Jump to content

भाला (वृत्तपत्र)

भाला या पत्राची निर्मिती भास्कर बळवंत, लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत या भोपटकर बंधूंनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. याचा पहिला अंक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक ०५ एप्रिल १९०५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.. भाला हे पत्र आपल्या वेगळ्या लेखनशैलीमुळे सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध होते.[]

इतिहास

पुण्यात १९ व्या शतकात ‘केसरी’ आणि ‘काळ’ ही वृत्तपत्रे चालू होती आणि त्यांची लोकप्रियताहि वाढलेली होती. ‘काळा’तील स्फूर्तिदायक लेखांनी तरुण वर्ग भारला होता. व तो ‘केसरी’लाही तो मागे टाकेल अशी वेळ आली होती. हरिभाऊ आपट्यांचे ‘करमणूक’ हे वृत्तपत्रही पुण्यात चांगले चालू होते. आणि त्याबरोबरीनेच जुन्या ‘ज्ञानप्रकाश’चा जोमहि कमी झालेला नव्हता. पुण्यामध्ये अशी जोमात असलेली पत्रे चालू असताना ‘भाला’ हे पत्र काढण्याचे धाडस दाखवून आपल्या स्वतंत्र विचारांनी नवे स्थान मिळवून देण्याचे काम भास्कर बळवंत भोपटकर यांनी करून दाखविले. . त्या काळातील विचार केला तर, ‘भाला’ पत्र आणि ‘भाला’कार म्हणून प्रसिद्ध झालेले भा.ब. भोपटकर यांचेही स्मरण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

पहिला अंक

भोपटकर बंधूंची स्वतःची स्वतंत्र अशी मते होती व ती लोकांना पटवून देण्यासाठी त्यांना गरज वाटत होती. म्हणूनच त्या विचारातून त्यांनी ‘भाला’ हे पत्र काढण्याचा निर्णय घेतला. व पहिला अंक हा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध करण्यात आला.

पहिले संपादक मंडळ

‘भाला’ हे पत्र जेव्हा पहिल्यांदा निघाले तेव्हा भास्कर बळवंत, लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत हे तीनही भोपटकर बंधू त्यात सहभागी होते. पण दिनकर बळवंत काही कालावधीतच निधन पावले. ल. ब. उर्फ अण्णासाहेब भोपटकर काही काळ ‘भाला’ पत्राशी संबधित राहिले. भास्कर बळवंत हे तुरुंगात गेल्यानंतर ल. ब. तथा अण्णासाहेबांनी ते पत्र चालविण्याची जबाबदारी घेतली. पण पुढे त्यांच्यात मतभेद झाल्यामुळे तेही यातून बाजूला झाले. त्यामुळे शेवटी ‘भाला’ पत्र भास्कर बळवंत उर्फ भाऊसाहेब भोपटकर हे एकटेच चालवू लागले. खूप काळ एकट्यानेच लेखन करून त्यांनी हे पत्र चालविले, यामुळेच ‘भाला’कार हे बिरुद त्यांच्या नावाला कायमचे चिकटले गेले.

स्वरूप

‘भाला’ पत्राचे स्वरूप राजकीय असले तरी ‘भाला’ काराच्या जीवनात हिंदू धर्माच्या अभिमानाला राजकारणापेक्षाही अधिक महत्त्व होते. त्याचा त्यांनी स्वतःहि उल्लेख केलेला होता. त्यापुढे जाऊन आपण २५ टक्के सुधारक असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘भाला’ पत्र महिन्यातून तीन वेळा दर दहा दिवसांनी प्रसिद्ध होणारे पत्र होते.

संदर्भ

  1. ^ लेले, रा. के. (तृतीय आवृत्ती : २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टीनेन्टल प्रकाशन. pp. ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)