भारतीय रिपब्लिकन पक्ष
भारतीय रिपब्लिकन पक्ष किंवा भारिप (इंग्रजी: Republican Party of India किंवा RPI) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे सध्या अनेक गट आहेत. ज्यात रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांचे भारिप (आ) व भारिप बहुजन महासंघ हे गट प्रमुख आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून "भारतीय रिपब्लिकन पक्ष" स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[१]
इतिहास
३० सप्टेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या संघटनेस बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेची कल्पना मांडली. परंतु १४ आॅक्टोबर १९५६ हा दिवस बाबासाहेबांनी धर्मांतराची तारीख म्हणून निश्चित केल्याने, ३० सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर १९५६ च्या कालावधीत बाबासाहेबांनी पार्टीचा प्रचार व प्रसार या कालावधीत मोठया प्रमाणात केला नाही; परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पक्षात प्रवेश करण्याबाबत तत्कालीन समविचारी नेत्यांशी पत्रव्यवहार केल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या अपयशाबद्दल वाईट वाटत होते. फेडरेशनऐवजी दुसरा एखादा सर्वसमावेशक असा पक्ष स्थापन करावा लागेल असेही त्यांनी लिहिले होते. त्या अनुषंगाने विचार करून अखिल भारतीय स्तरावर कार्य करण्यासाठी ‘रिपब्लिकन पक्ष' स्थापन करावयाचे त्यांनी ठरविले होते. आपल्या नियोजित पक्षाला ‘रिपब्लिकन' असे नाव देण्याबाबत विचार करत असताना, ‘संयुक्त राज्य अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या समोर ठेवून, अब्राहम लिंकन या रिपब्लिकन अध्यक्षाने मोठ्या ध्येय निष्ठेने निग्रोंची गुलामी नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, तो एक आदर्श होता. दुसरे असे, की रिपब्लिकन हा शब्द ‘रिपब्लिक' या शब्दापासून बनलेला आहे. ‘रिपब्लिक' याचा अर्थ ‘गणराज्य' आहे. गणराज्य आणि लोकशाही यामध्ये फरक आहे. गणराज्यात राज्यप्रमुख निर्वाचित असणे आवश्यक असते. लोकशाहीमध्ये तसे असण्याची गरज नाही. भारतात सार्वभौम लोकसत्ताक गणराज्य स्थापन केले आहे. त्या लोकसत्ताक गणराज्य विचारप्रणालीच्या विकासासाठी व गणराज्याच्या घटनेतील उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एक रिपब्लिकन पक्ष' हवा होता.राज्य घटनेच्या सरनाम्यातील उद्दिष्ट्ये व रिपब्लिकन पक्षाच्या घटनेतील उद्दिष्ट्ये जवळपास सारखीच होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पक्ष मार्च १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच स्थापन करावयाचा होता; परंतु त्यांच्या निधनामुळे ते अशक्य झाले. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा त्यांच्या अनुयायांनी ठाम निश्चय केला. मात्र बाबासाहेबांच्या निधनाने शोकमग्न असलेल्या अनुयायांना निवडणूकीपूर्वी ते कार्य करता आले नाही.निवडणूक संपल्यानंतर दि. ३ ऑक्टोंबर १९५७ रोजी नागपूर येथे बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशचे अखेरचे अधिवेशन भरले. त्यावेळी आठ लाखाच्या आसपास कार्यकर्ते देशभरातून एकत्र आले होते. भारताच्या इतिहासातील हा महत्त्वाचा क्षण होता. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात बॅ. खोब्रागडे म्हणाले, “अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळावेत यासाठी डॉ. आंबेडकरांनी लढा दिला. दि. २९ सप्टेंबर १९५६ला डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षेतखाली अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या वर्किंग कमेटीने दलित फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. असा उल्लेख करून त्यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपणांवर आली आहे. त्यासाठी आजचे हे अधिवेशन होत आहे; यावेळी शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन बरखास्त होत असून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात येत आहे.[२] असे जाहीर केले.
पहिले अध्यक्ष
यावेळी श्री. एन. शिवराज यांची पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. व जनरल सेक्रेटरी म्हणून बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी या पक्षाची घटना तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. घटना संमत झाल्यानंतरच नवीन पदाधिकारी नियुक्त केले जातील असे ठरविण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाचे संसदेमधील कार्य
१) रिपब्लिकन पक्षाने संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली.
२) अनुसूचित जातींना मिळणाच्या सर्व सवलती नवबौद्धांना देण्यात याव्या; हा समाज आर्थिकदृष्ट्या गरीब व मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाला या सवलती देणे गरजेचे आहे. अशी पक्षाने भूमिका स्वीकारली.
