भगिनी निवेदिता
भगिनी निवेदिता | |
---|---|
भगिनी निवेदिता | |
जन्म | मार्गारेट नोबल २८ ऑक्टोबर १८६७ अल्स्टर शहर, आयर्लंड |
मृत्यू | १३ ऑक्टोबर १९११ दार्जीलिंग, भारत |
पेशा | लेखिका, शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या |
धर्म | हिंदू, ख्रिश्चन |
भगिनी निवेदिता (२८ ऑक्टोबर १८६७ – १३ ऑक्टोबर १९११) [१] या आयरिश लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या.[२]
प्रारंभिक जीवन
मार्गारेट एलिझाबेथ नोबल असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते. भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्यांना संन्यासदीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे झाले.
उत्तर आयर्लंड येथे मार्गारेटचा जन्म झाला. सॅम्युएल आणि मेरी यांचे मार्गारेट हे पहिले अपत्य होते. नोबल कुटुंब हे धर्मजिज्ञासा, सुशीलता आणि सात्त्विकता यांच्याविषयी प्रसिद्ध होते. त्याचे वडील व आजोबा धर्मोपदेशक होते.[३]
मार्गारेटचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे झाले. देशाविषयी प्रेम, स्वातंत्र्याविषयी लढा आणि जगातील विविध प्रश्न आणि तेथे उत्पन्न होणाऱ्या विविध विचारसरणी यांचा परिणाम त्यांच्या मनावर होत होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या लंडन येथे आल्या व शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. हसत-खेळत बालशिक्षण या नव्या प्रयोगाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. १८९२ मध्ये नव्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळेची स्थापना केली.[३]
शिक्षण क्षेत्रातील अधिकाधिक प्रगती कळावी यासाठी त्यांनी 'सिसेम' मंडळाचे सदस्यत्व घेतले आणि त्यात सक्रिय सहभागही घेतला. इ.स. १८९४ च्या सुमारास क्रांतिकार्यासाठी 'सिनफेन (आमचे आम्ही) ' नावाचा पक्ष कार्यरत झाला आणि मार्गारेट यांनी त्याचे सदस्यत्व घेतले.[४]
भगिनी निवेदिता व स्वामी विवेकानंद
२२ ऑक्टोबर १८९५ रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्त्वविचार मांडून स्वतःची छाप उमटविली आणि त्यांचे सर्वदूर कौतुक झाले. त्यानंतर काही काळाने स्वामीजी लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जाऊ लागल्या. त्यांना स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे आकर्षण वाटू लागले.[५] एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे त्या आदराने पाहू लागल्या. आणि त्यामुळेच मार्गारेट या त्यांना अल्पावधीतच सद्गुरू असे संबोधू लागल्या.स्वामीजींनी त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले. निवेदिता म्हणजे ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली![६]
मानवामध्ये चारित्र्य घडण करणारे शिक्षण स्वामीजींना अपेक्षित होते, त्यासाठी महान निश्चयाने कार्य करू शकणाऱ्या व्यक्ती त्यांना हव्या होत्या. त्यांच्या या आवाहनाला मार्गारेट यांनी प्रतिसाद दिला आणि स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची मनापासून तयारी दाखविली.
२८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट भारतात आल्या. दरम्यानच्या काळात कलकत्यात राहून त्यांनी हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या. १७ मार्च १८९८ रोजी रामकृष्णांच्या पत्नी माता शारदादेवी यांच्याशी भेट झाली.[३][७]
स्वामाजींनी निवेदितांना सांगितले होते की, हिंदुस्थानासाठी कोणाही युरोपियन व्यक्तीला काम करायचे असेल तर त्याने पूर्ण हिंदू झाले पाहिजे. त्याने हिंदू चालीरीती, पद्धती ग्रहण केल्या पाहिजेत. ही साधना अवघड होती पण निवेदितांनी आपलेपणाने ह्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि हिंदुस्थान हे त्यांचे आजीवन कार्यक्षेत्र बनले.
त्यांना ब्रह्मचारिणी व्रताची प्रथम दीक्षा ०८ मार्च १८९८ मध्ये मिळाली [३] आणि नैष्ठिक ब्रह्मचारिणी दीक्षा (अंतिम दीक्षा) २५ मार्च १८९९ रोजी प्राप्त झाली. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी त्यांना सांगितले की "मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण".
