बहिर्जी नाईक
बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लष्करी कमांडर होते. ते रामोशी समाजातील होते, ज्यांचे सदस्य त्यांच्या लवचिकतेसाठी आणि बलवान लढाऊ म्हणून ओळखले जात होते.[१][२][३]
बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे गुप्तचर प्रमुख म्हणून त्यांच्या पद्धतींमध्ये निर्विवादपणे यशस्वी होते.[४] त्यांची समाधी सध्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भूपाळगड (बानूरगड) येथे आहे. त्यांचा जन्म शिंगावे नाईक ता. नगर, अहमदनगर या गावी झाला. १६९२ मध्ये बहिर्जीचा मुलगा तुकोजी नाईक याने राममंदिर आणि शिंगावे गावाची बाहेरची सीमा बांधली. त्यांच्या नावाचा शिलालेख असलेला एक दगड राममंदिरात ठेवण्यात आला आहे.
बहिर्जींच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी फारसे माहिती नाही आणि तेव्हाही नव्हते. पण त्यांनी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून केलेल्या मोहिमा आणि साहसांनी मराठा साम्राज्याच्या यशात मोठा हातभार लावला.[५] बहिर्जी त्यांच्या मोहिमांच्या प्रत्येक पैलूंबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात तरबेज होते आणि छत्रपती शिवाजींच्या अनेक आश्चर्यकारक पराक्रमांमध्ये श्रेय बहिर्जी नाईक आणि त्यांच्या लोकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता.
कामाच्या पद्धती
बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचे चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करून जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा बहिर्जीना एकदा देखील पकडू शकले नाहीत, यातच बहिर्जी नाईक जाधव यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय बहिर्जीनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना कळे. त्यात पक्षांचे, वाऱ्यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी बहिर्जीना माहीत असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती बहिर्जी काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असे म्हणले जाते की, महाराजांच्या दरबारात बहिर्जी जर वेशांतर करून आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक जाधव नावाचा इसम नाहीच, अशी सर्वांची समजूत असायची.
बहिर्जी नाईक जाधव फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहीत होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फक्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत.
शिवाजी राजे व संभाजी राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत बहिर्जीचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपऱ्यांत लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर आधी केले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक जाधव महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत बहिर्जीनी शत्रूची इत्यंभूत माहिती महाराजांना दिली होती. महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील बहिर्जी त्या खात्याचे प्रमुख होते.
सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अश्या रीतीने बहिर्जी नाइक जाधवांच्याबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.
महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धान्त मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हणले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धान्त कौटिल्य मांडतो.
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्या द्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेरव्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक जाधव यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.
बहिर्जी नाईक जाधव यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणाऱ्यास शिवरायांनी इनाम जाहीर केले, तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात, तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.
स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजलखानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजलखानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही. पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते, असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदळ, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.
इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा निःसंदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडे देखील जाते.
शाहिस्तेखान प्रसंगातदेखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे (हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐन वेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती.). तसेच रमझानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करायची योजना आखली आणि ती यशस्वी केली. (राजे सहिष्णू वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी ‘रमझान महिना’ संपण्याची वाट पाहिली नाही.).
शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे २०,००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.
तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले.
बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटीदरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही, केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसांत सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.
आग्ऱ्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या बुद्धिमत्तेची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता.
शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद-बुंदेलखंड-खानदेश-गोंडवन-गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.
शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगांनी भरलेले आहे. जेथे फक्त पराजय शक्य आहे अशा प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या असून लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली.
बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखातदेखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्थंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाण-घेवाण करणे आणि त्यांत समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हणल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनीदेखील त्यांचे महत्त्व ओळखून हेरखाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेरखात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेरखात्यास साधनसामग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३००० हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेरखाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंद फितुरीने भरलेला असूनदेखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही.
इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेरयंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक जाधव’.
गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळातदेखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते हे मान्य करावे लागेल.
बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आताच्या हेरव्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. ‘रॉ’ बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ‘आयएसआय’, ‘सीआयए’ शी त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल पण ती उलटय़ा बाजूने करावी लागेल म्हणजे- मोसाद म्हणजे इस्राइलचे बहिर्जी असे म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल.
