भावनिक बुद्धिमत्ता
स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वतःची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. Emotions हा शब्द Emover या मूळ लॅटीन शब्दापासून व्युत्पन्न झाला असून Emover म्हणजे to stir किंवा to move म्हणजे ‘ढवळणे’ किंवा ‘हलविणे’ असा होय. मनामध्ये कालवाकालव होणे, मन अस्थिर राहणे या बाबी भावनेमध्ये येतात. मानवी मेंदू व भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो आणि भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो.
सर्वप्रथम चार्ल्स रॉबर्ट डार्विन या विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेबाबत आपले विचार मांडले आहेत. भावनिक रित्या व्यक्त होणे हे तग धरून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणतात. भावनिक बुद्धिमत्ता हा संशोधनात्मक व अभ्यासात्मक दृष्टीने नवीन विषय असून त्याचे मूळ डार्विन यांच्या सिद्धांतांमध्ये दिसून येते. त्यांच्या नंतर अनेक विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आपले विचार मांडले आहेत. त्यामध्ये पीटर सॅलोव्हे आणि जॅक मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा वापर केला. त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय, असे आपले मत व्यक्त केले. डॅनिअल गोलमन यांच्या मते, ‘स्वतःच्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात‘. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. एकूणच कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची, घडलेल्या व केलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची, एखाद्या घटनेतून बोध घेण्याची, इतरांचे मत समजून घेण्याची, व्यक्तींना पारखण्याची, भावना समजून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.
भावनिक बुद्धिमत्तेचे घटक
भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वा व्यक्तींमध्ये भावनिक दृष्ट्या स्थैर्य (इमोशनल सटॅबिलिटी) आणि भावनिक परिपक्वता (इमोशनल मॅच्युरिटी) हे दोन घटक अप्रत्यक्ष कार्यरत असतात. यांव्यतिरिक्त भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख पाच घटक आहेत.
- आत्मप्रचिती (सेल्फ अव्हेरनेस) : यामध्ये स्वतःच्या भावना जाणणे, स्वतःची अभिरुची, मर्यादा, बलस्थाने यांची जाणीव असणे, आपले निर्णय घेण्यासाठी भावनांमधील प्राधान्यतेचा वापर करणे, स्वतःच्या क्षमतांचे वास्तव व यथायोग्य मूल्यमापन करणे, ठाम आत्मविश्वास असणे इत्यादी आत्मप्रचिती या घटकात येतात. या घटकामध्ये भावनांची जाणीव किंवा ओळख, अचूक आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास हे तीन उपघटकही येतात.
- आत्मनियमन (सेल्फ रेग्युलेशन) : यामध्ये स्वतःच्या विद्रोही, विघातक भावनांवर नियंत्रण ठेवणे, सुयोग्य पद्धतीने भावनांची हाताळणी करणे, नैराश्यातून व्यवस्थितपणे बाहेर पडणे, कोणताही निर्णय सद्सद्विवेकबुद्धिने घेणे, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणे इत्यादी बाबी आत्मनियमन या घटकात येतात. या घटकामध्ये आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, जबाबदारीची जाणीव, अनुकूलन क्षमता आणि नवोपक्रमशीलता या पाच उपघटकांचाही अंतर्भाव होतो.
- प्रेरणा (मोटिव्हेशन) : यामध्ये आपल्या जीवनाची ध्येये ठरविणे, ध्येयांचा प्राधान्यक्रम ठरविणे, उच्च ध्येये गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, मनोबल टिकविणे, निराशा, निरुत्साहावर मात करणे, अनुकूल गोष्टींवर भर देणे म्हणजेच आशावादी राहणे इत्यादी बाबींचा अंर्तभाव होतो. यात संपादन उर्जा, बांधिलकी आणि पुढाकार व पर्याप्तता या तीन उपघटकांचा समावेश होतो.
- समानानुभुती (इम्पॅथी) : यामध्ये इतरांच्या भावना, संवेदना समजून घेणे, त्याबद्दल जाणीव असणे, एखाद्या प्रसंगाकडे इतरांच्या दृष्टीने पाहता येणे किंवा त्या दृष्टीने विचार करता येणे, समाजातील विविध प्रकारच्या भिन्नतेची जाणीव होणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या घटकात इतरांचे आकलन, सेवाभावाचा उद्गम, वैविध्याचा समतोल, इतरांचा विकास आणि राजकीय भान ही पाच उपघटक आहेत.
- सामाजिक कौशल्ये (सोशल स्किल) :यामध्ये घटकांतर्गत निकोप व निरोगी जीवनासाठीचा सर्व कौशल्यांचा समावेष होतो. उदा., समाजातील विविध प्रसंग, घटना यांची अचूकपणे जाणीव, नातेवाईक व समाजातील अन्य व्यक्तींबरोबर सुरळीत संबंध, परिणामकारकतेने संप्रेषण, मन वळविण्याची तंत्रे, श्रवणकौशल्य, नेतृत्त्व, वादविवाद, सहकार्य, सांघिक कार्य इत्यादींचा समावेष होतो. यात प्रभाव, संघर्ष व्यवस्थापन, नेतृत्त्व, समाज परिवर्तनाचा उत्प्रेरक आणि संप्रेषण ही पाच उपघटक आहेत.