बसवेश्वर
महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू असून त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११३१ साली अक्षय्य तृतीयेला झाला.
कौटुंबिक पार्श्वभूमी
तत्कालीन मंगळवेढा राज्यावर कलचुर्य राजा बिज्जल राज्य करीत होता. महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११३१ साली वैशाख शुद्ध तृतीया, (अक्षय्य तृतीया) या दिवशी ब्राह्मण अग्रहार प्रतिष्ठित कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला ११३१ला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मादिराज आणि आईचे नाव मादलांबिका होते. महात्मा बसवेश्वरांच्या मोठ्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव अक्कानागम्मा होते. वयाच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळविण्यासाठी ते कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे गेले, ते वीरशैव प्राचीन अध्ययन केंद्र होते. तेथे महात्मा बसवेश्वरांनी काही वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.
महात्मा बसवेश्वर आणि शरण चळवळ
अग्रजापासून अंत्यजापर्यंत सर्वजण महात्मा बसवेश्वर महाराजांच्या शरण चळवळीत सामील झाले. त्या चळवळीत झालेल्या सहभागी पुरुषांना आणि स्त्रियांना लिंगदीक्षा घेऊन गळ्यात शिवलिंग धारण केल्यानंतर अनुक्रमे शरण-शरणी अशी नावे मिळाली. शरण चळवळीचे रूपांतर पुढे वीरशैव लिंगायत धर्म प्रचार व प्रसरामध्ये झाले. लिंग धारण केलेल्या शरणांची पूर्वाश्रमीची जात नष्ट झाली. अग्रज-अंत्यज यांच्यात रोजी बेटी व्यवहार सुरू झाले जातीच्या भिंती तुटून पडल्या महात्मा बसवेश्वरांच्या शरणचळवळरूपी झाडाला समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह याची फळे आली. समाजाच्या प्रत्येक थरातून स्त्री-पुरुष महात्मा बसवेश्वरांच्या वीरशैव लिंगायत चळवळीत सामील झाले, ते शरण झाले. शरण म्हणजे गळ्यात शिवलिंग धारण करून शरण परिवारात राहणारा, वचनांवर विश्वास ठेवणारा, नित्य, सत्य-शुद्घ दासोह करणारा, चर्चा-अनुभाव-अनुभव करणारा, लिंग-जाती इ. भेद न मानणारा, मुक्त व्यक्ती म्हणजे शरणी-शरण पण हीच व्याख्या २१ व्या शतकाला अनुसरून करावी लागेल, ती अशी होईल- निजमुक्त, निर्मोही, जाती-लिंग-वर्ण-वर्ग इ. भेद विरहित, कायकनिरत, दासोही, अनुभवी म्हणजेच शरण
मातंग चेन्नय्या, डोहर कक्कय्या, हडपद अप्पाण्णा, नुलीय चंदय्या, कुंभार गुंडय्या, चांभार हरळय्या, अंबिगर चौडय्या, मेदार बुरुड केतय्या, तुरुंगाहि रामण्णा, मादार धूळय्या, वैद्य संगण्णा, कन्नप्पा तेली, किन्नरी बोमय्या, अल्लमप्रभु, बहुरूपी चौडय्या, शरण सुरय्या, शरण उरलिंगदेव हे शरण शुद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या जातीतून बसवांच्या चळवळीत सहभागी झाले. सुळे सक्कव्वे, सुळे पद्मलदेवी, सुळे चामलदेवी यांसारख्या वेश्या बसवाच्या विचाराला प्रभावित होऊन शरणी झाल्या. वेश्या आपला पूर्वाश्रमीचा व्यवसाय आणि पूर्वाश्रम सोडून पुण्यांगना झाल्या. चोर, लुटारू, दरोडेखोर यांनी आपले दुष्कृत्य सोडून दिले. ते शरण बनले. दारू विकणारा हेडद मारय्या वाटसरूंच्या सेवेसाठी पाणी, दूध आणि ताक विकायला लागला.
सर्वजण दुष्कर्मे सोडून सदाचारी बनले,शरण बनले. महात्मा बसवेश्वरांनी ऐतखाऊ लोकांचे मनपरिवर्तन केले. त्यांना कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले. कायकाकवे कैलास, श्रम हाच ईश्वर हा मूलमंत्र महात्मा बसवेश्वरांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिला. श्रमाला व्यवसायाला कायकाला मानाचे, सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. दिवसभर कष्ट करून शरण संध्याकाळी अनुभवमंटपात एकत्र येत. विचारविनिमय, चर्चा करत. शरणांच्या स्वानुभवातून वचने जन्माला आली. तीच वचने म्हणजेच भारतीय संविधानाचा गाभा आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये शरणांच्या समताधिष्ठित वचनात दडली आहेत.