३) अस्पृश्यांवर होत असलेले अत्याचार आणि पोलीस व अधिकाऱ्यांचे पक्षपाती वर्तन यातून त्यांची सुटका व्हावी व अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली. ४) अस्पृश्य, आदिवासी व मागासलेला वर्ग यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी निर्वासितांना ज्या व्यापार उद्योगात सवलती दिल्या जातात. त्या यांनाही दिल्या जाव्या यासंबंधी मागणी करण्यात आली. .
५) रेल्वे स्टेशनवर पाणी वाटण्याचे काम मेहेतरांना द्यावे; रेल्वे स्टेशनमधील चहा उपहारगृहाचे परवाने त्यांना द्यावेत व प्रत्येक खात्यातील कामे योग्य त्या प्रमाणात अस्पृश्य समाजातील लोकांना देण्यात यावी..
६) सरकारी नोकरीतील प्रथम व द्वितीय वर्गाच्या पदांवर अस्पृश्यांची नेमणूक करण्यात यावी. .
७) कोकण रेल्वेचे काम ताबडतोब हाती घ्यावे. प्रथम देशाच्या सर्व भागात रेल्वेमार्ग सुरू करावे व नंतरच रेल्वेच्या विद्युतीकरणाला अग्रक्रम द्यावा. रेल्वे बोर्डावर दलितांचे प्रतिनिधी घ्यावे. .
८) दलितांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना घरगुती उद्योगधंदे चालविता यावे याकरिता अर्थसाहाय्य द्यावे व पंचवार्षिक योजनेत तशी तरतूद करावी.
९) खेड्यातील भूमिहीन अस्पृश्यांना पडित जमिनी दिल्या जाव्यात त्याकरिता जमिनीवर सीलिंग लावून ती जमीन अस्पृश्यांना देण्यात यावी. .
१०) शाळा व महाविद्यालयांमधून स्नेह, करुणा, समता, बंधुता असे बौद्ध धर्माशी सुसंगत शिक्षण दिले जावे; अशा मागण्या संसदेमध्ये करण्यात आल्या.[३]
रिपब्लिकन पक्षाचे संसदेबाहेरील कार्य
१) रिपब्लिकन पक्ष नेत्यांनी दलित बौद्धांवर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. त्यांचे सांतवण केले. त्यांचे मनोबल वाढविले. शासनाला अन्याय अत्याचाराविरुद्ध उपाययोजना करण्याविषयी विनंती केली.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी १९२८ मध्ये स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची पुनर्बाधणी केली. कारण राजकीय पक्षासाठी एखाद्या पोषक संघटनेची गरज असते. त्यातून काही कार्यकर्ते तयार होतात. म्हणून समता सैनिक दलाचे पक्षपुढा-यांनी पुनरुज्जीवन केले. ऑक्टोबर १९५७ मध्ये अखिलभारतीय समता सैनिक दलाचे अधिवेशन भरविले. यावेळी समता सैनिक दलाची मध्यवर्ती कार्यकारिणी निवडण्यात आली.
३) दि. २ ऑक्टोबर १९५७ला नागपूर येथे ‘अखिल भारतीय महिला परिषद भरविण्यात आली. अध्यक्षस्थानी शांताबाई दाणी होत्या. त्या म्हणाल्या ‘स्त्री ही घरातील संसार करते तिला सुसंस्कृत बनविण्यासाठी स्त्रियांना शिक्षण । द्यावे. त्यामुळे कुटुंब सुसंस्कृत बनेल.
४) रिपब्लिकन पक्षाने ‘महाराष्ट्र दलित साहित्य संघाचे मुंबईत दि. २ मार्च १९५७ला श्री. बी.सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरविले. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन' नावाची विद्यार्थ्यांची संघटना स्थापन केली.
५) २ ऑक्टोबर १९५७ला रिपब्लिकन पक्षाने ‘कनिष्ठ गाव कामगार परिषद भरविली. अध्यक्षस्थानी दादासाहेब रूपवते होते. कनिष्ठ गाव कामगारांना किमान वेतन कायदा लागू करण्याविषयीचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. तसेच कामगारांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी एक कृती समिती निवडण्यात आली.
६) रिपब्लिकन पक्षाने २८,२९, व ३० डिसेंबर १९५७ रोजी अकोला येथे बैठक बोलावली यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पक्षाच्या मुंबई शाखेने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक निधी उभारला. या माध्यमातून काही स्मारके पूर्ण करता आली.
७) रिपब्लिकन पक्षाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता बौद्ध महासभेचे पहिले अधिवेशन दि. ०३/१०/१९५७ रोजी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे घेतले. यावेळी चार ठराव पास केले.
अ) बौद्धधर्म स्वीकारलेल्या स्पृश्यास्पृश्यांना शैक्षणिक व नोकरीविषयक सवलती देण्याविषयी मागणी करणे.
