बाळकृष्ण सतूराम गडकरी
बाळकृष्ण सतूराम गडकरी (२ ऑक्टोबर, १८८३ - १० डिसेंबर, १९७३) हे एक मराठी लेखक होते.
त्यांनी मॅट्रिक झाल्यावर शिक्षकी पेशा घेतला व पुढे सरकारी शिक्षक खात्यात नोकरी स्वीकारली.
गडकऱ्यांनी कथा, कविता नाटके, लेख असे विविध प्रकारचे लेखन केले. तथापि कादंबरीकार म्हणून ते गाजले. 'मनोरमा ' या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमुळे. ही त्यांची कादंबरी मासिक 'मनोरंजन'मधून 'सुधारणेचा मध्यकाळ' या नावाने प्रसिद्ध झाली. या कादंबरीत एका प्रसिद्ध मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबाच्या जीवनाचे धागेदोरे, कथानकाच्या रहस्यमय उत्कंठावर्धक गुंफणीतून उलगडत, तत्कालीन समाजजीवन व परिस्थिती यांचे प्रश्न सोडवत, रहस्याची फोड करून गडकऱ्यांनी कादंबरीचा शेवट मात्र गोड केला आहे.
विदर्भाचे हरि नारायण आपटे म्हणून ओळखले जाणाऱ्या गडकऱ्यांनी आपल्या कादंबरीतून हिंदुत्वाभिमान, सुधारणावाद, संस्कार, विचारसंपन्न विवेक यांचे सुंदर चित्रण केले आहे. त्यांच्या कथानकाची गुंतागुंतीची वीण आणि प्रभावी व्यक्तिचित्रण यांच्या कथानकाची गुंतागुंतीची वीण आणि प्रभावी व्यक्तिचित्रण यांच्या मेळातून कथा रंगतदार करण्याचे कसब त्यांच्या लेखणीतून साकारते. एकंदरीत हरिभाऊ कालखंडाच्या नंतरच्या काळातले बाळकृष्ण सतूराम गडकरी हे एक महत्त्वाचे कादंबरीकार ठरतात.
याशिवाय ‘‘महाराष्ट्र वाग्विलास’‘ नावाचे एक मासिकही त्यांनी काही काळ चालवले. हे त्यांचे मासिक दोन वर्ष चालले.
कादंबऱ्या
- दुर्दैवी प्रेमयोग
- पतितेचे हृदय
- मनोरमा
- विजया कोणास मिळाली
- विद्वान सोबती की कुशल गृहिणी
- शालिनी
- सौंदर्यदर्शन