२० जून १८९९ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी भगिनी निवेदिता व स्वामी तुरीयानंद यांच्या समवेत अमेरिकेला प्रस्थान ठेवले. ते ३१ जुलै ला लंडनला पोहोचले. या प्रवासाचा वृत्तान्त द मास्टर अज आय साॅ हिम या पुस्तकात आला आहे.[३]
कार्य
सामाजिक कार्य
इ.स. १८९८मध्ये मध्य कलकत्त्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निवारणाच्या कामी स्वामीजींनी निवेदितांच्या मदतीने केले. त्यामध्ये जनजागृती, स्वच्छता, रोगनिवारण या कामी त्यांनी अपरिमित कष्ट केले. [६] या कार्यामुळे तेथील लोकांच्या मनात भगिनी निवेदितांबद्दल मोठा विश्वास उत्पन्न झाला. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात निवेदितांचे शिक्षण सुरू होतेच. हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांतील विविध संकल्पना स्वामीजी त्यांना उलगडून दाखवीत होते.
इ.स. १९०६ साली बंगालमध्ये जो दुष्काळ पडला होता, त्यावेळी निवेदिता यांनी गावोगावी जाऊन मदत कार्य केले होते.[३]
बालिका विद्यालय
१२ नोव्हेंबर १८९८ रोजी शारदामाता यांच्या हस्ते निवेदितांच्या 'बालिका विद्यालया'चे उद्घाटन झाले.[८] लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठीच ही शाळा होती. या शाळेत मुलीना काय काय शिकविले जावे याविषयी स्वामीजी निवेदितांना मार्गदर्शन करीत असत. चित्रे काढणे, मूर्ती बनवणे, शिवणे, विणणे अशा विविध गोष्टी शिकून मुलींच्या हृदय आणि बुद्धीचा एकत्र व व्यवहार्य विकास कसा होईल असा विचार या शाळेने राबविला. निवेदिता बेलूर येथील आश्रमातील साधकांना शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शिक्षणशास्त्र असे विषयही शिकवीत असत.
व्याख्याने आणि जनजागृती
निवेदितांनी कलकत्त्यातील विद्वान लोकांच्या ओळखी करून घेतल्या. त्या समाजात देत असलेली व्याख्याने हे या ओळखीचे साधन ठरले. त्यांनी 'काली' या विषयावर दिलेल्या व्याख्यानाने तर त्या समाजात खूप प्रसिद्ध झाल्या आणि त्यांनी हिंदू धर्म अंतर्बाह्य स्वीकारला आहे याची समाजातील लोकांनाही जाणीव झाली. सन १९०१ पासून निवेदितांनी हिंदुस्थानासंबंधी व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि लेखनकार्यही केले. या लेखनाचे जे पैसे मिळत ते बालिका विद्यालयासाठी वापरले जात.[७] त्यांचे हे सर्व कार्य पाहून १९०२ साली त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना मानपत्रही देण्यात आले. सर्व हिंदू समाजाच्या सुख-दुःखाशी तादात्म्य पावलेली हिंदू कन्या, धर्मभगिनी, विदुषी अशा भूमिकेतून हा सत्कार झाला.
राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे कार्य
या सर्व घटनाक्रमात निवेदिताच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली आणि ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांची चिरविश्रांती. ४ जुलै १९०२ ला स्वामीजी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यांचे निधन ही निवेदिताच्या आयुष्यातील महत्त्वाचीच घटना होती. स्वामीजींची राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम आता निवेदितांनी हाती घेतले. 'मी त्यांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विवेकानंदांची, त्यांच्या अंतरंगाची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही' असा पण करून निवेदितांनी कार्यारंभ केला.
राजकीय कार्य
हिंदुस्थानचे पुनरुज्जीवन, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य याबद्दलची आस बंगाली युवकांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य निवेदितांनी हाती घेतले. निवेदितांचे हे जहाल विचार आणि हालचाली ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आल्या. मार्च १९०२ पासून सरकारतर्फे त्यांच्यावर गुप्तहेरांची पाळत राहू लागली. त्यांची पत्रे फोडली जाऊन वाचण्यात येऊ लागली. निवेदितांनी 'आशिया खंडाचे ऐक्य', आधुनिक विज्ञान आणि हिंदू मन ' अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. भारतभर चालू असलेल्या क्रांतिकार्याची ओळख आता निवेदितांना झाली होती. योगी अरविंद यांचाही क्रांतिकार्यात विशेष सहभाग होता. त्यांना भेटल्यावर निवेदिताने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा तर केलीच पण त्याच्या जोडीने एकत्रितपणे क्रांतिकार्याची धुराही सांभाळण्याचे ठरविले.
