Jump to content

बाबा वर्दम

रंगभूषामहर्षी म्हणून ओळखले जाणारे श्री. बाबा वर्दम हे चित्रपट रंगभूमीवरील सुप्रसिद्ध रंगभूषाकार होते. समर्थ कलामंत्रांनी रंगभूमी सजीव व सुंदर करणाऱ्या बाबांनी रंगभूषा कलेत कुडाळ नगरीचे नाव भारतीय कलाक्षेत्रात मोठे करून ठेवले आहे २ एप्रिल १९७५ ला बाबांचे देहावसान झाल्यानंतर नाट्यकला जोपासण्यासाठी त्यांचेच नाव धारण करून 'बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ' ही कोकण रंगभूमीवर प्रकर्षाने चमकणारी पहिली हौशी नाट्यसंस्था निर्माण झाली.

रंगदेवतेचा तपस्वी पुजारी


रंगभूषामहर्षी 'बाबा वर्दम'

चरित्र :

६०-६५ वर्षांपूर्वीची कुडाळमधल्या समादेवीच्या पिंपळाशेजारी पूज्य. दादा वर्दम यांच्या घराच्या माडीवर १०-११ वर्षाच्या ७-८ सवंगड्यांची गायन-वादन, अभिनय आणि रंगभूषेतील स्वैर लिला चालत असे. मारुतीच्या देवळात ‘सप्ताह’ असो, भजन असो, दशावतारी नाटक असो वा तुळशीचे लग्न असो. हे टोळकं तिथे हजर असे. जो तो आपल्या छंदात भर पडणारे तेवढे नेमके उचलून आपल्या इवल्याशा देहात दडून राहिलेल्या कला प्रतिभेला जोपासत असे.

गवयाच्या गाण्यातल्या हरकती, ताना त्या घोळक्यातील देसाईंचा वसंत आणि टोपल्यांचा शिरी आपल्या तरल बुद्धीने पटकन टिपीत असत तर तबल्याच्या बोलांनी आणि मुखड्यानी लकू वर्दमांच्या डोक्यात केव्हाच ‘तिरकिट धा’ सुरू केलेले असायचे. बांदेकर, राजाराम वर्दम आणि रामा कोरगांवकार अभिनयातले भाव टिपण्यात गर्क तर हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरील पांडु वर्दमांच्या चपळ, चपखल बोटांनी गवयाचा ‘सूर’ केव्हाच आपलासा केलेला असे. त्या टोळक्याचा म्होरका मात्र रंगलेल्या पात्रांच्या मुखड्यावरील रंगरंगोटीची करामत आपल्या टपोऱ्या डोळ्यात साठवत केव्हाच रंगलेला असे. हे होते वर्दमांचे 'बाबा'. शांतू कासार, तुकाराम पडते, बाबली कुडाळकार आणि राजो माटेकर या सवंगड्यांसह या तरुण कलाकारांनी बेबंदशाही, करीन ती पूर्व, जुगारी जग अशी कितीतरी नाटके गाजवली. शाळेतला इतिहास, भूगोल धडाधड पाठ करण्यापेक्षा ही टोळभैरव मंडळी शाळेकडे पाठ करती झाली आणि आपला स्वतःचाच इतिहास घडवायला बाहेर पडली.

वाढत्या वयाबरोबर वाढत्या जबाबदाऱ्या या मंडळींच्या अंगावर चालून आल्या आणि प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या. देसाईंच्या वसंताने कोल्हापूर गाठलं. दादा वर्दमांच्या छायेत दिवस काढलेल्या शिरीने सावंतवाडीला हॉटेल थाटल. जाणता बाबा, दादांच्या दुकानात मिठाई रंगवू लागला. पण बाबांच कलावंत मन स्वस्त बसत नसे. “आयुष्य मेवामिठाईच्या रंगात नाही घालवायचं. अशी रंगरंगोटी साधायची की ती जीवनाला खरा ‘रंग’ चढवील.” पण कुडाळ गावी ती संधी कधी मिळणार?

बेचाळीसमधील दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असलेल्या महागाईने बाबा व्यवसायाच्या व्यापात फसले होते. महागाईने त्रस्त झालेले कलाप्रेमी बाबा अस्वस्थ झाले. माथी कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाची जबाबदारी या दुहेरी पेचात सापडलेल्या बाबांचा निर्णय ठरला. कुडाळ बाजारपेठेत तुळशीच्या लग्नाचा धुमधडाका सुरू होता. बाबांनी रातोरात सावंतवाडी गाठली आणि लंगोटीयार शिरींकडे मुक्काम ठोकला. ‘एवढ्या रात्री बाबा आपल्याकडे ?’ शिरी टोपलेही चमकले. बाबांनी मनोगत व्यक्त केलं. सार बालपण शिरींच्या डोळ्यासमोरून सर्रकन गेल. शिरींनी आपली अल्पस्वल्प प्रेमभेट आणि आपला कोट बाबांच्या हाती ठेवला आणि जड अंतःकरणाने बाबांचा निरोप घेतला. बाबांनी कोल्हापूर गाठलं आणि तेथून मुंबई. बाबा निघाले. खांद्यावर परिश्रमाची पताका, हाती कलेचे टाळ आणि मुखी ध्येयमंत्र घेऊन बाबा जीवन यात्रेला निघाले. पूज्य दादांचा आभाळाएवढा आशीर्वाद आणि स्नेह्यांचे उबदार प्रेम पाठीशी घेऊन बाबा निघाले. तरुण उत्साही बाबा परिश्रमाच्या कुंचल्याने नशिबाची रंगछटा चितारू लागले. मुंबईतल्या पाच-सात मजली इमारतींच्या भिंतींना बाबा उन्हातान्हात रंगरूप देऊ लागले. मग जेवण मिळाल न मिळाल. कधी एकवेळ तर कधी चहापाव.

