Jump to content

भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध

भारताचे वादग्रस्त प्रदेश

भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध हे भारतपाकिस्तान या दोन देशांमध्ये १९६५ मध्ये झालेले दुसरे युद्ध होते.

युद्धाची सुरुवात : पार्श्वभूमी

इ.स. १९६० चे दशक जागतिक राजकीय पटलावर एक वेगळेच समीकरण मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATOच्या छत्राखाली अमेरिका समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरू होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्‍न केला. भारताने ती विनंती फेटाळून लावल्यावर राजकीय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. १९४७ नंतर नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारची दिशा समाजवादी राज्यव्यवस्थेकडे झुकताना दिसू लागली. ही व्यवस्था ही भांडवलशाहीपेक्षा साम्यवादाच्या जवळ जाते, त्यामुळे साम्यवादी जगताचे नेतृत्व करणाऱ्या रशियाबद्दलचे आकर्षण भारतीय नेत्यांत, सत्तावर्तुळात जास्त होते. अमेरिका त्यामुळे बऱ्याच प्रमाणात भारतापासून दुरावत चाललेला देश होता.

त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःहून लष्करी तळ देऊ केल्याने अमेरिका पाकिस्तानला खूप मदत करू लागली. त्याचवेळी मॅकमोहन लाईनच्या प्रश्नावरून १९६२ साली भारताचा चीनविरुद्धच्या लढाईत लष्करी पराभव झाला. त्या युद्धाने भारत हा चीन आणि पाकिस्तानचा समान शत्रू झाला. अमेरिका-पाक-चीन अशी एक वेगळीच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली.

१९६२ च्या पराभवातून धडा घेत भारतीय लष्कराची पुनर्बांधणी आणि काही प्रमाणात आधुनिकीकरणास वेग मिळाला. १९६५ च्या अखेरीस भारतीय लष्कराची पुनर्बांधणी व आधुनिकीकरण ह्याचा अंदाज पाक गुप्तचर, सत्तावर्तुळास येऊ लागला. एकदा का भारताचे लष्कर आहे त्याहून शक्तीशाली झाले तर थेट समोरासमोर युद्ध करून आपल्या मागण्या बळावर रेटणे अशक्यप्राय होईल हे तिथल्या सरकारला जाणवले. ह्या "मागण्या" म्हणजेच प्रामुख्याने काश्मीर प्रश्नाचा पाकिस्तानला अनुकूल असा निकाल. काही हालचाल करायची असेल तर ती झपाट्याने केली पाहिजे हे त्यांना जाणवले. युद्धाच्या मैदानात भारताला आपण सहज हरवू असे त्यांना वाटत होते.इकडे भारत स्वतः शीतयुद्धातील तटस्थ देशांचे प्रतिनिधित्व करत असला तरी रशियाशी भारताचे सामरिक करार होतेच. शिवाय इराण, इजिप्त, लेबानॉन, अफगाणिस्तान हे मुस्लिम जगतातील देशही भारताचे सहानुभूतीदार होते. काश्मीरचा पूर्ण भूभाग आपल्या ताब्यात आला नाही ही टोचणी भारत पाकिस्तान दोघांनाही होती. पण उर्वरित काश्मीरही घेऊन टाकावा अशी महत्त्वाकांक्षा आणि आक्रमक वृत्ती पाकिस्तानी लष्करात होती. अमेरिकन युद्धसामुग्री मिळताच चीनकडून मार खाणाऱ्या भारताला वेळ पडल्यास उघड मैदानात आपण नक्कीच हरवू असा विश्वास त्यांच्यात येऊ लागला.

तात्कालिक घटना व प्रत्यक्ष युद्ध

पाकिस्तानने वेष बदललेल्या सैनिकांना मुजाहिदीन (स्वातंत्र्यसैनिक) म्हणून काश्मिरात पाठवले. असे केले की घडलेली घटना काश्मिरी "जनतेचा उठाव" असे दाखवून काश्मीर भारतापासून तोडता येईल. ते तथाकथित मुजाहिदीन काश्मीरमध्ये पोचलेसुद्धा. त्यांनी तिथे काही प्रमाणात हिंसाचारही केला. भारतीय सैनिकांवर हल्ले केले. उद्देश हाच की काश्मिरी जनताच कशी "बंड" करून उठली आहे व आता भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये कसे आराजक माजले आहे आणि त्याचवेळी पाकव्याप्त काश्मिरात कसे सगळे आलबेल आहे हे दाखवणे. म्हणजेच, भारताला अचानक उठाव करून काश्मीरमधून हुसकावून लावणे व काश्मीर अलगद घशात घालणे शक्य होईल. जर काश्मिरी लोकांनी पाकिस्तानात सामील होण्यास विरोध केलाच तर ताबडतोब त्यांना तथाकथित स्वातंत्र्य देऊन स्वतःचे अंकित राष्ट्र बनवणे हा उद्देश.