अनुशीलन समितीची स्थापना झाल्यावर युवकांच्या गटाला क्रांतिकार्यासाठी निवेदिता मार्गदर्शन करीत. डॉन सोसायटीच्या माध्यमातूनही क्रांतिकार्य चाले. या कार्यातून बंगाली तरुणांना स्वदेशभक्तीचे शिक्षण दिले जाई. निवेदिता या गटालाही मार्गदर्शन करीत असत.[९]
आपल्या युवकांसमोर आणि हिंदुस्थानासमोरच आपल्या राष्ट्राचे चिह्न असावे या भूमिकेतून निवेदिताने एक वज्रचिह्न असलेला ध्वज तयार केला. सन्मान, पावित्र्य, शहाणपण, अधिकार आणि चेतना यांचा बोध करून देणारा हा ध्वज!
स्वदेशीच्या आंदोलनात निवेदिताने स्वदेशाचा पुरस्कार करणारे लेख लिहिले. घरोघरी जाऊन स्वतः स्वदेशी वस्तुंचा प्रसारही केला. स्वदेशात व्यवसाय काढण्याच्या हेतुने, तरुणांनी परदेशी जाऊन प्रशिक्षण घ्यावे, ही कल्पना त्यांनी मांडली व अमलात आणली.
फ्रान्स, इटली, आयर्लंड, रशिया या देशातील क्रांतिकारक चळवळींची ग्रंथसंपदा मिळवून ती भारतीय तरुणांना देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. [३]
संस्कृती व कला
भारतीय कलेतील प्राचीन परंपरा,पूर्णत्वाच्या कल्पना, चैतन्य,सर्जनशीलता यांच्याशी निवेदिता एकरूप झाल्या होत्या असे म्हणता येईल.पाश्चात्य कलेची परिमाणे लावून भारतीय कलेची समीक्षा करणे थांबले पाहिजे असे निवेदितांनी आग्रहाने नोंदविले. संस्कृती व कला हे निवेदितांचे आस्थेचे विषय होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करून त्याद्वारे समाज परिवर्तन आणि राष्ट्र जागरण करता येईल असे निवेदितांचे मत होते.
१३ ऑक्टोबर १९११ रोजी निवेदिता यांनी आपला इहलोकीचा प्रवास संपविला. त्यांचे अखेरचे वाक्य हे होते की, 'मी आता चालले, तरीसुद्धा या भारतात ध्येयसूर्याचा उदय झालेला मी पाहीनच पाहीन.'[३] निवेदितांचे कार्य युवकांना आणि युवतींना सतत प्रेरणादायी असेच आहे.[१०]
मान्यवरांचे अनुबंध
भगिनी निवेदिता व जगदीशचंद्र बसू
रवीन्द्रनाथ ठाकूर, त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ ठाकूर, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू आणि अबला बसू, यासारख्या अनेक मंडळींशी निवेदितांचे अतिशय सौहार्दपूर्ण नाते होते. जगदीशचंद्र बसूंची मानसकन्या असे निवेदितांचे स्थान होते. Response in the Living and Non-Living हा बसूंचा पहिला ग्रंथ लिहिण्याच्या आणि संपादित करण्याच्या कामी निवेदितांचे खूप साहाय्य झाले होते. निवेदितानी बसूंच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख लिहून त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून दिली. बसूंच्या टिपणाच्या आधारे निवेदितांनी 'Plant Response as a Means of Physiological Investigation' हा ग्रंथ पूर्ण लिहिला.जगदीशचंद्र बसूंची 'Comparative Electro-Psysiology', 'Researches on Irritability of Plants" ही पुस्तकेही निवेदितानेच लिहिली आहेत.[१०] बसू विज्ञान मंदिर या संशोधन संस्थेच्या उभारणीमध्ये निवेदिता यांचा मोलाचा वाटा होता.[३]
भगिनी निवेदिता व अरविंद घोष
भगिनी निवेदिता व अरविंद घोष यांची पहिली भेट बडोदा येथे झाली होती. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. [११]
ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. पुढे फेब्रुवारी १९१० मध्ये ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत म्हणजे २६ मार्च १९१० पर्यंत सांभाळली होती.[१२][१३]
