भारतमाता
भारतमाता ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक संकल्पना आहे. माता म्हणजे आई. भारत देश हा तिच्या प्रजेची माता आहे अशी कल्पना हिच्यामागे आहे, त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता म्हणून कल्पना मांडली गेली आणि तिची चित्रे तयार करण्यात आली. अशा चित्रांचे वा मूर्तीचे प्रतिकात्मक पूजन हे अन्य देवतांप्रमाणे करण्याची परंपरा स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सुरू झालेली दिसते.
संकल्पना
बंगाली क्रांतिकारक आणि विचारवंत योगी अरविंद घोष यांनी भारतमाता ही संकल्पना मांडली आहे.[१] भारत हा देश असला तरी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात विचारवंत आणि क्रांतिकारक यांनी आपल्या देशाला आई मानले. आपली आई पारतंत्र्यात असल्याने तिच्या सुटकेचा प्रयत्न तिच्या पुत्रांनी चालविला आहे अशी भावना यामागे होती.[२][३] अभ्यासक, विश्लेषक, क्रांतिकारक हे भारतमातेला वंदन करतात आणि भारतातील सर्व राज्ये ही जणू काही तिची अपत्ये आहेत असेही नोंदवताना दिसतात.[४][५]
बंकिम चंद्र लिखित वंदे मातरम् या राष्ट्रगानामध्ये 'भारत ही माता आहे' ही संकल्पना स्पष्ट स्वरुपात अभिव्यक्त झालेली आहे. ''वंदे मातरम् या गीताद्वारे भारतमातेने स्वतःच स्वतःला प्रकट केले आहे,'' असे श्रीअरविंद म्हणतात.[६]
संकल्पनेचा अर्थ
आई ही देवाप्रमाणे मानली जाते कारण ती मनुष्याला जन्म देते. आईविषयीची ही कृतज्ञता पृथ्वीच्या प्रतीही व्यक्त केली जाते. हिंदू जीवनदृष्टीमधे भूमीला माता मानले गेले आहे आणि त्यामुळेच भारत देशाला "भारतमाता" संबोधण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत स्वीकारली गेली आहे.[७] भारतमातेला गुरुस्थानी मानणे ही भारतीय क्रांतिकारी आणि देशभक्तांची प्रेरणा आहे.[८][९]
संकल्पनेचे स्पष्टीकरण
श्री. कन्हैयालाल मुन्शी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी, प्राध्यापक अरविंद घोष यांना एक प्रश्न विचारला होता, "राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल ?" श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करीत म्हणले, "या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पर्वतराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक जितीजागती माता आहे या भावाने तिच्याकडे पाहा, आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा." [१०]
भवानी माता
श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या भवानी-भारती या ९९ श्लोकांच्या संस्कृत काव्यरचनेमध्ये भारत-माता या संकल्पनेचा परिपोष झालेला आढळतो. दुर्गा सप्तशती या स्तोत्रामध्ये देवी दुर्गा प्रकट होऊन महिषासुर राक्षसाचा निःपात करते, या संकल्पनेचा आधार या काव्यास आहे. परकीय शासनरुपी राक्षसाचा निःपात भारतमाता रुपी भवानीने करावा यासाठी केलेले हे आवाहन आहे. [११]
बंकिम चंद्र यांच्या 'वंदे मातरम्' मध्ये मातेच्या दुर्गा, सरस्वती, कमला या रूपांचे दर्शन घडते, तर श्रीअरविंद यांना भारतमातेमध्ये भवानीचे म्हणजे कालीमातेचे रूपही दिसते, असे वंदे मातरमचे अभ्यासक श्री. मिलिंद सबनीस यांनी म्हणले आहे. [११]\
माता या संकल्पनेचे उपयोजन
"ज्या दिवशी आपण भारतमातेची खरीखुरी अखंड प्रतिमा पाहू शकू, जेव्हा तिच्या सौंदर्याने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवने तिच्या सेवेमध्ये मोठ्या आतुरतेने समर्पित करू, तेव्हा (एकात्मता नसल्याचा) हा अडथळा दूर होईल आणि भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती ह्या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद हे तेव्हा आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. हिंदु- मुस्लिम संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ.
देशाचे माता म्हणून दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांना भेदून जावे ही आस आमच्यामध्ये पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे भेदण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती भारतमातेच्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची!'' - श्रीअरविंद घोष यांच्या या वचनामधून माता या संकल्पनेचे प्रत्यक्ष उपयोजन झाल्यास काय परिणाम दिसून येतील याचे स्पष्टीकरण मिळते.[१२]
कलेच्या व साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणारी भारतमाता
भारतमातेची चित्रे वेगवेगळ्या चित्रकारांनी आपापल्या संकल्पनेतून काढलेली आहेत, त्यामागे देशभक्तीची प्रेरणा आहे. भारतमाता ही स्रीरूपात चित्रित केली जाते. काही चित्रकार भारताच्या नकाशाच्या रेखाकृतीत स्त्री प्रतिमेची आकृतीही समाविष्ट करतात. काही ठिकाणी युवती रूपातील तेजस्वी भारतमाता दाखविलेली असते. हिमालय तिच्या मुकुटस्थानी असतो आणि समुद्र तिचे पाय धुवत असतो असेही अंकन असते.