जेम्स बॉंड असो किंवा शेरलॉक होम्स, ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्रे वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आहे आणि लोक ते पाहण्यास जातात.
जेम्स बॉंड किंवा शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात जी कामिगरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, शिवरायांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्या साहित्यात आणि दृक्श्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा १९४३ सालचा सिनेमा, २-४ छोटेखानी पुस्तके, भूपाळगड (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एकाकी समाधी (की बाणूरगड ता. खानापूर जि.सांगली येथील समाधी?) आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली आदरांजली.. !
बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात.
बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणाऱ्या हेन्री ओग्झेन्डनचा हा भाऊ). सुरतची लूट चालू असताना वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा. महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले हे त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले होते. पण त्यावर कृती होण्याआधीच सुरतेची लूट झाली.
२१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो.बहिर्जी तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तरना इतिहासकारांपाशी आहेना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!!
बाणूरगड (म्हणजेच भूपाळगड) महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. येथून पुढे सोलापूर जिल्हा सुरू होतो. मराठी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी त्या बाणूरगडावर आहे
- बहिर्जीच्या जीवनावर पंडित कृष्णकांत नाईक यांनी लिहिलेले 'बहुरूपी हेर बहिर्जी नाईक' हे छोटेखानी-२४पानी- पुस्तक आहे. (याच लेखकाचे 'बुद्धीसागर नाना फडणीस' हे ३२ पानी पुस्तक आहे.)
- बहिर्जी नाईक (लेखक- प.रा. दाते)
चित्रपट आणि पुस्तके
- बहिर्जी नाईक हा मराठी भाषेतील चित्रपट १९४३ साली प्रदर्शित झाला
- फर्जंद या मराठी भाषेतील चित्रपटात बहिर्जी नाईक यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली होती
- फत्तेशिकस्त या मराठी भाषेतील आणखी एका चित्रपटात बहिर्जी नाईक यांची भूमिका अभिनेता हरीश दुधाडे यांनी साकारली होती.
- 2014च्या भारतीय एपिक टीव्ही अँथॉलॉजी दूरचित्रवाणी मालिकेचा पहिला भाग, अद्रश्य, नाईकबद्दल आहे.
- निखिल रविंद्र कुवर लिखित "शिवदूत बहिर्जी नाईक - नायक एक, चेहरे अनेक" आगामी मराठी चित्रपट.
भालजी पेंढारकरांनी 'बहिर्जी नाईक' नावाचा चित्रपट १९४३ साली काढला होता. चित्रपटात शांता जाधव, विमल कर्नाटकी, सूर्यंकांत, मास्टर विठ्ठल, ग्रामोपाध्ये, जयशंकर दानवे, गणपत बकरे, झुंझारराव पवार, ग.दि. माडगुळकर, प्रभाकर मुजुमदार, विनय काळे, बर्चीबहाद्दर, शंकरराव भोसले यांच्या भूमिका होत्या. संगीत ग.दि. माडगुळकर यांचे होते. हा प्रभाकर पिक्चर्सचा पहिला चित्रपट होता.
संदर्भ
बहिर्जी नाईक रामवंशी रामोशी बेरड समाजातील होते
- ^ Institute, Deccan College Post-graduate and Research. डॉ. ए.एम. घाटगे, संचालक, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था. pp. 52 कोट: "शिवाजीकडे बहिर्जी जाधव नाईक या नावाने स्वतंत्र गुप्तचर विभाग होता. त्यांच्या आडनावावरून बहिर्जी हे मराठा जातीचे असल्याचे दिसते. तथापि, अशी परंपरा आहे की ते रामोशी होते.". १९७८.CS1 maint: others (link)
- ^ "बहिर्जी नाईक यांचे स्वराज्य कार्य प्रेरणादायी – भिडे गुरुजी". Loksatta. 2022-01-04 रोजी पाहिले.
- ^ "Berads: Renowned fighters of the Deccan". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-01-04 रोजी पाहिले.
- ^ Singh. The Pearson Indian History Manual for the UPSC Civil Services Preliminary Examination (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. ISBN 978-81-317-1753-0.
- ^ Singh. The Pearson Indian History Manual for the UPSC Civil Services Preliminary Examination (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. ISBN 978-81-317-1753-0.