भगिनी निवेदिता व रवींद्रनाथ टागोर
रवीन्द्रनाथ टागोर आणि भगिनी निवेदिता यांच्यात सख्यत्व होते. रवींद्रनाथ यांच्या 'गौरमोहन' या कादंबरीतील गोरा नावाच्या पात्रावर भगिनी निवेदितांची छाप दिसते, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. १९०४ साली निवेदिता बुद्धगयेच्या यात्रेला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सोबत रवींद्रनाथ टागोर, सर यदुनाथ सरकार व जगदीशचंद्र बोस पती-पत्नी होते.[३]
भगिनी निवेदिता व अवनींद्रनाथ बसू
अवनीन्द्रनाथ यांनी चित्रकलेत एक नवा प्रकार रूढ केला होता, त्या चित्रांचे आकलन आणि रसग्रहण करून देण्याचे काम भगिनी निवेदिता करत असत. ही चित्रे वा निवेदिता यांनी केलेले रसग्रहण प्रवासी आणि मॉडर्न रिव्ह्यू या मासिकातून प्रकाशित होत असत.[३]
भगिनी निवेदिता व रमेशचंद्र दत्त
रमेशचंद्र दत्त हे सुप्रसिद्ध बंगली इतिहासतज्ज्ञ. यांना बंगालच्या साहित्य-इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. निवेदिता यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास रमेशचंद्र यांच्या मार्गदर्शनाने केला. निवेदिता यांच्या 'भारतीय जीवनातील सूत्र' या पुस्तकाचे प्रेरणास्थानही रमेशचंद्र हेच होते. निवेदितांची त्यांच्यावर श्रद्धा होती, आणि ते देखील निवेदितांना आपली कन्या समजत असत. निवेदितांच्या विनंतीवरून श्रीअरविंद यांनी रमेशचंद्र दत्त यांच्यावर मृत्युलेख लिहिला होता.[३]
विचार
भगिनी निवेदिता यांचे विचार खालीलप्रमाणे आहेत :
- कला, विज्ञान, शिक्षण उद्योग आणि व्यापार या सर्व गोष्टी यापुढे दुसऱ्या कोणत्या हेतुसाठी नव्हेत, तर भारताच्या, मातृभूमीच्या पुनर्उभारणीच्या हेतुसाठीच करायला हव्यात. [१०]
- मातृभूमीच्या पुनर्घडणीसाठी कलेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे.
ग्रंथ व व्याख्याने
भगिनी निवेदिता लिखित ग्रंथ, व्याख्याने खालीलप्रमाणे:
- द मास्टर अज आय साॅ हिम - (मी पाहिलेले गुरुदेव)
- द वेब ऑफ इंडियन लाईफ - (भारतीय जीवनातील सूत्र) हा ग्रंथ ०७ सप्टेंबर १९०३ रोजी लिहून पूर्ण झाला. श्री. रमेशचंद्र दत्त यांच्या प्रेरणेने या ग्रंथ-लेखनाला सुरुवात झाली होती. हिंदू संस्कृती आणि समाजपद्धती या विषयावरील इंग्रजी भाषेतील अत्युत्तम ग्रंथ अशी या पुस्तकाची ख्याती होती.
- जगज्जननी काली
- नोट्स ऑफ सम वाँडरिंग्स विथ द स्वामी विवेकानंद [७]
- स्टडीएस फ्रॉम अँन ईस्टर्न होम [७]
- सिविल आयडियल अँड इंडियन नॅशनॅलिटी [७]
- हिंट्स अॉन नॅशनल एज्युकेशन इन इंडिया [७]
- ग्लिम्प्सेस ऑफ फॅमिन अँड फ्लड इन ईस्ट बंगाल - १९०६ [७]
- क्रॅडल टेल्स ऑफ हिंदुइझम (हिंदुत्वातील बालरम्य गोष्टी)
- ०३ फेब्रुवारी १९०२ मद्रास येथे सत्कार, त्यावेळी केलेले भाषण ०८ फेब्रुवारी १९०२ च्या कलकत्त्याच्या अमृतबझार पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले.
- श्री.रामानंद चतर्जी संपादित मॉडर्न रिव्ह्यू या मासिकाच्या प्रकाशनाची प्रेरणा निवेदिता यांची होती. त्यांनी सातत्याने दोन वर्षे या मासिकात लिखाण केले होते.
- व्हाईसराय आणि बंगालची फाळणी - या नावाचा लेख 'एक अपरिचित कंठस्वर' या टोपणनावाने लिहिला. तो स्टेट्समन या वृत्तपत्रात प्रकाशित झाला.
- स्वामी विवेकानंद यांच्या समग्र साहित्याला भगिनी निवेदिता यांनी प्रस्तावना लिहिली.
