Jump to content

भारतीय सौर कालगणना

भारत देशाचे म्हणून एक राष्ट्रीय कॅलेंडर इ.स. १९५७ मध्ये अस्तित्वात आले. भारत सरकारकडून नेमण्यात आलेल्या मेघनाथ सहा समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार भारतीय सौर कालगणना सुरू झाली.

या कालगणनेचा पहिला दिवस २२ मार्च (लीप वर्षी २१ मार्च)असतो. त्या दिवशी भारतीय सौर चैत्र महिन्याची पहिली तारीख असते. भारतीय सौर कालगणनेमध्ये इसवी सनाच्या वर्षाचा क्रमांक वापरत नाहीत, त्याऐवजी शालिवाहन शकाचा क्रमांक वापरतात. शालिवाहन शकाचा क्रमांक=इसवी सनाचा १ जानेवारी ते २१ मार्च या काळातला क्रमांक उणे ७९ आणि २२ मार्च ते ३१ डिसेंबर या काळातला इसवी सनाचा क्रमांक उणे ७८. उदा० १ जानेवारी २०१० ते २१ मार्च २०१० या काळात भारतीय सौर पंचांगाचे वर्ष (२०१०-७९=) १९३१, आणि २२ मार्च २०१० ते ३१ डिसेंबर २०१० या काळात (२०१० उणे ७८=) १९३२. हा भारतीय सन१८३२, २१ मार्च २०११पर्यंत होता; २२ मार्च पासून १८३३ सुरू झाला.

इ.स.२०१२ हे लीप वर्ष आहे, त्यामुळे (२०१२-७८=)१९३४ हे भारतीय वर्ष २१ मार्च २०१२ला सुरू झाले.

स्वरूप

भारताने स्वीकारलेली ही कालगणनासुद्धा सूर्यावर आधारित आणि खगोलशास्त्रीय आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर संबंधावर ही कालगणना असल्यामुळे चांद्र कालगणनेपेक्षा सौर कालगणना ही निसर्गचक्राला अधिक जवळची आहे सुद्धा मानले जाते. कालगणना सूर्याची पृथ्वीच्या संदर्भातील स्थिती पाहून निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ २१ मार्च रोजी दिवसरात्र समसमान कालावधीचे असतात. २२ मार्चपासून सूर्य उत्तर गोलार्धाच्या दिशेने सरकू लागतो. यादिवशी सौरवर्षांची आणि उत्तरायणाचीही सुरुवात होते. या दिवसाला वसंतसंपात दिन असेही म्हणतात. तीन महिन्यानंतर २२ जून रोजी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. त्याचदिवशी सौर वर्षांतला आषाढ महिना सुरू होतो. २३ सप्टेंबरला पुन्हा दिवस आणि रात्र समसमान असतात आणि यादिवशी सौर वर्षांतील आश्विन महिना सुरू होतो. डिसेंबरच्या २२ तारखेला सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवस अशी स्थिती असते. यादिवशी वर्षांतील पौष महिना सुरू होतो. त्यानंतर सूर्याचे पुन्हा उत्तरायण सुरू होते.

महिने

सौरवर्षांतील महिन्यांनाही ‘चैत्र, वैशाख..' अशीच नावे असून फक्त मार्गशीर्ष ऐवजी अग्रहायण म्हणले जाते.

हे महिने हिंदू पंचांगांतील चांद्र महिन्यांपेक्षा वेगळ्या दिवशी सुरू होतात. महिन्याचे नाव, महिन्याचे दिवस आणि महिना सुरू होण्याची तारीख खाली दिल्याप्रमाणे :

१) चैत्र ३०, लीप वर्षी ३१ दिवस. महिन्यातली पहिली तारीख २२ मार्च रोजी(इसवी सनाचे लीप वर्ष असताना २१ मार्च रोजी)
२) वैशाख ३१ दिवस. महिन्यातली पहिली तारीख २१ एप्रिल रोजी.
३) ज्येष्ठ ३१ दिवस. महिन्यातली पहिली तारीख २२मे रोजी.
४) आषाढ ३१ दिवस. महिन्यातली पहिली तारीख २२ जून रोजी.
५) श्रावण ३१ दिवस. महिन्यातली पहिली तारीख २३ जुलै रोजी.
६) भाद्रपद ३१ दिवस. महिन्यातली पहिली तारीख २३ ऑगस्ट रोजी.
७) आश्विन ३० दिवस. महिन्यातली पहिली तारीख २३ सप्टेंबर रोजी.
८) कार्तिक ३० दिवस. महिन्यातली पहिली तारीख २३ ऑक्टोबर रोजी.
९) अग्रहायण ३० दिवस. महिन्यातली पहिली तारीख २२ नोव्हेंबर रोजी.
१०) पौष ३० दिवस. महिन्यातली पहिली तारीख २२ डिसेंबर रोजी.
११) माघ ३० दिवस. महिन्यातली पहिली तारीख २१ जानेवारी रोजी.
१२) फाल्गुन ३० दिवस. महिन्यातली पहिली तारीख २० फेब्रुवारी रोजी.

महिन्यातली पुढची तारीख आदल्या तारखेच्या मध्यरात्रीच्या बारा वाजल्यानंतर सुरू होते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे