भाऊसाहेब हिरे
भाऊसाहेब हिरे (इ.स.चे २० वे शतक) हे मराठी समाजसुधारक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. ते निवडणुकांमध्ये मालेगाव किंवा दाभाडी मतदारसंघातुन निवडून गेले. भाऊसाहेब हिरे यांनी महाराष्ट्र शासनात अनेक मंत्रिपदे भूषविली.[ संदर्भ हवा ] भाऊसाहेब हिरे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतिशय मोलाचे योगदान आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांना सहकार महर्षी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील क्रांतिकारी कूळ कायद्याचे ते जनक होते. महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते जनक होते.[ संदर्भ हवा ]नाशिक जिल्ह्यातील हिरे घराणे स्वातंत्र्यपुर्व कालावधीपासून देशाच्या राजकीय पटलावर कार्यरत आहे. हिरे घराण्याचे आद्यपुरूष कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे अनेकविध क्षेत्रातील कार्य ‘आसेतू हिमाचल’ तसेच अजोड असेच म्हणले गेले. कर्मवीर भाऊसाहेबांचा जन्म १ मार्च, १९०५ ला निमगांव येथे झाला. सामान्य शेतकरी कुटूंबातील भाऊसाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. नाशिकला माध्यमिक तर बडोद्याला महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात एल.एल.बी. केले. बडोदा संस्थानात नोकरीची संधी त्यांना खुणावत होती. मात्र, भाऊसाहेबांनी मालेगांवला ग्रामीण गोरगरीबांसाठी सेवाभावी दृष्टीकोणातून स्वतंत्र वकीली व्यवसाय सुरू केला, पण थोड्याच कालावधीत महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांच्या विचारांनी प्रेरित झालेले भाऊसाहेब स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. १९३७ मध्ये त्यांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची प्रथमतः संधी मिळाली, खऱ्या अर्थाने येथूनच हिरे घराण्याचा राजकीय ‘‘श्रीगणेशा’’ झाला. ब्रिटिश राजवटीत भाऊसाहेबांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले म्हणून त्यांना १५ महिने शिक्षा झाली. १९४७ मध्ये ते लोकसभेवर खासदार म्हणून, तर १९५२ ला मुंबई विधीमंडळावर निवडून गेले. मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे शेतकी, वन व महसूल खात्याचा कारभार होता. त्याकाळी भाऊसाहेबांनी केलेला ऐतिहासिक ‘‘कुळकायदा’’ कोटयावधी शेतकऱ्यांसाठी वरदान देणारा ठरला. ‘‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या अमृतकुंभाचे’’ ते खरी धनी होत. आदिवासी, दुर्लक्षित, दुर्गम व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सन १९४५ मध्ये आदिवासी सेवा समिती, तर सन १९५२ मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची स्थापना केली, तर ‘‘विना सहकार नही उद्धार’’ हा सहकाराचा मुलमंत्र स्विकारत नाशिक जिल्हा बँक, खरेदी-विक्री संघ, गिरणा सहकारी साखर कारखाना, शेतकरी संघ अशा अनेक राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय सहकारी संस्था स्थापन केल्या व या माध्यमातून महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली.[१]
कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी त्यांचे जीवन प्रवासात मोठे कार्य संचित उभे केले. किंबहुना अवघी ‘मातृभुमी’ त्यांची ‘‘कर्मभुमी’’ होती. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे नेतृत्वाखाली सहभाग घेतांनाच ‘‘आदिवासी, दिनदलित बहुजनांचे शिक्षणाद्वारे कल्याण’’ याहेतुने शिक्षण क्षेत्रात कर्मवीरांनी मोलाचे योगदान दिले. भारताच्या गुलामगिरीचे व पारतंत्र्याचे मुळ अज्ञानात व गरीबीत आहे, हे ओळखून त्यांनी १५०० व्हालंटरी शाळा स्वप्रयत्नातुन कोणत्याही शासकीय मदतीविना सुरू केल्या. महाराष्ट्र साक्षरता परिषदेची स्थापना केली. सर्वकष सामाजिक प्रगती व कल्याणासाठी शैक्षणिक, सहकार व राजकीय क्षेत्रातुन समाजकार्य करणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे द्रष्टे पुरूष होते. जाती-जातीतील द्वेष, कटुता, संघर्ष मिटावा, म्हणून त्यांनी अविश्रांत प्रयत्न प्रतिकुल परिस्थितीत केले. फक्त पारंपारिकच नव्हे तर, उच्च शिक्षणाचा ही त्यांनी प्रसार केला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसादांसह अनेक राष्ट्रीय नेते भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या मालेगांव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेस भेट देऊन गेलेत.