भारत देशावर होणारी आक्रमणे आणि त्यामुळे देशाचे होणारे नुकसान अधोरेखित करताना काही चित्रकार दुःखाने रडणारी स्त्री म्हणून भारतमाता चित्रित करतात. आक्रमणामुळे येणारी हतबलता दर्शविण्यासाठी साडीचा पदर फाटलेल्या अवस्थेत असलेली आणि रुदन करणारी स्त्री अश्या रूपातही भारतमाता पहायला मिळते.[९]
भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेतून अवनींद्रनाथ ठाकूर यांनी भारतमातेचे चित्र काढले आहे. हातात जपमाळ, भाताच्या लोब्या, आणि ग्रंथ घेतलेली, बंगाली पद्धतीची साडी परिधान केलेली भारतमाता त्यांनी चित्रित केलेली आहे.[१३]
- एकात्मता स्तोत्र-
एकात्मता स्तोत्रामधे भारतमातेचे वर्णन आले असून त्यामध्ये असे 'हिमालय हा जिचा मुकुट आहे, रत्नांची खाण असलेला समुद्र जिचे पाय धूत आहे, ऋषी आणि मुनी यांच्या तपाने पावन झालेल्या भारतमातेला वंदन असो' असे म्हणले आहे.[१४]
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या रचनेतून भारतमातेला वंदन केले आहे. `जयोस्तुते श्री महन्मंगले...' ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे.[१५]
हे सुद्धा पहा
- भारताचा स्वातंत्र्यलढा
- वंदे मातरम्
- भवानी भारती या संस्कृत काव्याचा मराठी व अन्य ८ भाषांमधील अनुवाद
- अभीप्सा - अखिक भारतीय पत्रिका (मराठी मासिक), भारत माता विशेषांक, सप्टेंबर २०१९
संदर्भ
- ^ Sengar, Shailendra (2005). Aadhunik Bharat Ka Itihas (in Hindi) (हिंदी भाषेत). Atlantic Publishers & Dist. ISBN 9788126904556.
- ^ Panta sahacara (हिंदी भाषेत). Vāṇī Prakāśana. 2001. ISBN 9788170558347.
- ^ Shukla, Bhanu Pratap; Candra, Deveśa (1994). Yaksha-praśna (हिंदी भाषेत). Dinamāna Prakāśana.
- ^ Ayyara, Ena T. Viśvanātha; Parīkha, Rāmalāla (1992). Kerala, Rājya ke bhaugolika, sāṃskr̥tika, sāmājika, dhārmika, tathā ārthika pakshoṃ para prakāśa ḍālani vālī pustaka (हिंदी भाषेत). Akhila Bhāratīya Hindī Saṃsthā Saṅgha.
- ^ Hawley, John Stratton; Wulff, Donna M. (1998). Devī: Goddesses of India (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120814912.
- ^ Sri Aurobindo (2003). Collected Works of Sri Aurobindo - Volume 01. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 641.
- ^ Sankalit (2015-01-01). Hindutva: Ek Drishti aur Jeewan Padhti (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 9789381500965.
- ^ Patle, Dr Jageshwar. Shri Guruji - Hindu Rashtra ki Avdharna (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 9789381500262.
- ^ a b Ramaswamy, Sumathi (2009-01-01). The Goddess and the Nation: Mapping Mother India (इंग्रजी भाषेत). Duke University Press. ISBN 0822391538.
- ^ Sujata Nahar, मराठी अनुवाद - डॉ.केतकी मोडक (२०१८). Mother's Chronicles - Book Five,. पुणे: अभीप्सा मराठी मासिक.
- ^ a b कवी - श्रीअरविंद, अनुवादक - श्री.द.तु.नन्दापुरे (२०१६). भवानी-भारती. अमरावती: पायगुण प्रकाशन.
- ^ Sri Aurobindo, अनुवाद - केतकी मोडक, अभीप्सा मासिक, सप्टेंबर २०१९. Collected Works of Sri Aurobindo - Volume 09. Pondicherry. pp. 225–226.
- ^ Agravāla, Jī Ke (1991). Ādhunika Bhāratīya citrakalā (हिंदी भाषेत). Lalita Kalā Prakāśana.
- ^ "एकात्मता स्तोत्र - एकात्मता स्तोत्र". sites.google.com. 2016-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-16 रोजी पाहिले.
- ^ Sankalit (2017-01-01). Veer Savarkar (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 9789384414788.