ब्रिटनमधील क्रांतिकारी चळवळ
भारताबाहेरील क्रांतिकारी चळवळ ब्रिटन , अमेरिका व जर्मनी येथे फैलावली असली तरी तिचा आरंभ ब्रीटनमधून झाला म्हणून आपण ब्रिटनमधील क्रांतिकारी चळवळीचा तपशील पाहू या.
ब्रिटनमधील क्रांतिकारी चळवळीचा आरंभ इंडिया हाउस या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या राहत्या घरापासून झाला. अशा प्रकारच्या चळवळीचे श्यामजी वर्माचे घर हे मुख्य केंद्र असल्याने त्याला 'इंडिया हाउस ' असे नाव प्राप्त झाले. श्यामजी कृष्ण वर्मा हे लंडन मध्ये स्थायिक झाले. ते प्रखर राष्ट्रवादी भारतीय होते. परदेशी शिक्षण घेऊ इच्छीनाऱ्या होतकरू भारतीय तरुणासाठी त्यांनी प्रतिवर्षी सहा छात्रवृत्या देऊ केल्या होत्या . या वृतीसाठी निवड करताना ते भारतीय तरुणांचा राष्ट्रवाद कसून तपासून पहात असत. इ.स. १८९७ पासून त्यांनी या कार्यास आरंभ केला. त्यामधूनच इंग्लंडमध्ये क्रांतिकारी तरुणाचा एक गट संघटीत झाला. १९०५ मध्ये या गटाचे त्यांनी 'इंडियन होमरूल सोसायटी ' असे नामकरण केले व प्रचार सुलभतेसाठी 'इंडियन सोशाॅलाॅजिस्ट' हे पत्रक सुरू केले. संपूर्ण स्वराज्य हे आपले उद्दिष्ट असून आपण ते असहकार व निःशस्त्र प्रतिकाराचे माध्यमातून प्राप्त करण्याचे त्यांचे उद्धिष्ट होते आणि श्यामजी वर्मासारखे राष्ट्रवादी त्यांचे नेतृत्व करीत होते. ब्रिटनमधील हिंडमन सारख्या समाजवादी गटाचा त्यांना पाठिंबा होता. तथापि ज्या प्रमाणात 'इंडियन सोशाॅलाॅजिस्ट'ची भूमिका प्रखर झाली त्याप्रमाणात त्यावर निर्बध लादले जाऊ लागले. तेव्हा श्यामजीना आपले केंद्र लंडनहून पॅरीसला स्थलांतरीत करावे लागले.
श्यामजीच्या अनुपस्थितीत 'इंडिया हाउस ' मधील क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व प्रखर राष्ट्रवादी अशा विनायक दामोदर सावरकर यांचेकडे आले. सावरकरांना श्यामजीनीच शिष्यवृत्ती दिली होती. भारतीय तरुणांना क्रांतीचे महत्त्व विशद करण्याच्या भूमिकेतून व त्यांना क्रांतीप्र्वण करण्यासाठी सावरकरांनी युरोपीयन क्रांतिकारकाचे कार्य प्रकाशात आणण्यास आरंभ केला त्यामधूनच जोसेफ मॅझिनीचे चरित्र प्रकाशात आले. चरित्र मराठीत लिहिल्याने अनेक महाराष्ट्रीय तरुणांना त्याचा परिचय झाला. व अनेकांना क्रांतीची प्रेरणा मिळाली. नंतर त्यांनी १८५७ च्या उठावावर लिखाण करून भारतीय तरुणांच्यामध्ये आत्मविश्वास व आत्मप्रतिष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या उठावाचे त्यांनी उदात्तीकरण करून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अद्यापर्व असल्याचे परखडपणे प्रतिपादन केले.