Jump to content

भानुमती कंस

भानुमती कंस ( - इ.स. १९६१) या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी गायलेली काही मराठी भावगीते अजरामर झाली.

भानुमती कंस या मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजातून द्विपदवीधर झाल्या होत्या आणि बी.आर. देवधरांकडे संगीत शिकत आणि शिकवत होत्या. दिसायला त्या अत्यंत रूपवान तर होत्याच, पण त्या एक टेनिस खेळाडूही होत्या. देवधरांच्या वर्गात असताना भानुमतींना तेथे संगीत शिकायला येत असलेले कुमार गंधर्व भेटले, आणि त्या दोघांनी २४ एप्रिल, १९४७ रोजी प्रेमविवाह केला. लग्नानंतर पाचच महिन्यांनी कुमार गंधर्व यांना क्षयाची बाधा असल्याचे निदर्शनाला आले. शस्त्रक्रिया करून त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले आणि कोरड्या हवेसाठी कुमार आणि भानुमती देवासला आले. उदरनिर्वाहासाठी भानुमती कंस या देवासच्याच एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करू लागल्या. संसाराची सारी जबाबदारी त्यांच्यावरच पडली.

भानुमती कंस यांनी आपल्या संगीताचे शिक्षण देवासला कुमार गंधर्व यांच्या मार्गदर्शनाखाली चालूच ठेवले.

कुमारांच्या दुखण्यात पत्नी भानुमती यांनी त्यांची खूप सेवाशुश्रूषा केली. भानुमतींच्या मदतीने कुमार आजारातून बरे झाले आणि १९५३मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. त्यांना १९५५ साली एक मुलगा झाला. तो पुढे गायक मुकुल शिवपुत्र म्हणून प्रसिद्ध झाला. भानुताईंचे १९६१मध्ये दुसऱ्या बाळंतपणात आकस्मिक निधन झाले.

भानुमतीच्या मृुत्यूनंतर कुमार गंधर्वांनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला.

इ.स. १९६५मध्ये कुमार गंधर्वांचा 'अनूपराग' नावाच्या पुस्तकाचा पहिला खंड प्रकाशित झाला. तो कुमारांनी भानुमती कंस यांना अर्पण केला आहे. या ग्रंथात १०७ पारंपरिक रागांतील १३६ चिजा आणि कुमारांनी स्वतः शोधलेल्या १७ साध्या व १२ मिश्र रागांची माहिती दिली आहे.

भानुमती कंस या कुमारांची प्रेरणा आणि ताकद होत्या. प्रबळ इच्छाशक्ती आणि भानुमतीसारख्या पत्नीची सेवा यामुळेच कुमार गंधर्व जीवघेण्या दुखण्यातून बरे झाले होते.

भानुमती कंस यांनी गायलेली प्रसिद्ध भावगीते

अंतरिंच्या अपुऱ्या आशा

अंतरिंच्या अपुऱ्या आशा
आकारुनि कधिं येतिल का?
सांग माझ्या मानसींचीं
भावफुलें कधिं फुलतिल का? ||१||

प्रकाश सरला जीवनाचा
दिव्य किरण तव प्रीतीचा
मार्ग माझ्या जीवनाचा
कधीं सख्या उजळेल का? ||२||

काय जादू केली न कळे
वेड जिवाला तुझें लागलें
भिन्न अपुलीं दोन हृदयें
एकरूप कधिं होतिल का? ||३||