ब) बुद्धजयंती व आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्याविषयी मागणी करणे.
क) दिक्षाभूमी बुद्धविहारासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी देण्यात यावा.
ड) बौद्धांवरील अन्याय-अत्याचाराविषयी चौकशी करण्याची शासनाला विनंती करणे इत्यादी मागण्या करणे तसेच या काळात बौद्ध धम्म दिक्षेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचा फायदा महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील लाखो लोकांना झाला व अनेकांनी बौद्ध धम्माची दिशा घेतली.
८) रिपब्लिकन पक्षाने डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान अशिक्षित लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती घडवून आणली. दलित शोषित समाजामध्ये राजकीय जागृती करून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढविल्या.
९) रिपब्लिकन पक्षाने भूमिहिनांचा सत्याग्रह घडवून आणला. जमिनदारांच्या पिळवणूकीतून दलितांची सुटका करण्यासाठी, त्यांना त्यांच्या मालकीची जमीन मिळवून दिली पाहिजे; यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर १९५८ला नाशिक, जळगांव, धुळे व अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूमीहिनांचे सत्याग्रह केले.[४] रिपब्लिकन पक्षाने १९५७ पासून ते १९५९ पर्यंत केले असल्यामुळे हा काळ रिपब्लिकन पक्षाच्या दृष्टीने सुवर्णयुग होता; असे म्हणले जाते.
रिपब्लिकन पक्षातील फाटाफूट
रिपब्लिकन पक्षाचे १९५९ पर्यंतचे मजबुत संघटन फार काळ टिकले नाही. पक्षाला लाभलेले नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे निस्वार्थी, खंबीर व समाजाला योग्य दिशा दाखविणारे नव्हते. त्यांच्यात वैयक्तिक मतभेद, नेतृत्वाची लालसा व स्वार्थ या दुर्गुणांमुळे पक्षात बेशिस्त निर्माण झाली. त्यामुळे ते नेतृत्व व्यापक व राष्ट्रीय स्वरूपाचे बनू शकले नाही. सामाजिक व राजकीय उत्थानाची पूनर्बाधनी करणे त्यांना शक्य झाले नाही. सत्तेच्या लोभामुळे नेत्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले व पक्षाचे विविध गटात विभाजन झाले. प्रारंभी, रिपब्लिकन पक्षाची साम्यवाद्यांशी वाढती मैत्री बी. सी. कांबळे यांना नको असावी; कारण चीनने तिबेटवर आक्रमण केल्याने दलाई लामा भारतात आले. चीनी कम्युनिस्टांनी अनेक तिबेटींना ठार मारले. तेथील बौद्ध विहार उद्ध्वस्त केले. या घटनेमुळे बी. सी. कांबळे यांनी कम्युनिस्टांसोबत रिपब्लिकन पक्षाने जाऊ नये ही भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेला रिपब्लिकन पक्षाने दाद दिली नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी दि. १४ मे १९५९ रोजी नागपूर येथे आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे अधिवेशन स्वतःच भरविले. यावेळी त्यांनी 'रिपब्लिकन पक्ष दुरुस्त गट' तयार केला. या गटात बी. सी. कांबळेसोबत बाबू हरिदास आवळे, दादासाहेब रुपवते, ए. जी. पवार आले. त्यामुळे दुरुस्त व नादुरुस्त असे दोन गट पक्षात पडले. नादुरुस्त गटाचे नेतृत्व एन. शिवराज यांनी केले.[५]
भंडारे गट
१९६२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये आर. डी. भंडारे यांनी सांगली मतदार संघातून निवडणूक लढविली. यावेळी रिपब्लिकन पक्ष व संयुक्त महाराष्ट्र समितीची युती होती. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार भंडारे यांचा पराभव झाला. पुढे दादासाहेब गायकवाड व भंडारे यांच्यात मतभेद झाले. भंडारेंना मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदावरून कमी करण्याचा निर्णय गायकवाड यांनी घेतला. परिणामी भंडारे यांनी दि. २७ व २८ ऑक्टोबर १९६४ला रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन बोलविले. व आपल्या सहकाऱ्यांसमवेत बाहेर पडून ‘भंडारे गट' स्थापन केला.१९६५ मध्ये त्यांनी आपला गट बरखास्त करून ते काँग्रेसमध्ये सामिल झाले.[६]
गवई गट
दादासाहेब गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्या प्रित्यर्थ काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा. सु. गवई यांना व बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. १९६८ मध्ये रा. सु. गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे रा. सु. गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली व त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दुर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७०ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणित गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला ‘गवई गट' असे म्हणले जाऊ लागले.[७] यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशाप्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वतःला अखिल भारतीय स्तरावरील रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर दलितांच्या मतांची सौदेबाजी करून जास्तीत जास्त राजकीय लाभ मिळविण्याच्या प्रयत्नात तथाकथित नेते मशगुल झाले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे ‘दलित पॅंथरचा उदय झाला.
