भाजे लेणी
भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन हिन्दू आणि बौद्ध लेणी आहेत.यामध्ये बौद्ध स्तूप आणि त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत. गावाजवळ ४०० फूट उंचीवर ही लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात. या लेण्यांना २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]
हा लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असावा. येथे एकूण २२ लेणी आढळतात. त्यात एक चैत्यगृह व २१ विहार आहेत. या लेणी मुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात. येथे रोज एक लाख ते दोन लाख पर्यटक येतात.[ संदर्भ हवा ] भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण द्वारे अधिसूचना क्रमांक 2407-A द्वारे हे लेणे महत्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे. हे महाराष्ट्रातील लेणे बौद्ध हिनायन पंथाचे आहे.
कलात्मक आविष्कार
येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत. त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत. यातील काही सज्जांवर कोरीव कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे. दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत. या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेलीही दिसून येतात. तसेच येथे एक यक्षिणी कोरलेली आहे. या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते.
कातळात एक चैत्यकमान कोरली आहे. या कमानीला एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत.
येथील चैत्य सुमारे १७ मीटर लांब, ८ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे.
स्तूपापाठीमागील खांबांवर बुद्धाची पुसटशी चित्रे दिसून येतात. तर चैत्यस्तूपासमोरील जमिनीवर सारीपाट कोरलेला आढळतो.
चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. लाकडी वास्तुकलेच्या संकेतांसाठी हे चैत्यगृह उल्लेखनीय आहे.
निर्माण
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात. चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत आहे.
लेण्यांतील दृश्ये
सूर्यलेणे
येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगांचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे. एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे. तर काहींना यामध्ये ग्रीकांच्या हेलिओस किंवा रोमनांच्या अपोलो देवतेचा भास होतो.
सांगीतिक महत्त्व
भारतीय संगीत कलेसंदर्भात हे लेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसते आहे. या शिवाय एक नर्तकी नृत्य करतांना येथे दिसत आहे. या कोरीव कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान दोन हजार वर्षांपासून वापरात आहे हे निर्विवादपणे सिद्ध होते.
तसेच भारतीय नृत्य परंपरा ही किमान दोन हजार वर्षे पुरातन आहे याचा पुरावा ही दिसून येतो. तबला वादनाचे हे आदिम प्राचीन लेणे पाहण्यासाठी अनेक तबला वादक भाजे लेणी अगत्याने हजेरी लावतात.
चित्रदालन
- भाजे लेणी
- प्रवेशद्वार
- चैत्यगृह
- दुमजली कोरीव विहार
- तबला वाजवणारी स्त्री आणि नर्तिका
- स्तूपाची हर्मिका
- स्तूप
हे सुद्धा पहा
- कार्ले
- पांडवलेणी
- भारतीय शिल्पकला
- महाराष्ट्रातील लेण्यांची सूची
संदर्भ आणि नोंदी
- ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)