणि चाररंगी मुखपृष्ठे, कधी एखादा कवी, त्याच्या विशिष्ट काव्यपंक्ती तर कधी भाषिक चमत्कृतींनी मुखपृष्ठ सजलेले दिसते. या विविधतेमुळे ‘भाषा आणि जीवन’ने मुखपृष्ठातही नावीन्य जपण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे दिसते.
१६. सूची – एक अभ्यासपूर्ण नियतकालिक असा लौकिक ‘भाषा आणि जीवन’ने निर्माण केला आणि तो कायम जपला. याचाच एक भाग म्हणजे साधारणतः दरवर्षीच्या पहिल्या – हिवाळा अंकात प्रसिद्ध होणारी मराठीतील भाषाविषयक लेखन सूची आणि ‘भाषा आणि जीवन’मधील लेखसूची. या दोनही सूची नियमितपणे प्रसिद्ध होत असल्याने अभ्यासकाला आपल्या अभ्यासासाठी आवश्यक असणारे संदर्भ सहजतेने मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ‘भाषा आणि जीवन’च्या बरोबरीने प्रसिद्ध होणाऱ्या, अन्य कोणत्याही नियतकालिकाने सातत्याने असा प्रयोग केलेला दिसत नाही.
१७. शंका आणि समाधान – वाचकांनी विचारलेल्या भाषिक शंका आणि त्यांना साक्षेपी वाचकांनी किंवा संपादकांनी दिलेली समाधानकारक उत्तरे यांचा समावेश असणारे, हे सदर नियमितपणे प्रसिद्ध होत आहे. या सदरामुळे भाषाविषयक अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, आपल्या ज्ञानात भर पडली, अशी प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आपल्यालाही ही उत्तरे देताना समाधान मिळाले, असा अभिप्राय लेखकांनी दिला आहे.
१८. सहज – एखादा भाषिक विषय सर्वांसमोर सहजतेने मांडण्यासाठी हे सदर सुरू झाले असावे.
१९. साद आणि प्रतिसाद – एखाद्या भाषिक घटनेवर लेखकाकडून केले गेलेले भाष्य आवडले, नावडले, त्यात थोडी भर घालावीशी वाटली किंवा त्या अनुषंगाने समांतर उदाहरणे सर्वांच्या नजरेस आणून द्यावीशी वाटली तर ... अशा जागरूक वाचकांसाठी साद आणि प्रतिसाद हे सदर उत्तम माध्यम ठरते. या सदरामुळे हे नियतकालिक जिवंत ठरले. संपादक, लेखक आणि वाचकांमध्ये एक बंध निर्माण झाला. वाचकाला, आपल्या मनातील भावभावना, शंका योग्य व्यक्तींपर्यंत एकाच वेळेस पोहोचवण्याचे साधन मिळाले.
२०. अहवाल – विविध चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने यांचे आयोजन मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने केले जाते आणि त्यांचा सविस्तर वृत्तान्त पुढील अंकात मुख्यत: परिषद वार्ता या नावाने किंवा अहवाल या नावाने छापला जातो. या कार्यक्रमांत झालेली विस्तृत भाषणेही लेखरूपाने प्रसिद्ध झाल्याने, समकालीन भाषिक दस्तऐवज, असे या नियतकालिकाचे स्वरूप बनण्यास मदत झाली आहे.
'भाषा आणि जीवन'ची यशस्विता
सुमारे २०हून अधिक सदरे नियमितपणे प्रसिद्ध करून भाषेचा सर्वांगीण अभ्यास, हे आपले ध्येय साध्य करण्यात ‘भाषा आणि जीवन’ला निश्चितच यश मिळाले आहे. अनेक वाचकांना लिहिते करणे, समाजात भाषिक जागरूकता निर्माण करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे अवघड कार्य, हे नियतकालिक करते आहे.
संदर्भ
- ^ वर्ष १, अंक १ (जुलै १९८३) मधील परिषद-वार्ता सदर (पृ. ३२)