पहिले काही असे तथाकथित "स्वातंत्र्यसैनिक" भारतात पोचताच ह्याचा सुगावा लागला, व रागाचा पारा चढलेल्या भारताने ताबडतोब मग थेट राजस्थान आणि पाकिस्तानी पंजाब यांमधली आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत फारशा प्रतिकाराशिवाय लाहोर-सियालकोटाच्या अगदी जवळपर्यंत धडक मारली व अचानक घोडदौड थांबवली. याचे कारण तर भारतीय लष्कराला थेट निर्विरोध इतका आत प्रवेश मिळणे म्हणजे कदाचित एखादा मोठा सापळा असू शकत होता. निदान तशी शंका भारतास आली आणि अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याचे ठरवण्यात आले. एवढा वेळ मिळाल्याने पाकिस्तानने लागलीच सैन्याची जमवाजमव करून लाहोरच्या पिछाडीपर्यंत सैन्य आणले. व आख्खे शहर काही दिवस का असेना पण ताब्यात ठेवायचा भारताचा प्रयत्‍न हुकला.

पण मुळात असे झालेच कसे? लाहोर आणि सियालकोट ही महत्त्वाची शहरे संरक्षणहीन कशी ठेवली गेली? कारण भारत मुळात आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडेल हेच मुळात लश्करशहा अयुबखान ह्याला वाटत नव्हते. त्याची अपेक्षा ही होती की मुळात काश्मीर हा भारत-पाक ह्यांच्या ताब्यात अर्धा-अर्धा असा आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवरून (LineOfControl) म्हणजे काश्मीरमधून भारत हल्ला करेल. ह्या भागात लढाई करणे पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते कारण युद्धमान स्थितीत (दोन्ही बाजूंच्या ताब्यातील भौगोलिक रचना लक्षात घेता)भारताला आपल्या सैन्याला रसद पुरवठा करणे अत्यंत जिकिरीचे होते. तेच पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते. हे लक्षात घेऊन भारताने तिथे युद्ध करणे टाळले. इतकेच काय, तर भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या काही चौक्याही भारताने दुर्लक्षित केल्या.

खेमकरण सेक्टर मध्ये अमेरिकेकडून पाक ने मिळवलेले पॅटन रणगाडे भारतीय सैनिक अब्दुल हमीद सारख्यांच्या पराक्रमामुळे आपण थांबवू शकलो.. पाकसीमेवरील गुजरात राज्यातील कच्छच्या रणातील ५०० चौरस किलोमीटरच्या आसपासचा भाग पाकिस्तानने मिळवला. मॅकमोहन लाईन जशी चीनसोबतचा वादग्रस्त मुद्दा आहे तसाच काश्मीरवरून पाकसोबत वाद आहेत. कच्छच्या रणाबद्दलही पाकिस्तानशी वाद आहेत. तिथेही स्पष्ट आणि उभयपक्षी मान्य अशी आंतरराष्ट्रीय सीमारेषा नाही. शिवाय आता त्याच भागाच्या आसपास भरपूर नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याने एक नवेच वळण त्या वादाला लागू शकते.

युद्धोत्तर करार (ताश्कंद करार)

पाकिस्तानातला पंजाबकडला काही भाग भारताच्या ताब्यात तर काश्मीरकडचा भारताचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात. असल्याने स्टेलमेट स्थिती निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वतःहून हस्तक्षेप करत समेटासाठी दोन्ही बाजूंवर दबाव टाकला. तेव्हाच्या U S S R मधील ताश्कंद(आजच्या उझबेकिस्तान) येथे दोन्ही बाजूंना समेटासाठी बोलावण्यात आले. युद्धपूर्व स्थिती आणि कब्जा दोन्ही देशांनी जवळपास जशा होता तसा मान्य करण्याचे ठरले. १९६५ च्या पूर्वी जसे नकाशे होते, तसेच ते नंतरही राहिले. ज्या दिवशी ताश्कंदमध्ये तह झाला, त्याच रात्री भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाला.

