बेनझीर भुट्टो
बेनझीर भुट्टो (सिंधी: بينظير ڀٽو ; उर्दू: بینظیر بھٹو ; रोमन लिपी: Benazir Bhutto;) (जून २१, इ.स. १९५३ - डिसेंबर २७, इ.स. २००७) ही पाकिस्तानातील राजकारणी व माजी पंतप्रधान होती. ती पाकिस्तान पीपल्स पार्टी या डाव्या-मध्यममार्गी पक्षाची अध्यक्ष होती. एखाद्या मुस्लिम देशाच्या सर्वोच्च नेतृत्वपदापर्यंत पोचलेली ती पहिली महिला होती[१]. इ.स. १९८८ - इ.स. १९९० व इ.स. १९९३ - इ.स. १९९६ या कालखंडांदरम्यान ती दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.
तिचा पिता झुल्फिकार अली भुट्टो हा सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिला होता. ४ भावंडांमध्ये बेनझीर सर्वात मोठी होती. तिचा विवाह पाकिस्तानी उद्योगपती आसिफ अली झरदारी ह्यासोबत झाला. त्यांना दोनदा पाकिस्तानचे पंतप्रधान पद भुषवण्याची संधी मिळाली व दोन्ही वेळा त्यांचे सरकार नियोजित कालावधी पूर्ण करण्यापुर्वीच भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून राष्टृपतींद्वारा बरखास्त करण्यात आले. दुसऱ्यांदा सरकार बरखास्त करण्यात आल्यानंतर त्या अलिखित करार नुसार लंडन येथे निघुन गेल्या. कालांतराने २००७ साली त्यांनी पुन्हा पाकिस्तानात परतायचे प्रयत्न चालु केले. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी फारसी अनुकुलता दर्शविली नाही. तरीही त्या पाकिस्तानात परत आल्या. अखेर प्रचारसभेत झालेल्या बॉंबस्फोटात त्यांची हत्या करण्यात आली. त्यामागचे नेमके सुत्रधार अजुन अंधारात आहेत.
बालपण व शिक्षण
बेनझीर भुट्टो यांचा जन्म २१ जून १९५३ साली पाकिस्तानात कराची येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाकिस्तानातच झाले. त्यापुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या. १९६९ ते १९७३ दरम्यान त्यांनी हॉवर्ड विद्यापीठात , रॅडक्लिफ कॉलेजमधुन पदवी प्राप्त केली. पुढे यादिवसांची आठवण करतांना त्यानी आपल्या आयुष्यातील सर्वात सुखद ४ वर्षे असा उल्लेख केला आहे. त्यापुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे १९७३ ते ७७ दरम्यान राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.
विवाह
१८ डिसेंबर १९८७ला त्यांनी पाकिस्तानी उद्योगपती असिफ अलि झरदारी सोबत विवाह केला. विवाहा नंतरही त्यांनी आपले भुट्टो आडनाव कायम ठेवले. त्यांना २ मुली व १ मुलगा असे अपत्य झाले. सध्या त्यांचा मुलगा बिलावल हा सुद्धा आपले आईचे आडनाव 'भुट्टो' वापरत आहे.
राजकारणातील सुरुवात
पिता झुल्फिकार अली भुट्टो यांनी बेनझीर यांना राजकारणाचे बाळकडु पाजले. झुल्फिकार अलींना पंतप्रधान पदी निवड झाल्याबरोबर ७१ साली भारतात शिमला करारासाठी यावे लागले होते. ते बेनझीरलाही सोबत घेऊन आले. बेनझीर म्हणतात त्यावेळी भारतात येतांना त्या फार साशंक होत्या. आपण शत्रु राष्ट्राचे प्रतिनिधी असल्याने आपला फार तिरस्कार वा विरोध होईल असे त्यांना वाटले. त्यांच्या वडिलांना त्यांना इंदिराजींचे निरक्षण करून काही अनुभव जोडण्याचा सल्ला दिला होता. बेनझीर सुद्धा इंदिरा गांधी पासून फार प्रभावित झाल्या. त्याहुनही त्या भारतात मिळालेल्या वागणुकीने आनंदीत झाल्या.
संदर्भ
- ^ "बेनझीर भुट्टो: डॉटर ऑफ ट्रॅजेडी"; ले.: मुहम्मद नजीब, हसन झैदी, सौरभ शुक्ला व एस. प्रसन्नराजन; नियतकालिक: इंडिया टुडे, ७ जानेवारी, इ.स. २००८; (इंग्लिश मजकूर)
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- द डेथ ऑफ बेनझीर भुट्टो - बीबीसी न्यूझ (इंग्लिश मजकूर)