भरतनाट्यम नृत्यशैलीची घराणी
भरतनाट्यम ही अतिशय प्राचीन अशी शास्त्रीय नृत्यशैली आहे.तिचा उगम तामिळनाडू प्रांतातील तंजावूर येथे झाला.भरतनाट्यमचे मूळ प्राचीन तमिळ नृत्य कुट्टू असल्याचे मानले जाते.देवळातील कोरीवकाम,लेण्या आदिमधून नृत्याच्या इतिहासाचा मागोवा घेता येतो.इसवीसनाच्या दहाव्या शतकापासूनचा काल हा आधुनिक नृत्याचा काळ मनाला जातो.या काळात स्थापत्य,शिल्प,चित्र,संगीत अशा ललित कलांची भरभराट झाली.त्यांचा सर्वदूर प्रसार झाला आणि त्या अधिकाधिक विकसित होत गेल्या.
शास्त्रीय नृत्यशैली वेगवेगळ्या काळातील कलाकारांनी वेगवेगळ्या काळात आपापल्या कल्पनाशक्तीने फुलवल्या.हे कलाकार भिन्न भिन्न प्रांतातले,वेगवेगळ्या जातीजमातीचे,निरनिराळ्या सांस्कृतिक पूर्वपीठिकेचे होते त्यामुळे त्यांच्या सादरीकरणात त्या सर्वाचे प्रतिबिंब उमटले आणि एकाच नृत्याच्या विविध शैली निर्माण झाल्या.त्या त्या प्रांताचा इतिहास,संस्कृती,भौगोलिक परिस्थिती,राजकीय घटना,सामाजिक रितीरिवाज यांचा प्रभाव नृत्याशैलीवर पडत गेला आणि त्यातून प्रत्येकीचे वेगळे सौंदर्य प्रकट झाले.प्रत्येक काळातील कलावंत,कलाशिक्षक यांनी कलेच्या वाढीस हातभार लावला.त्यातले कितीतरी लोक तर अल्पशिक्षित होते पण कलेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे.
नवनव्या कलाकारांच्या अभिनव कलाविष्कारांची भर पडत गेली.गुरूंची शिक्षण देण्याची पद्धत वेगवेगळी होत गेली आणि त्यातूनच भरतनाट्यम नृत्याची विविध घराणी निर्माण झाली.प्राचीन काळी मुख्यत्वे दोन प्रमुख घराणी मानली जात. एक तंजावूर घराणे आणि दुसरे पदनल्लूर घराणे.
तंजावूर घराणे
भरतनाट्यमचे उगम स्थान असलेले हे घराणे सर्वात प्राचीन आहे.तमिळनाडूवर राज्य करणाऱ्या चोल,पांड्य,नायक आणि मराठा राजांनी या कलेला भरपूर प्रोत्साहन दिलं.कलाकारांना गावं इनाम दिली.त्या राजांच्या पदरी शेकडो कलाकार असत.बृहदिश्वर मंदिर,नटवूनार चावडी,सदीर महाल अशा वास्तू आणि सरस्वती महालसारखे मोठे ग्रंथालय याची साक्ष देतात.सरफोजी राजे (इ.स.१७९८-१८३२)या मराठा राजांच्या दरबारात असलेल्या चेन्नय्या,पोन्नय्या ,शिवानंद आणि वडिवेल या चार तंजावूर बंधूंनी आधुनिक भरतनाट्यम नृत्याचा पाया रचला.त्यांनी नृत्य प्रस्तुतीचे नियम तयार केले.किचकटपणा काढून सुबक रूप दिले.योग्य क्रमाने नृत्य रचना केल्यास योग्य रसनिर्मिती होईल याचा खोलवर विचार करून त्यानी ‘मार्गम’ची संकल्पना मांडली.
वैशिष्ट्ये
- अंगशुद्धी-आयतम,हातांच्या ओळी,तंत्रशुद्धता
- मध्यलयीतील नृत्य
- नृत्त आणि अभिनयाचा समतोल
- रती,वात्सल्य आणि भक्ती तिन्ही भावनांचा परिपोष करणाऱ्या रचना
- मार्गमची संकल्पना
पदनल्लूर घराणे
तंजावूर बंधुंचेच वंशज असलेल्या मीनाक्षीसुंदरम पिल्लै यांनी या घराण्याची स्थापन केली.कुमारस्वामी या आपल्या काकांकडून ते नृत्य शिकले.त्याकाळी कलेची पीछेहाट झाली होती. भरतनाट्यम
करणाऱ्या देवदासींनी प्रतिकूल परिस्थितीतही कला टिकवून धरली होती.त्यांच्या कडून कलेचे ज्ञान मीनाक्षीसुंदरम पिल्लै यांनी मिळवलं.ते गुरुकुल पद्धतीने नृत्य प्रशिक्षण देत.टी.के.स्वामिनाथन,रामगोपाल अशा त्यांच्या शिष्यांनी नृत्य पाश्चात्य देशात पोचवलं.त्यांचा जावई चोकलिंगम पिल्लै,नातू सुब्बाराव,शिष्या पी.जयलक्ष्मी,अलारमेल वल्ली अशा प्रसिद्ध कलाकारांमुळे हे घराणे नावारूपास आले.