परिणाम

दोन्ही देशातल्या काही लोकांनी हे युद्ध आपणच जिंकले असा दावा करायला सुरुवात केली. युद्धोत्तर जेवढी वर्षे गेली तितका हा दावा करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे दोन्ही देशात. प्रत्यक्षात युद्धात झालेल्या नुकसान, मानहानी ह्यामुळे जनमत आणि लष्करातील काही शक्ती पाकिस्तानी सत्ताधीश अयुबखान ह्यांच्या विरोधात गेल्या. राज्य करणे कठीण होऊन बसल्यामुळे काही काळाने अयुबखान ह्यांना सत्ता सोडावी लागली. ती सत्ता अप्रत्यक्षपणे तेव्हा नुकत्याच लंडनमध्ये शिकून आलेल्या पुढारलेली राहणी असलेल्या झुल्फिकार अली भुत्तो या नव्या नेत्याकडे येऊ लागली. प्रत्यक्षात ह्या नेत्यास पंतप्रधान होण्यास बराच अवकाश लागला.

भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दोन्ही अर्थव्यवस्था अधिकच अडचणीत आल्या. भारतात आधीच अन्नटंचाई होती, ती अधिकच जाणवू लागली. म्हणूनच भारताने हरित क्रांतीच्या दिशेने प्रयत्‍न करण्याचे मनावर घेतले. सुरुवातीची काही वर्षे पाकिस्तानचा विकासदर हा भारतापेक्षा खूपच जास्त होता. तो हळूहळू घसरू लागला. पाकिस्तान परकिय मदतीवर अधिकाधिक अवलंबुन होउ लागले. पाकिस्तानी लश्करात सर्वाधिक भरणा पश्चिम पाकिस्तानातल्या पंजाबी लोकांचा होता. ते अधिकाधिक सामुग्री स्वतःकडे जमवु लागले.त्यासाठी पूर्व पाकिस्तान (आताचा बांगला देश)मधील महसूल बंगाली लोकांकडुन सर्रास हिसकावुन थेट पश्चिम पाकिस्तानात वळवण्यात येऊ लागला. आधीच उपेक्षित जिणे जगणाऱ्या बंगाली पाकिस्तान्यांना अधिकच एकटेपण जाणवले. अलगवाद वाढू लागला. स्वतंत्र बांगला देशाच्या निर्मितीची बीजे रोवली जाऊ लागली.

इकडे भारतीय गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यासाठी खास RAW(Research And Analysis Wing)ची स्थापना करण्यात आली. ह्या रॉने पुढे अत्यंत मोठी कामगिरी युद्धदकालात तसेच शांतताकालातही बजावली. ह्यामुळे भारत वाटतो तितका दुबळा नाही हे चीनच्या लक्षात आले. भारताच्या मदतीला थेट रशिया म्हटल्यावर मग तर भारताला दाबणे आपल्या एकट्याच्या आवाक्यातले काम नाही हे चीनच्या लक्षात आले. रशिया-चीन ह्या दोन देशातील वितुष्ट तसेही सीमाप्रश्नावरून होतेच. ते वाढायला सुरुवात झाली. १९७१ला रशियाच्या विरुद्ध म्हणुन माओशासित चीन आणि अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन ह्यांची ऐतिहासिक भेट झाली. अमेरिका ह्या भांडवलशाही जगताच्या नेत्याशी संबंध दृढ करण्याचे प्रयत्‍न कम्युनिस्ट चीनमध्ये सुरू झाले आणि पुढे दशकभरातच सर्वात मोठा कम्युनिस्ट देश, चीन हा भांडवलशाही अमेरिकेचा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामरिक भागीदार बनला.

भारताने युद्धात फारसे गमावले नाही. लालबहादुर शास्त्रींच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतरही भारतात लोकशाही कायम राहिली. लष्कराचे कौतुक, गौरव झालाच; पण विजयोन्मादात थेट सत्ताच भारतीय लष्कराने हाती घ्यायचा प्रयत्‍न केला असे झाले नाही. तिकडे पाकमध्ये अस्थिरता माजली. अयुबखान ह्यांना होणारा अंतर्गत विरोध तीव्र झाला. सत्ताधारी बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली; पण सत्ताधारी बदलले तरी सत्तेची सूत्रे लष्कराकडेच राहण्याची तिथली परंपरा अधिकच दृढ झाली.


या युद्धावरची पुस्तके

  • असा झुंजला हिंदुस्थान - १९६५ भारत-पाकिस्तान लढाई (लेखक : शशिकांत रा. मांडके)