Jump to content

बाणगंगा तलाव

बाणगंगा तलाव, वाळकेश्वर

पौराणिक कथेनुसार दक्षिण मुंबईतील पौराणिक वाळकेश्वर मंदिर परिसरात असलेला हा तलाव प्रभु श्री रामाच्या काळखंडातील आहे.प्रभु श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या ठिकाणी थांबले होते.त्यांना समुद्राच्या खारट पाण्याजवळ जवळपास गोडे पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांनी जमिनीवर एक बाण मारला व त्यामधून गोड्या पाण्याचा झरा निर्माण झाला तोच बाणगंगा म्हणून ओळखला जाऊ लागला. अरबी समुद्राच्या जवळ असूनही ह्या तलावात वर्षभर गोडे पाणी उपलब्ध असते. जेथे बाण मारला असे समजले जाते तिथे एक खांब आहे.

प्रत्येक वर्षी देवदिवाळीला येथे दिपोत्सव साजरा केला जातो. देवदिवाळी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. महाराष्ट्र राज्य टुरिझम विकास संस्था आणि गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर न्यासातर्फे येथे काशीमठ मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर आणि इतर मंदिरात आरती व पूजा केली जाते.

समाधीस्थळे

येथे इसवी सन १७४२ साली माधवेंद्रतीर्थ स्वामी ह्यांच्या पुढाकाराने गौडसारस्वत परंपरेतील काशीमठाची शाखा स्थापन करण्यात आली.१७७५ मध्ये त्यांनी येथे संजीवन समाधी घेतली. इसवी सन १९१४मध्ये गौडसारस्वत परंपरेतील वरदेंद्रतीर्थ स्वामींनीही ह्याच परिसरात समाधी घेतली.इसवी सन १९३६ मध्ये नाथ संप्रदायाच्या सिद्धरामेश्वर महाराजांची मृत्युपश्चात बांधलेली समाधी येथे आहे.[]

बाणगंगा तलाव सौंदर्यीकरण

बाणगंगा ते अरबी समुद्र मार्गिकेसह तलावाभोवती भक्ती परिक्रमा मार्ग बांधून ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराचा जिर्णाद्धार करण्यात येणार आहे.हा पुनर्जीवनीकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे.या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत. तलावातील गाळ काढणे, पाणी स्वच्छ करणे, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती परिक्रमा मार्ग’ म्हणून विकसित केला जाणार आहे.तलावाकडे जाणारा रस्ता तयार करणे आणि बाणगंगा ते अरबी समुद्र मार्गिकेची निर्मिती अशी कामे तीन टप्प्यांत केली जाणार आहेत.वाराणसीच्या धर्तीवर या परिसराचा जिर्णाद्धार करण्यात येणार आहे. सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक १६ दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन दृष्टिपथात आहे.दीपस्तंभ पुनरुज्जीवनासाठी उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचा वापर केला जात आहे. तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करण्याचे कामही सुरू आहे. तलावाच्या आजूबाजूची अतिक्रमणे हटवून तलाव परिसरात परिक्रमा मार्ग तयार करण्यात येणार आहे.परिसरात मंदिरे, रामकुंड, समाधी, धर्मशाळा, मठ आहेत. राष्ट्रीय महत्त्व असलेले हे सांस्कृतिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हे स्थळ पर्यटन केंद्र घोषित केले आहे.[]

संदर्भ

१. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

२. http://tourism.gov.in/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स मंगळवार ६ जुलै २०२१
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४