कोयना या पहिल्या जलविद्युत प्रकल्पासाठी आग्रही प्रयत्न करणारे व सातत्याने आघाडीवर राहिलेले भाऊसाहेब गिरणा सारख्या प्रचंड क्षमतेच्या महत्वाकांक्षी जलप्रकल्पाचे शिल्पकार होत. ‘‘शेती जगली- वाचली’’ तर शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला तरच ग्रामीण जीवनात जीव राहिल, भारताची अर्थव्यवस्था कृषिवरच आधारलेली आहे. विकसीत राष्ट्राची उभारणी करायची असेल, तर कृषि क्षेत्र समृद्ध व विकसीत झाला पाहिजे. म्हणून सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी भाऊसाहेबांनी जाणीवपुर्वक योगदान दिले. सिंचनातून हरितक्रांतीचे स्वप्न कर्मवीरांनी पाहिलं व सिंचन क्षेत्रात मौलिक कामगिरी बजावली.
राष्ट्रीय अखंडता, एकता, परस्पर बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी तळमळीचे प्रयत्न करणाऱ्या भाऊसाहेबांनी सन १९६० मध्ये जपान येथे भरणाऱ्या अणुबॉम्ब विरोधी जागतिक शांतता परिषदेत उपस्थित रहाण्यासाठी गेलेल्या भारतीय शिष्ट मंडळाचे त्यांनी नेतृत्व केले आणि भारताची बाजू ठामपणे मांडून आपल्या देशाची शांतताप्रिय विश्वाची संकल्पना व भूमिका विशद केली.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील ‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे’ हे अग्रणी नेतृत्व होते. भाषावार प्रांत रचनेच्या नियमानुसार मुंबईसहीत मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे, अशी ठाम जाज्वल्य व अविचल भूमिका नाशिक जिल्ह्याचे भूमीपूत्र असलेले कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी घेतली. कारणः सन १९२० साली नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेचे तत्व स्विकारून भाषानिहाय राज्य बनविण्याचा ठराव संमत झालेला होता. पण स्वातंत्र्यानंतर यासाठी न्या.दार यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली. यासमितीने भाषावार प्रांतरचना नाकारली. एव्हढेच नव्हे तर मुंबई स्वतंत्र ठेवावी, असा उफराटा व मराठी मनास न रुचणारा सल्ला दिला. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा व खानदेश मिळून मराठी भाषिकांचे एकराज्य व्हावं, ही मराठी जनतेची भावना अव्हेरली जात असल्याचे, पाहून मराठी जनमत खवळून उठलं. आंदोलने सुरू झाली चार दिवसात ९० जण ठार झाले, एकूण १०५ जण हुतात्मे झाले. एव्हढे होऊनही केंद्र सरकार व मुंबईचे तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी देसाई ढिम्म हलत नव्हते. कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात केंद्रस्थानी होते, पक्ष श्रेष्ठींना काय वाटेल ? याची कुठलीच तमा त्यांनी बाळगली नाही, केंद्र व मुंबई सरकार विरोधात तीव्र संघर्ष सुरू ठेवला, इतकेच नव्हे तर मागणी मान्य होत नाही, म्हणून महसुल मंत्री पदाचा राजीनामाही भिरकावला. भाऊसाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर असंतोषाचे लोण अधिकच पसरू लागले. मुंबईत व दिल्लीत राजीनामा सत्र सुरू झाले. पण त्याकाळात झारीतील काही शुक्राचार्य पघळले. आमिषाला बळी पडले. महाराष्ट्र निष्ठेपेक्षा दिल्लीश्वराची निष्ठा मोठी, असं. सार्वजनिकरित्या म्हणू लागले, पण मराठी मातीतील थोर सुपूत्र कर्मवीर भाऊसाहेब हिरे आपल्या ध्येयापासून तसुभरही मागे सरकले नाहीत. अखेर दिल्ली नतमस्तक झाली व १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्थापित झाला. मराठी जनतेचे मुंबईसह एकसंघ महाराष्ट्र राज्य साकारले.
स्वतंत्रता संग्राम, सहकारिता, शिक्षण, कृषि, अर्थ, व्यापार, उद्योग, आदिवासी कल्याण तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात श्रेष्ठत्तम योगदानाबद्दल अवघा समाज ‘‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे’’ ह्या समर्पित नेतृत्वाप्रती अत्यंत कृतज्ञ आहे. सामाजिक व राष्ट्रीय उत्थानाकरिता ह्या अलौकिक प्रतिभाशाली, जाज्वल्य देशाभिमानी, जनसामान्यांचे उद्धारकर्ते, शेतकऱ्यांचे कैवारी, दीन-पददलितांचे आश्रयदाते, शिक्षण आणि सहकाराचे उद्गाते असलेल्या ह्या महान विभूतीच्या पुण्यमयी योगदानाचा कोणालाही विसर पडणे शक्य नाही.
- ^ hiray, prashant (may 2019). "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते कर्मवीर भाऊसाहेब हिरे".
|archive-url=
requires|archive-date=
(सहाय्य) रोजी मूळ पानापासून संग्रहित.|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)