- डॉन या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला, 'भारतीय समाज-जीवनातील ऐक्य' हा त्यांचा अखेरचा लेख होता.[३]
- फूटफॉल्स ऑफ इंडियन हिस्टरी, (पदरव भारतीय इतिहासाचे), अनुवाद - सुहासिनी देशपांडे [१४]
चरित्रे आणि निवेदितांचे चिंतनविश्व
भगिनी निवेदिता यांच्याविषयीची काही पुस्तके खालीलप्रमाणे:
- अग्निशिखा भगिनी निवेदिता (प्रा. प्रमोद डोरले)
- कर्मयोगिनी निवेदिता - डॉ सुरेश शास्त्री
- क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता - मृणालिनी गडकरी
- चिंतन भगिनी निवेदितांचे: कला आणि राष्ट्रविचार (अदिती जोगळेकर-हर्डीकर)
- चिंतन भगिनी निवेदितांचे: भारतीय मूल्यविचार (डॉ. सुरूची पांडे)
- चिंतन भगिनी निवेदितांचे: शिक्षणविचार (डॉ. स्वर्णलता भिशीकर)
- चिंतन भगिनी निवेदितांचे: स्वातंत्र्यलढा सहभाग आणि चिंतन (प्रा. मृणालिनी चितळे)
- भगिनी निवेदिता (म.ना. जोशी)
- भगिनी निवेदिता (सविता ओगीराल)
- भगिनी निवेदिता (सुरेखा महाजन)
- भगिनी निवेदिता - एक चिंतन (दिलीप कुलकर्णी, संध्या गुळवणी, चारुता पुराणिक)
- भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान (डाॅ. सुभाष वामन भावे, डाॅ अश्विनी सोवनी)
- भगिनी निवेदिता: संक्षिप्त चरित्र व कार्य (काशिनाथ विनायक कुलकर्णी).
- भारताच्या पाऊलखुणांवर ... - डॉ. सुरूचि पांडे
- विवेकानंद कन्या - भगिनी निवेदिता (वि.वि. पेंडसे)
- शतरूपे निवेदिता - अनुवादक - साने गुरुजी (डॉ. सुरूचि पांडे, डॉ. य.शं.लेले )
- भगिनी निवेदिता (इंग्रजी चरित्र-ग्रंथ) - ले. प्रव्रज्या आत्मप्राणा, रामकृष्ण आश्रम
- Fille de l’Inde (फ्रेंच), लेखक - Lizelle Reymond, E´ditions Victor Attinger, Paris and Neuchˆatel यांच्यातर्फे प्रकाशित (१९४५).[१५]
- भगिनी निवेदिता - वसुधा चक्रवर्ती, अनुवाद - प्रभाकर दांडे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, ISBN 978-81-237-5892-3 [१६]
संदर्भ
- ^ Constance Jones; James D. Ryan (2007). Encyclopedia of Hinduism. Infobase Publishing. pp. 316–317. ISBN 978-0-8160-7564-5.
- ^ Barua, Ankur (January 2020). "The Hindu Cosmopolitanism of Sister Nivedita (Margaret Elizabeth Noble): An Irish Self in Imperial Currents". Harvard Theological Review. 113 (1): 1–23. doi:10.1017/S0017816019000324. ISSN 0017-8160. S2CID 213668994.
- ^ a b c d e f g h i j k l m वि.वि.पेंडसे (१९६३). विवेकानंद-कन्या निवेदिता. पुणे: वि.वि.पेंडसे.
- ^ "Sister Nivedita Heritage Museum & Knowledge Centre". www.sisterniveditahouse.org.
- ^ The Complete Works of Sister Nivedita, Vol. I
- ^ a b Nivedita, Sister. Kali the Mother. Prabhat Prakashan.
- ^ a b c d e f g निवेदिता ऑफ इंडिया. कलकत्ता: द रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर. २००२. ISBN 81-87332-20-4.
- ^ Nivedita of India, published by Ramakrishna Mission Institute of Culture
- ^ Bonnie G. Smith (23 January 2008). The Oxford Encyclopedia of Women in World History. Oxford University Press. pp. 3–. ISBN 978-0-19-514890-9.
- ^ a b c समग्र निवेदिता पृष्ठ १४
- ^ "The Incarnate Word". incarnateword.in. 2023-03-28 रोजी पाहिले.
- ^ The Complete Works of Sri Aurobindo : Vol 36. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
- ^ The Complete Works of Sri Aurobindo: Vol 08. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
- ^ सुहासिनी देशपांडे (२०२३). श्रीअरविंद आणि महाराष्ट्र. श्रीअरविंद सोसायटी, मुंबई शाखा.
- ^ Sri Aurobindo (2006). Collected Works of Sri Aurobindo - Vol 36. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 563.
- ^ मराठी पुस्तके सूची २०१५. नवी दिल्ली: नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. २०१५.