बेबी शकुंतला
बेबी शकुंतला (जन्म : १७ नोव्हेंबर, इ.स. १९३२ - - कोल्हापूर, १८ जानेवारी, इ.स. २०१५) या मराठी-हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. इ.स. १९५४ साली बसर्गे (गडहिंग्लज तालुका) येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
प्रभात फिल्म कंपनीच्या ’दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़. त्यांनी आपल्या आयुष्यात ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. रसिक एकवेळ आख्खा ’रामशास्त्री’ चित्रपट विसरतील, पण त्यातील खणाचा परकर आणि चोळी परिधान केलेली चिमुरडी काकूबाई आणि तिने झोकात पेश केलेले ते अजरामर ’दोन घडीचा डाव’ हे गाणे कधीही विसरणार नाहीत.
बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, किशोर शाहू, बिमल रॉय, व्ही. शांताराम, केदार शर्मा, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्यासारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले आहे. बेबी शकुंतला यांच्या ’अबोली’ आणि ’चिमणीपाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत. पी.एल अरोरा यांनी काढलेल्या ’परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ’फरेब’ आणि ’लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या. पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी चित्रपटसंन्यास घेतला.
बेबी शकुंतला यांची भूमिका असलेले चित्रपट
- अखेर जमलं
- अबोली
- कमल के फूल (हिंदी)
- कलगीतुरा
- चिमणी पाखरे
- छत्रपती शिवाजी
- छमाछम (हिंदी)
- झमेला (हिंदी)
- तारामती
- दहा वाजता
- नन्हे-मुन्ने (हिंदी)
- परदेस (हिंदी)
- पिया मिलन (हिंदी)
- पूजा (हिंदी)
- फ़रेब (हिंदी)
- बचपन (हिंदी)
- बच्चोंका खेल (हिंदी)
- बिंदियॉं
- बिरान बहू (हिंदी)
- बेबी
- भाग्यवान
- मायबहिणी
- मायाबाजार
- मी दारू सोडली
- मूठभर चणे
- मोती (हिंदी)
- रामशास्त्री
- लहरें (हिंदी)
- शारदा
- शिकायत (हिंदी)
- श्रीकृष्ण दर्शन
- संत बहिणाबाई
- संत भानुदास
- सपना (हिंदी)
- सीता स्वयंवर
- सौभाग्य
पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य सरकारने १९६६ मध्ये केलेला विशेष सन्मान. त्यावेळी बेबी शकुंतला इतक्या सुंदर दिसत होत्या की तत्कालीन सांस्कृतिक खात्याचे मंत्री प्रमोद नवलकर उद्गारले की "या कितीही वृद्ध झाल्या तरी सौंदर्यस्पर्धेत पहिल्या येतील."[काळ सुसंगतता?]
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा कलाभूषण पुरस्कार
- कोल्हापूरवासीयांकडून करवीरभूषण पुरस्कार
- विविध संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार
’