दलित पॅंथर
रिपब्लिकन पक्षातील गटबाजी, नेत्यांची निष्क्रियता व त्यातून उदभवलेला समाजाचा मरगळलेपणा आणि प्रचलित प्रश्नांमधून दाहक होत जाणारे वास्तव ही सगळी पार्श्वभूमी दलित लेखकांच्या लेखनामागे होती. यातूनच अर्जुन डांगळे, ज. वि. पवार, प्रल्हाद चेंदवणकर, नामदेव ढसाळ, राजा ढाले, बाबूराव बागुल इत्यादी साहित्यिकांनी पुढाकार घेऊन, दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यावर लढा देण्यासाठी दि. ९ जुलै १९७२ रोजी मुंबईला ‘दलित पॅंथर' या लढाऊ संघटनेची स्थापना केली. पुढे या संघटनेला अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद म्हस्के, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगांवकर यांचे नेतृत्व लाभले. त्यांनी आक्रमक शब्दप्रवृत्तीच्या जोरावर व भावनिक वत्कृत्वाच्या बळावर मोठमोठ्या सभा जिंकल्या. त्याचा लाभ दलित चळवळीला मिळाला व चळवळीच्या कक्षा वाढविल्या. दलित पॅंथराचा उदय व विकास हे बदलत्या परिस्थितीतील दलित युवकांनी केलेल्या विचारांचे फलित आहे.
पॅंथर संघटनेचे नेते नामदेव ढसाळ कम्युनिस्टवादी व राजा ढाले हे आंबेडकरवादी असा वाद पुढे आला.४६ १९७४ साली नामदेव ढसाळ यांनी नागपूर येथे दलित पॅंथरचे अधिवेशन भरविले व स्वतःचा गट वेगळा केला; तर १९७६ साली राजा ढाले यांच्या गटातून भाई संगारे व अविनाश महातेकर बाहेर पडले; त्यांनी संगारे, महातेकर गट निर्माण केला. दि. ७ मार्च १९७७ला राजा ढाले यांनी नाशिक येथे आपल्या गटाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन तेथे पॅंथर बरखास्तीचा निर्णय घेतला. व ‘मासमुव्हमेंट' या संघटनेची स्थापना केली. ढाले गटाच्या या कृतीचा निषेध करून अरुण कांबळे, रामदाम आठवले, दयानंद म्हस्के, ज. वि. पवार, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगांवकर इत्यादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन दि. २८ एप्रिल १९७७ला औरंगाबाद येथे भारतीय दलित पॅंथरची निर्मिती करून आपले कार्य चालू ठेवले.[८]
भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघाचा उदय व विकास
काँग्रेसने ज्याप्रमाणे इतर पक्षांना दुर्बल बनविले; तसेच या पक्षाचे झाले. सत्तेच्या आमिषाने रिपब्लिकन पक्षनेतृत्वात स्वार्थाची वृत्ती बळावली. गटबाजीचे संधीसाधून राजकारण सुरू झाले. नेत्यांनी आपले सवतेसुभे मांडले. पक्षाची अनेक शकले करून वाताहत केली. या विविध गटांना एकत्रित करण्याचे प्रयत्न झाले; परंतु ते अयशस्वी ठरले.महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघ या दोन संघटनांनी एकत्रित येऊन समान आकांक्षेसाठी, समान हितसंबंध प्रस्थापित करून निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी एक राजकीय संघटन घडवून आणले. सर्वप्रथम भारतीय रिपब्लिकन पक्षाचा उदय झाला व नंतर बहुजन महासंघ उदयास आला. या दोन्हीही संघटनांचा उदय व विकास अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
- बहिष्कृत हितकारिणी सभा
- समता सैनिक दल
- स्वतंत्र मजूर पक्ष
- डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी
- पीपल्स एज्युकेशन सोसायटी
- द बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट
- भारतीय बौद्ध महासभा
संदर्भ
- ^ Khobragade, Fulchand (2014). Suryaputra Yashwantrao Ambedkar (Marathi भाषेत). Nagpur: Sanket Prakashan. pp. 20, 21.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. ४१.
- ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. ५७ ते ६२.
- ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. ६३ ते ७०.
- ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. ८८.
- ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. ९६, ९७.
- ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. १०१ ते १०३.
- ^ मुरुगकर, लता (१५ ऑगस्ट १९९५). दलित पॅंथर चळवळ. पुणे: सुगावा प्रकाशन. pp. ९३.
बाह्य दुवे
- रिपब्लिकन चळवळीचे मारेकरी नेमके कोण? Archived 2021-03-03 at the Wayback Machine.