समाजातील प्रत्येक घटकाने सदाचाराने आचरण करावे. नितिनियमांचे पालन करावे. अनाचार करू नये. चोरी, क्रोध, राग, स्तुती, मत्सर, आत्मस्तुती करू नये असे महात्मा बसवेश्वर एका वचनात सांगतात. महात्मा बसवेश्वर म्हणतात, "चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, रागावू नको, इतरांचा तिरस्कार करू नको, दुसऱ्याची निंदा करू नको, हीच अंतरंगशुद्धी, हीच बहिरंगशुद्धी, हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीत आहे.
आयुष्यभर मला शरणांची सेवा करण्याची संधी मिळावी, असे महात्मा बसवेश्वर वचनात सांगतात, "मंदिराचा कळस बनून कावळ्याच्या विष्टेने अपवित्र होण्यापेक्षा शरणांच्या पायातील पादुका करा, मज कूडलसंगमदेवा.
सदाचारी कायकनिष्ठ शरणांची तुकडी बसवण्णांनी उभी केली. कष्टानेच शिवाची पूजा केली. कल्याणच नव्हे तर कल्याणच्या आसपास, संपूर्ण दक्षिण भारतात, संपूर्ण उत्तर भारतात, इराक-इराण अफगाणिस्तानपर्यंत महात्मा बसवेश्वरांचा विचार जाऊन पोहोचला. त्या विचाराने प्रभावित होऊन शरण कल्याणच्या अनुभवमंटपाकडे येऊ लागले. कल्याण म्हणजे सध्याचे बसवकल्याण. हे क्रांतीचे केंद्र बनले. अफगाणिस्तानपर्यत महात्मा बसवेश्वरांचा विचार जाऊन पोहचला. मरूळशंकरदेव नावाचे शरण कल्याणला आले. पूर्वाश्रमी मुसलमान असणारे मरूळशंकरदेव कल्याणमध्ये येऊन लिंगधारी झाले, लिंगायत झाले. त्यांना शरणांनी " मरूळशंकरदेव " असे नाव दिले. राजदरबारात भांडी धुण्याचा कायक करून ते आपली उपजीविका करू लागले. काश्मीर होऊन राजा भूपाल महादेव आपल्या पत्नीसह कल्याणला आला. त्याने काश्मीरचे राज्य आपल्या मुलाला देऊन तो शरण झाला, लिंगधारी झाला. मोळीगे मारय्या आणि महादेवी ही नावे धारण करून काश्मीरचे राजा राणी कल्याणमध्ये मोळी विकण्याचा कायक करू लागले. कष्ट करून जगू लागले. मोळीगे मारय्यांविषयी महात्मा बसवेश्वर एका वचनात म्हणतात,
" भक्तासाठी दहा बोटाची मेहनत, गणना महाभक्त होण्यासाठी, परी तुझे पोट भरणार नाही, भार होणार तू भूमंडळी, त्यात दोन्ही हाताने परिश्रम तू करी, मिळेल भाकरी सर्वालागी, मोळीगे मारय्या असुनी राजा थोर, श्रम भरपूर केले त्याने, कूडलसंगमदेवा कायक जो करील, त्याला तारील देव माझा.
काश्मीरहून चिक्कय्या नावाचा हत्यारी कल्याणला महात्मा बसवेश्वरांना मारण्यासाठी आला. शरणांचा सदाचार कायकनिष्ठा वर्तन पाहून हत्यारी चिक्कय्याने आपला हत्या करण्याचा व्यवसाय सोडून दिला. त्यांनी बसवांनी घालून दिलेल्या वीरशैव लिंगायत धर्माचा स्वीकार केला. तो शरण झाला. जंगलातून आणलेली ताडपत्रे शरणांना विकून त्यावर तो उदरनिर्वाह करू लागला. चिक्कय्या शरणांमध्ये कायकनिष्ठ, सदाचारी शरण म्हणून मान्यता पावले.
