Jump to content

भागोजी कीर

भागोजी बाळूजी कीर (०४ मार्च १८६७ - २४ फेब्रुवारी, १९४१ ) हे मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक होते. ते भंडारी समाजातील नेते समजले जातात.[]

कीर यांचा जन्म ०४ मार्च १८६७ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात आणि रत्‍नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहून गेले. ज्या वयात खेळायचे त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळूजी शेतमजूर होते. भागोजीने फुकट शिक्षण मिळत असलेल्या एका सरकारी शाळेत प्रवेश मिळवला, आणि वयाच्या १२व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले.[]

मुंबईत आगमन

मुंबईला जाण्यासाठी भागोजींनी एका तांडेलाला मुंबईत बिनपैशात पोहोचवायची विनंती केली, आणि त्याने ती मान्य केली. मुंबईत आलेल्या १२ वर्षांच्या भागोजीला एका सुताराने ठेवून घेतले आणि रंधा मारायचे काम दिले. दिवसाला दोन आणे मिळायचे. तेथे असताना छोट्या भागोजीला कचऱ्यातही लक्ष्मी दिसली. तो सुताराच्या परवानगीने लाकडाचा भुसा बाजारात विकायला लागला आणि त्याला आणखी दोन आणे मिळायला लागले. जमतील तेवढे पैसे भागोजी घरी पाठवू लागला.

एकेदिवशी भागोजीला शापूरजी पालनजी या कंपनीतले पालनजी भेटले. हा माणूस मोठमोठ्या इमारती बांधून मुंबईचे रूप बदलत होता. त्यांना भागोजी आवडला, पण त्यापूर्वी त्यांनी भागोजीची परीक्षा घेतली. लाकडाच्या भुशात पैशाच्या नोटा ठेवल्या. भागोजीला नोटा सापडल्या. तिथल्या तिथे त्याने नोटा परत केल्या. त्याच्यावर शापूरजी प्रसन्न झाले. त्यांनी भागोजीला कॉन्ट्रॅक्ट्स दिली. काही कॉन्ट्रॅक्ट्स भागोजीकडे चालून आली. सोनचाफ्यांची फुले विकून शिक्षण घेणारा हा रत्‍नागिरीचा भागोजी मुंबईचा शिल्पकार बनला.[ संदर्भ हवा ]

मुंबईतील बांधकामे

लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट्स चेंबर्स, मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक बिल्डिंग या मुंबईतील सर्व इमारती बांधण्यात भागोजीचा हात आहे. मरीन ड्राइव्हची समुद्र रोखणारी कॉंक्रीटची भिंतही त्यांनीच बांधली.[ संदर्भ हवा ]

धार्मिक कामे

भागोजी कीर हे ते गाडगेमहाराजांना आध्यात्मिक गुरू मानत. त्यांच्या सांगण्यावरून भागोजींनी आळंदीत धर्मशाळा बांधल्या, तिथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले. भागोजी कीर यांनी फक्त पैसा उभारला नाही. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्ये हाती घेतली. एक शेतमजुराचा मुलगा, श्रीमान भागोजीशेठ कीर झाला.[ संदर्भ हवा ]

भागोजींनी यांनी रत्‍नागिरीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला आणि महत्त्वाचे म्हणजे सावरकरांच्या कल्पनेतले पतितपावन मंदिर बांधून दिले. २२ फेब्रुवारी १९३१ला हे मंदिर बांधून सर्वांसाठी खुले झालं. पतितांना पावन करणारे म्हणून सावरकरांनी त्या मंदिराचं नाव ‘पतितपावन मंदिर’ असे ठेवलं. अस्पृश्यांसह सर्व हिंदूंसाठी मुक्तद्वार असलेले ते भारतातलं पहिलं मंदिर ठरले. अशा प्रकारे सामाजिक क्रांतीत भागोजी कीरांनी हातभार लावला.[ संदर्भ हवा ]

या मंदिराशिवाय भागोजींनी आणखीही काही देवळे बांधली; धर्मशाळा आणि नदीकिनारी घाट बांधले, आणि मुंबईसह पुणे, आळंदी, रत्‍नागिरी, आणि अन्य काही ठिकाणे स्मशाने बांधली.[ संदर्भ हवा ]

सावरकर भवन

शिवाजी पार्कवरचे सावरकर सदन कीरांनीच बांधले. पैसे मात्र सावरकरांनी दिले.[ संदर्भ हवा ]

दादरचे स्मशान

एकदा भागोजींच्या लक्षात आले की, दादरसारख्या सुसंस्कृत, मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही. त्यांनी सरकारकडे स्वस्त किंवा फुकट भूखंडासाठी अर्ज न करता शिवाजी पार्कला प्रचंड मोठी जागा, त्या वेळच्या बाजारभावाने स्वतःचे पैसे टाकून ती विकत घेतली. त्यावर स्मशान उभारले आणि मग त्याचं ‘लोकार्पण’ केले.[ संदर्भ हवा ] दि .२४ फेब्रुवारी १९४१ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे निधन झाले .[]

भागोजी कीर यांना मरणोपरान्त मिळालेले सन्मान

  • मुंबईत माहीम येथील एका रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे.
  • दादर स्मशानभूमीला भागोजी कीर स्मशानभूमी म्हणतात. स्मशानभूमीची ही जमीन भागोजींच्या मालकीची होती.
  • या स्मशानभूमीच्या कडेला भागोजींचा अर्धपुतळा आहे.
  • रत्‍नागिरीतील एका शाळेला भागोजी कीर यांचे नाव दिले आहे.[ संदर्भ हवा ]
  1. ^ "Who was Bhagoji Keer?". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 25 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "भागोजी कीर". स्मार्ट उद्योजक. 25 मे 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "भागोजी किर की पुण्यतिथी". Mumbai Live (हिंदी भाषेत). 25 मे 2020 रोजी पाहिले.