भिंती रंगवायच्या, पोस्टर्स रंगवायचे, जाहिराती रांगवायच्या…. ” पण हे सगळ काम हे निर्जीव कुंचलेच तर करीत आहेत. तुझी बोट कुंचल्याच काम कधी करणार ?”- बाबांची रंगप्रतिभा बाबांना प्रश्न विचारात होती. या प्रश्नाचं उत्तर बाबांपाशी नव्हतं. ते होत पूज्य दादांच्या पुण्याईजवळ रखरखत्या उन्हात रंगकाम करून कंटाळलेल शरीर बाबांनी शिवाजीपार्कच्या ‘परिमल’ मध्ये बळेच लोटलं. समोर उभे होते राजकमल कलामंदिराचे सुप्रसिद्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, नव्हे देसाईंचा वसंत. दोन जीवलग मित्रांची भेट झाली, बाबांचा राजकमल कलामंदिर मध्ये प्रवेश झाला आणि बाबांच नशीब नवरंगानी फुलून आल. प्रामाणिक, मेहेनती, ऋजू स्वभावाच्या बाबांवर अण्णा बेहद्द खूष झाले. आणि अण्णांनी राजकमल कलामंदिरची ड्रेपरी, ज्वेलरी, रंग यांची खरेदी नव्हे रंगपटातील सर्व जबाबदारी बाबांवर सोपवली. डोळस, प्रयोगशील बाबांवर सोपवली. डोळस, प्रयोगशील बाबांनी दिग्दर्शक शांतारामबापूंना जिंकलं आणि ‘झनक झनक पायल बाजे’ त बाबांच्या रंगकौशल्याने उधळण केली.

नवनवीन चित्रपटांच्या रंगभूषेत रंगभूषाचार्य घडवला जात होता. बाबांच्या पूर्वायुष्यातील परिश्रमांची तपश्चर्या बाबांकडे पाहून हसू लागली. बाबांचे नाव रंगभूमिवरही झाले. मेकअपचे दुसरे नाव ‘बाबा वर्दम’ असे झाले. बाबांनी ‘वर्दम मेकअप सर्व्हीस’ नावाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि बाबांच्या श्रमांची शर्यत सुरू झाली. श्रमाबरोबरच रंगकलेचा व्यासंग वाढला आणि त्या व्यासंगाने बाबांना ‘रंगभूषामहर्षी’ केव्हा केलं ते बाबांनाही कळलं नाही. ते कळलं एका प्रज्ञावान कलावंताला- पु. ल. देशपांड्यांना. त्यांनी बाबांच्या घरी रात्रीच्या वेळी येऊन बाबांना चकित केलं आणि ‘तुम जियो हजारो साल’ असं अभिष्ट चिंतून बाबांचा वाढदिवस साजरा केला. कलावंत बाबांच्या आयुष्यातील तो एक कृतार्थ क्षण !

आपल्या समर्थ कलामंत्रांनी रंगभूमी सजीव व सुंदर करणाऱ्या बाबांच्या बोटांवरील रंगटिळा आपल्या भाळी लागला याचे भाग्य रंगभूमीवर व चित्रपटात नावाजलेले जुने-नवे कलाकार आजही मोठया अभिमानाने मिरवतात तेव्हा बाबांच्या रंगसामर्थ्याचा प्रभाव केवढा जबरदस्त आहे याचा प्रत्यय येतो. बाबांच्या या रंगसंजीवक कलामंत्रांचा जागर ज्यांच्या हाता-बोटांतून आजही रंगभूमी चित्रपट क्षेत्रात चालू आहे असे राम टिपणीस, पंढरीनाथ जुकर, शशिकांत साटम, शंकरभाई वर्दम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर, नंदू वर्दम, राजन वर्दम यांच्यासारखे कितीतरी प्रथितयश रंगभूषाकार आपल्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय कै. बाबांच्या शिस्तप्रिय व ऋजु स्वभावाला आणि विनम्र कलासाधनेला देतात तेव्हा रंगपटाला गाभारा मानणाऱ्या या रंगदेवतेच्या तपस्वी पुजाऱ्या समोर आपोआपच नतमस्तक होतो.

References

https://babavardam.in/ Archived 2019-12-31 at the Wayback Machine. मोठा मजकूर