काश्मीरची राजकन्या बोंतादेवी कल्याणमध्ये येऊन शरणी झाली. राजवैभवात वाढलेली बोंतादेवी कल्याणमध्ये गुहेत राहू लागली. वैद्यकीय शास्त्राचे उत्तम ज्ञान असणारी बोंतादेवी रोग्यांची सेवा करू लागली. त्याचबरोबर गोधडी शिवून विक्री करू लागली. त्यावरून तिला बोंतादेवी असे नाव पडले.
महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात श्रमजीवी समाजाची निर्मिती केली. कल्याणच्या अनुभवमंटपात निर्माण झालेल्या वचन साहित्याने कन्नड भाषेला समृद्ध केले. माणसाची जीवन जगण्याची शैली बदलून टाकली.
एके दिवशी महात्मा बसवेश्वरांना कल्याण नगराचा हालहवाल पाहण्यासाठी फेरफटका मारत असताना हरळय्या नावाच्या चांभाराच्या शरणांच्या आग्रहाला मान देऊन त्याच्या घरी जाऊन दासोह करतात. जेवण करून निघताना बसवण्णा हरळय्यांना विनयपूर्वक हात जोडून " शरणूशरणार्थी शरण हरळय्या " म्हणून नमस्कार करतात. हरळय्याही विनयपूर्वक हात जोडून नमस्कार करतात. महात्मा बसवेश्वर घरातून बाहेर गेल्यावर हरळय्यांच्या लक्षात येते की महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला हात जोडून नमस्कार केला. त्याचे ओझे आपल्यावर झाले. ते कमी करण्यासाठी ते आपल्या पत्नीशी चर्चा करतात. ते दोघेही निर्णय घेतात. आपण महात्मा बसवेश्वरांना आपल्या कातडीचे जोडे भेट द्यायचे. हरळय्या डाव्या मांडीचे, कल्याणीम्मा उजव्या मांडीचे कातडे काढून महात्मा बसवेश्वरांसाठी सुंदर जोडे बनवतात. ते जोडे महात्मा बसवेश्वरांना भेट देतात. महात्मा बसवेश्वर जोडी पाहून म्हणतात, अरेरे हरळय्या ! , हे जोडे खूप सुंदर आहेत. पण हे जोडे कोणत्याही प्राण्याच्या कातडीचे नाहीत तर माझ्या शरणांच्या कातड्याचे आहेत. त्याक्षणी हरळय्या महात्मा बसवेश्वरांचे चरणस्पर्श करतात. चरणस्पर्श करणाऱ्या हरळय्याला महात्मा बसवेश्वर आपल्या ह्रदयाशी लावतात आणि म्हणतात,
- माझ्यापेक्षा लहान कोणी नाही,
- शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही,
- याला माझे मन साक्षी, तुमचे चरण साक्षी
- कूडलसंगमदेवा.
हरळय्यांनी बनवलेले जोडे त्यांना परत करतात. त्या जोड्याची मधुवरस नावाचा ब्राह्मण मंत्री विटंबना करतो. कालांतराने तो मधुवरस महात्मा बसवेश्वर यांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होतो आणि लींगदिक्षा घेऊन गळ्यात शिवलिंग धारण करून शरण बनतो. असेच एके दिवशी सायंकाळी भरलेल्या अनुभव मंटपात ब्राम्हण मधुवरसाची कन्या कलावती आणि चांभार हरळय्याचा मुलगा शीलवंत यांच्या विवाहाचा निर्णय शरण एकमुखाने घेतात. मधुवरस आणि हरळय्या दोघेही आधीच लिंगदिक्षा घेऊन लिंगधारी झाले असल्याने त्यांच्यात रोजी-बेटी व्यवहार होत होता. शरण कलावती आणि शीलवंतचा विवाह करून देतात. हा विवाह कोणताही धर्म बुडवणारा नव्हता कारण दोघेही आधीच लिंगधारी शरण झाले होते पण प्रस्थापित वैदिक व्यवस्थेने हा विवाह अमान्य केला. बिज्जल राजाचे कान भरले. बिज्जल राजाने महात्मा बसवेश्वरांना हद्दपार केले. वचनसाहित्य जाळले. शीलवंत हरळय्या आणि मधुवरस यांना हत्तीच्या पायाला बांधून