Jump to content

बाबुराव जक्कल

सोलापूरचे सार्वजनिक काका ऊर्फ बाबुराव जक्कलहे सोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक आणि 'सोलापूर समाचार' या दैनिकाचे संपादक होते. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये इंटरमध्ये शिकत असताना महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार १९२० च्या असहकार आंदोलनाला प्रतिसाद देण्यसाठी शिक्षण अर्धवट सोडणारे, सोलापुरात आल्यावर वृत्तपत्र व मुद्रण व्यवसायात आयुष्याच्या अखेरपर्यंत व्यस्त राहिलेले, सोलापुरातील अनेक लोकोपयोगी संस्थेत क्रियाशील भाग घेणारे बाबुराव हे सोलापूरचे भूषण होते.

बालपण व शिक्षण

त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९०० साली झाला. वयाच्या ८ व्या वर्षी आईचे तर १४ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन मोठे बंधू विठ्ठलराव जक्कल यांनी केले. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. सोलापुरात त्या काळी उच्च शिक्षणची सोय नसल्याने त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांनी कॉलेजवर बहिष्कार घातला. त्यातच ते पुढे आजारी पडल्याने इच्छा असूनही पुढे पदवीपर्यंत शिकू शकले नाहीत.

कारकीर्द

१९२४ साली सोलापुरात परत आल्यानंतर ते चालवीत असलेल्या सोलापूर समाचार या साप्ताहिकाच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली. सोलापूर शहराला दैनिकाची गरज असल्याचे लक्षात आल्यांनतर त्यांनी सोलापूर समाचारचे दैनिकात रूपांतर केले. १९३६ साली सोलापूर जिल्ह्यावर त्यांनी ज्युबिली आवृत्ती काढली होती. संपादकाने केवळ कार्यालयात बसून अग्रलेख लिहिण्याबरोबरच जनमानस समजून घेण्यसाठी अनेक प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्यात भाग घेतला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. सोलापूर नगरपालिका कामगार संघटना, साहित्य परिषद अशा विविध संस्थेत ते भाग घेत. लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची आवड होती. पूर्व भागातील तेलुगु भाषिक वस्तीमध्ये त्यांनी बालसमाज नांवाची तरुणांची संघटना काढली होती. []

संदर्भ

  1. ^ लेले, रा. के. (१९७४). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉंटिनेंटल प्रकाशन.