वैशिष्ट्ये
- तंत्रशुद्धता
- अभिनयाचा सखोल विचार
- पदांमध्ये लास्याचा हळुवार वापर
कलाक्षेत्रम घराणे
तंजावूर आणि पदनल्लूर घराण्यांमधून निर्माण झालेले घराणे.त्या काळी देवदासी आणि भरतनाट्यम यांना उतरती कळा लागली होती.चांगल्या घरातील मुली नृत्य शिकत नसत.१९३४ च्या सुमारास कलेला लागलेला हा बट्टा धुऊन काढण्याचे काम ई.कृष्ण अय्यर करत होते.ते स्वतः स्त्रीवेश घालून नृत्य सादर करत.त्यांचे हे प्रयत्न थोडे यशस्वी होऊ लागले.ब्राह्मण घरातील मुलीही नृत्य शिकू लागल्या.हे पाहून थिऑसॉफिकल सोसायटीच्या रुक्मिणीदेवी अरुण्डेल यांना नृत्यात रस निर्माण झाला.त्या स्वतः नृत्य शिकल्या. मीनाक्षीसुंदरम पिल्लै यांना त्यांनी मद्रासला बोलावून घेतलं.१९३७ साली त्यांनी ‘कलाक्षेत्र’ या संस्थेची स्थापन केली.अतिशय शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला. भरतनाट्यम या एकल शैलीतील नृत्याला त्यांनी समूह शैलीत सादर करायला सुरुवात केली.पारंपरिक वाद्यांबरोबरच बॅगपाईप,क्लॅरिओनेट या वाद्यांचा वापर सुरू केला.अतिशय सुरेख रंगसंगती असलेला विशिष्ट पोशाख,चोखंदळपणे निवडलेले दागिने असा वैशिष्ट्यपूर्ण आहार्य रूढ केला. मान,छाती,पृष्ठभागाच्या शृंगारिक हालचाली काढून टाकल्या आणि नृत्याला पुन्हा आध्यात्मिक अधिष्ठान मिळवून दिले.
वैशिष्ट्ये
- लास्याचा कमी वापर
- शृंगारिक हालचाली टाळणे
- टोकदार रेषा,स्पष्ट आणि कोनीय हालचाली
- हातापायाच्या ताठ पण डौलदार हालचाली
- आधुनिक सामाजिक आर्थिक राजकीय विषय नृत्यातून हाताळणे
- विदेशी कलाकारांना समजेल असे नृत्य
वजवूर घराणे
हे घराणे पदनल्लूर घराण्यानंतर उदयास आले. आधीच्या घराण्यांमध्ये अभिनय संस्कृत ग्रंथात सांगितल्याप्रमाणे केला जाई. पण सगळ्याच प्रेक्षकांना परंपरा आणि नियम माहिती असत नाहीत हा विचार करून या घराण्यात अभिनयाच्या कडक नियमांना थोडं शिथिल करण्यात आलं. अभिनय जास्त वास्तववादी झाला. रामैय्या पिल्लै हे याचे संस्थापक. के.एन.दंडायुध पिल्लै, के.जे.सरसा, उर्मिला सत्यनारायणन हे या घराण्याचे प्रसिद्ध कलावंत.
वैशिष्ट्ये
- कमरेचा वरचा भाग किंचित पुढे झुकवून नृत्य
- अडवूंची हळुवार हालचाल अनवट गती
- तांडवापेक्षा लास्य अधिक
- सौम्य मुखज अभिनय
- नृत्यलयीचा विस्तार अधिक
- स्थिर आसन स्थिती
अशा विविध घराण्यांच्या नृत्य शिकवण्याच्या, सादरीकरणाच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी या सर्वांचा गाभा भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या मूळ ग्रंथाला अनुसरूनच आहे. या विविधतेमुळे नृत्याचे सौंदर्य अधिकच खुलते.