भार्गवराम भिकाजी आचरेकर
भार्गवराम आचरेकर ( आचरे, १० जुलै, १९१०; - पुणे, २७ मार्च, १९९७) ऊर्फ मामा आचरेकर हे एक संगीत नाटकांमध्ये काम करणारे मराठी गायक अभिनेते होते. ते स्त्री-भूमिकाही करीत.
भार्गवराम आचरेकरांचा जन्म आचरे गावात झाला. त्यांचे आईवडील लहानपणीच वारले. थोरले बंधू अवधूत आचरेकर यांनी त्यांचा सांभाळ केला. अवधूत आचरेकर यांच्याकडे आईपासूनच चालत आलेला संगीताचा वारसा होता. त्यांनीच भार्गवरामांना संगीताचे धडे दिले.
अभिनयाची सुरुवात
त्याकाळे आचरे देऊळवाडीची ‘श्री देव रामेश्वर प्रासादिक नाटयमंडळ’ नावाची कंपनी अनेक दर्जेदार संगीत नाटके सादर करी. एकदा या नाटयमंडळाने ‘शारदा’ नाटकाचा देखणा प्रयोग सादर केला. त्या नाटकात छोटया भार्गवला ‘वल्लरीची’ भूमिका मिळाली, त्यात त्यांचे काम एवढे अप्रतिम झाले की, त्याचा बोलबाला चक्क मालवण तालुक्यापर्यंत गेला.
ललितकलादर्शमध्ये प्रवेश
मालवणमध्ये एकदा ‘ललित कलादर्श’ या नाटक कंपनीचा मुक्काम होता. कै. बापूसाहेब पेंढारकर (भालचंद्र पेंढारकर यांचे वडील) आचरे येथे आले. त्यांनी छोटया भार्गवचे गाणे ऐकले. आणि त्याला त्वरित आपल्या नाटयसंस्थेत घेतले.
अभिनय कारकिर्दीची भरभराट
ललितकलादर्शमधील १९२४ ते १९३६ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाटयजीवनाची चढती कमान ठरली.
संगीत शिक्षण
ललितकलादर्श या नाटक कंपनीत असतानाच भार्गवरामांसाठी पंडित पणशीकर बुवा, विष्णूपंत पागनीस, कागलकर बुवा, रामकृष्ण वझेबुवा यांच्या खास तालमी ठेवल्या होत्या. त्यामुळे मामांचे गाणे बहरले.
एकदा, ललित कला दर्शचा मुक्काम दोन वर्षे मुंबईत होता. तेव्हा भार्गवरामा आचरेकरांनी सतत दोन वर्षे बशीरखॉं साहेबांकडे नियमित संगीताची उपासना केली.
भार्गवराम आचरेकरांच्या गाजलेल्या भूमिका
१९३२ साली मामा वरेरकर यांचे ‘सोन्याचा कळस’ हे नाटक रंगभूमीवर आले. या नाटकात भार्गवरामांनी केलेली सरळ पण फटकळ स्वभावाच्या, मराठमोळ्या ‘बिजली’ची भूमिका रसिकांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली.
भार्गवराम आचरेकर म्हणजे ‘बिजली’ आणि ‘बिजली’ म्हणजे भार्गवराम आचरेकर’ असे समीकरण त्यावेळी मराठी नाटयरसिकांनी केले. असे म्हणले जायचे की, भार्गवराम आचरेकरांना डोळयांसमोर ठेवूनच मामा वरेरकरांनी ‘बिजलीची भूमिका’ ‘सोन्याच्या कळस’साठी लिहिली.
पु. ल. देशपांडे म्हणाले होते, बिजलीच्या स्पर्शाने एरव्ही कळस कोसळतात; परंतु या मामाच्या ‘बिजली’च्या स्पर्शाने तर ‘सोन्याचा कळस’ उभा राहिला.
भार्गवराम आचरेकर यांची नाटके आणि कंसात त्यांतील त्यांच्या भूमिकेचे नाव
- उधार उसनवार (गिरीश)
- उसना नवरा (डॉ. बाबूराव)
- कट्यार काळजात घुसली (भानुशंकर)
- कान्होपात्रा (विलास)
- कुंजविहारी (कृष्ण, नारद)
- कृष्णार्जुन युद्ध (कृष्ण)
- संत तुकाराम (तुकाराम)
- तुरुंगाच्या दारात (जीनी)
- नेकजात मराठी (जयंतराव, शिवाजी)
- पुण्यप्रभाव ( भूपाल, वसुधा, वृंदावन)
- प्रेमशोधन (नंदन)
- प्रेमसंन्यास (जयंत)
- भावबंधन (प्रभाकर)
- मानापमान (द्धैर्यधर)
- मृच्छकटिक (चारुदत्त, शर्विलक)
- राजसंन्यास (रायाजी)
- रामराज्यवियोग (दशरथ)
- राक्षसी महत्त्वाकांक्षा ( मृणालिनी, विक्रांत)
- लग्नाची बेडी (पराग)
- वधूपरीक्षा (म्हाळसा)
- विद्याहरण (कच, शुक्राचार्य)
- शहाशिवाजी (शिवाजी, व्यंकू)
- शारदा (कोदंड, शारदा, वल्लरी)
- शिक्का कट्यार (शाहू)
- श्री (श्रीकांत)
- श्री पुरुष (नारद)
- सज्जन (कल्पना)
- सत्तेचे गुलाम (नलिनी, वैकुठ)
- संशयकल्लोळ (अश्विनशेठ)
- सुवर्णतुला (कृष्ण)
- सोन्याचा कळस (कृष्णा, बिजली, विठू)
- सौभद्र (अर्जुन, कृष्ण)
- स्वयंवर (कृष्ण)
- स्वयंसेवक (मंजुळा)
- संगीत स्वामी (स्वामी)
- हाच मुलाचा बाप (डॉ. गुलाब)
भार्गवराम आचरेकर यांनी गायलेली काही नाट्यगीते
- गवळण होउनिया
- दिन गेले भजनाविण सारे
- देवता कामुकता रहिता
- परम सुवासिक पुष्पें
- प्रिया सुभद्रा घोर वनीं
- या प्रणयी ललना
- लग्नाला जातों मी
- ही माला विमला का जोडी
- अवघाचि संसार
- तुम्हा तो शंकर
- पंचतुंड नररुंड