Jump to content

बॉक्साइट

बॉक्साइट हा एक प्रकारचा खडक असून, ॲल्युमिनियमाच्या जलीय ऑक्साइडांच्या मिश्रणाचा बनलेला असतो. हा चूर्णरूप व बहुधा अंदुकाश्मी ते कलायाश्मी (गोलसर सूक्ष्म कणांच्या पुंजक्यांप्रमाणे) संरचनेचा असतो. सामान्यपणे हा कणमय तर कधीकधी संपुंजित घट्ट, मृण्मय इ. राशींच्या रूपात आढळतो. हा बहुतकरून सच्छिद्र असतो मात्र याचा पोत, संरचना व रंग यांत विविधता आढळते. हा कसा उत्पन्न झाला व कशा स्वरूपात आढळतो, यांवर त्याचे भौतिक गुणधर्म अवलंबून असतात. याची कठिनता १ ते ३ व वि. गु. २-२.५५ इतके असते. याची चमक मंद ते मातीसारखी असून याच्यातील लोहाच्या ऑक्साइडांच्या प्रमाणानुसार याचा रंग असतो. याच्या मळकट पांढरा, करडा, पिवळा, गुलाबी, तांबडा, गडद उदी इ. रंगछटा आढळतात. नुसत्या डोळ्यांनी व सुक्ष्मदर्शकानेही यातील घटक खनिजे ओळखणे अवघड असते. क्ष किरणांद्वारे केलेल्या परीक्षणानूसार गिब्साइट [AI(OH)3], बोहेमाइट [AIO (OH)], व डायास्पोर (A1O2) ही यातील प्रमुख घटक खनिजे असून त्यांच्यापैकी कोणते तरी एक विपुल प्रमाणात असते. औद्योगिक बॉक्साइटात बहुधा पहिले दोन घटक प्रामुख्याने असतात व त्यात किमान ३२% ॲल्युमिना (AI2O3) असते. अशा प्रकारे याचे रासायनिक संघटन अनिश्चित असते. याच्यात लोहाची ऑक्साइडे व मृद् खनिजे या प्रमुख अशुद्धी असून बेसाल्टापासून बनलेल्या बॉक्साइटात टिटॅनियमाचे ऑक्साइडही बऱ्याच प्रमाणात असते. अशा तऱ्हेने यात लिमोनाइट, हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, गोएथाइट, सिडेराइट, केओलिनाइट, क्लायाकाइट, ल्युकॉक्झीन, रूटाइल, ॲनॅटेज, इ. खनिजे गौण रूपात असतात आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम व मँगॅनीज यांची ऑक्साइडे अल्प प्रमाणात असू शकतात. यांशिवाय कधीकधी निओबियम, क्रोमियम, व्हॅनेडियम, झिर्कोनियम, फॉस्फरस, कोबाल्ट, निकेल, कथिल, सोने यांची खनिजे व हिरेही यात आढळले आहेत. बॉक्साईट अगलनीय (वितळण्यास कठीण, वितळबिंदू १,८२०° से.), अनाकार्य (आकार देता येणार नाही असे) व पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे) असून बंद नळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडते.[]

संदर्भ