बाटी
बाटी हा भारत देशाचे राजस्थान राज्यातील वाळवंटी प्रदेशातील खाद्य पदार्थ आहे.[१] तो गव्हाच्या पिठाचे गोळे करून निखाऱ्यावर भाजून बनविला जातो. तो मध्य प्रदेशातील खारगाव, पूर्व उत्तर प्रदेश विभागातील वाराणसी आणि पश्चिम बिहार मध्येही बनविला जातो.
बाटीचा आकार गोल, त्रिकोणी, गोळा स्वरूपात असतो आणि त्यात कांदा, लसूण, सातू यांचे मिश्रण समाविष्ट करतात. बाफळा हा एक बाटीचाच प्रकार आहे मात्र तो नरम असतो. हे पदार्थ साजूक तूप, गरम डाळ तडका व चटणी बरोबर खातात. दाल बाटी बरोबर कुरमा दिला जातो. हा बीट मिक्सरवर किंवा खिसणीवर बारीक करून त्यात साजूक तूप, साखर घालून बनवितात.
डाळ बाटी कुरमा
ही जेवणाची एक पूर्ण थाळी आहे. डाळ तयार करण्यासाठी ५०% उडीद डाळ, व उर्वरित चणा आणि मूग डाळ वापरतात. बाटीसाठी गव्हाच्या कणकीचे लहान लहान घोळे बनवितात. हे गोळे निखाऱ्यावर भाजून साजूक तुपात बुडवून ठराविक पद्धतीने बनविलेल्या मातीच्या भांड्यातून देतात. चमचमीत लाल मिरची, लसूण आणि हळद पूड किंवा चणाडाळीचे बेसनाचा तडका देऊन लहानशा बादलीतून डाळ देतात.
राजस्थान मध्ये ही डिश विशेषतः लग्न समारंभ, वाढदिवस, कौटुंबिक समारंभात खास करून दिली जाते.[२]
कुरमा ही विशेषतः गोड डिश आहे. याच्यात साखर किंवा गूळ वापरतात. ही चविष्ट बनण्यासाठी साजूक तूप घालतात. शिवाय यात काजू, बदाम, पिस्ता, बेदाणाही घालतात. ही डाळ बाटी बरोबर दिली जाते.
डाळ बाटी थाळी
मध्य प्रदेशात इतर खाद्य पदार्थाबरोबर डाळ बाटी दिली जाते.[३] उदाहरणार्थ निखाऱ्यावर भाजलेल्या वांग्याचे भरीत किंवा भाजलेले बटाटे, बेसन आणि साजूक तुपात तयार केलेली ताकाची कढी हे पदार्थ डाळ बाटी बरोबर देतात. त्याने थाळीत पातळ पदार्थाची भर पडते. डाळ बाटी विविध पिठापासून बनविली जाते त्यामुळे तहान खूप लागते. ही शारीरिक अडचण कमी होण्यासाठी कढीचा चांगला उपयोग होतो.
मध्य प्रदेशात व राजस्थान मध्ये चणाडाळ बेसन आणि इतर कडधान्यांपासून गट्ट्याची भाजीही बनवितात. ही थोडी कमी तेलकट असते. ही सुद्धा डाळबाटी थाळीत असते.
हळद, मीठ, टोमॅटो, लसूण घालून तयार केलेले कैरीचे लोणचे, खर्डा, मीठ, या बाबीही थालीत असतात. पश्चिम मध्यप्रदेशात माळवा प्रांतात केशर, साखर, लवंग घालून केलेला गोड भातही या थाळीत असतो. याबरोबरच कोशिंबीर ही खातात.
संदर्भ
- ^ "राजस्थानी पारंपारिक पाककृती".
- ^ "डाळ बाटी कुरमा - प्रसिद्ध राजस्थानी थाळी". 2016-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-01 रोजी पाहिले.
- ^ "मध्य प्रदेशातील पारंपारिक पाककृती". 2023-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-28 रोजी पाहिले.