देहदंडाची शिक्षा दिली. शिल्लक राहिलेले वचन साहित्य घेऊन शरण बैलहोंगलमार्गे उळवीला गेले. या प्रवासात शरण दोन ठिकाणी मारले गेले. बिज्जलाचे सैन्य आणि शरण यांच्यात युद्ध झाले. हरळय्याची पत्नी कल्याणीम्मा, मडिवाळ माचीदेव, किन्नरी ब्रम्हय्या आणि शरण या उळवीच्या प्रवासात गतप्राण झाले. माता नागाई, चेन्नबसवण्णा, मडिवाळ माचीदेव, डोहर कक्कय्या या गणाचारी शरणांच्या नेतृत्वाखाली वचन सुरक्षित उलवीला पोहचले. उळवीच्या महामनेत, आकाळगवीत, विभूतीकनज, रुद्राक्षमंटप या गुहेत वचन सुरक्षित लपवून ठेवले. जंगलात काही काळ गुहेत, पावसाळ्यात झाडाला झोके बांधुन शरण उळवीत राहिले. गोव्याच्या कदंब राजाने शरणांना आश्रय दिला. ही सर्व क्रांतिकारी घटना कल्याण क्रांती म्हणून नावारूपाला आली शरण संस्कृतीचा इतिहास समृद्ध करणारी ही घटना आजही अंगावर शहारे उत्पन्न केल्याशिवाय राहत नाही कल्याण सोडून बसवन्ना कुडल संगमला गेले तेथेच ते शिवलिंगाशी एकरूप झाले,लिंगैक्य पावले. त्याच्याबरोबर त्याचे सहकारी हडपद अप्पण्णा आणि महात्मा बसवेश्वरांच्या पत्नी निलंबिका मृत्यू पावले. कल्याणक्रांतीत सहभागी मडिवाळ माचीदेव वृद्धवस्था आणि युद्धातील जखमांमुळे मुरगोडला मरण पावले. वयाने जेष्ठ असणारे कक्कय्या युद्धात निष्णात होते. वचनसाहित्य रक्षणासाठी गेलेले कक्कय्या बिज्जलाच्या सैन्यांशी झालेल्या युद्धात कक्केरीला मृत्यू पावले. उळवीला चेन्नबसवण्णांनी, उळवीच्या महामनेजवळ किन्नरी बोमय्यांनी, तडीकेरेला गेलेल्या, वृद्धवस्थामुळे थकलेल्या माता नागाईनी तेथेच आपला देह ठेवला. शरण शून्यात विलीन झाले. ह्या घटनेचे दुःख सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांना झाले ते एका वचनात म्हणतात,
बसवा बसवा हे शब्द लोपले, सर्वांचा आधार बसवरूपी खांब मोडला, बसवायच्या कार्याची हानी झाली कपिलसिद्ध मल्लिकार्जुना.( व. क्र. ५९७.)
लिंगायत संत साहित्य - वचन साहित्य
सुंदर आचरण असणाऱ्या व्यक्तीची सुंदर रचना म्हणजे वचने आहेत. वचने हे एक अनुभवजन्य साहित्य आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, पुरोहितशाही, काल्पनिक धर्मग्रंथ, जातिभेद, स्त्रीदास्य, श्रम इ. अनेक विषयांवर प्रहार करणारे क्रांतिकारक विचार वचनांत आहेत. वचन हा लिंगायतांचा धर्मग्रंथ आहे.
बसवेश्वर वचनांचे महत्त्व सांगताना म्हणतात-
- आद्यांचे वचन परीस माने मी,
- परि ते परीस कैसे गवसे मज ?
- तन-मन-धन वर्जून सांगे मी,
- परि त्याचा स्पर्श सहन न होई मज
- अंत्यजाच्या ढोलकीसम बोलणारा दांभिक मी,
- कुडलसंगमदेवा.
आद्यांचे वचन परिसासम असे पहा :
- तेच सदाशिवलिंग, असा विश्वास ठेवावा,
- विश्वास ठेवताच तू विजयी पहा.
- अधरास कडू, उदरास गोड,
- कुडलसंगाच्या शरणांचे वचन
- कडूलिंब चाखल्यागत.
लिंगायत शब्दाचा अर्थ
लिंग + आयत = लिंगायत. याचा अर्थ इष्टलिंग म्हणजे विश्वाच्या आकाराचे माणसाच्या डाव्या हाताच्या उंची इतके शिवाचे प्रतिक, आयत म्हणजे धारण करणे किंवा स्वीकारणे होय. लिंग धारण करणारा तो लिंगायत असा लिंगायत शब्दाचा अर्थ आहे. वर्ण, वंश, लिंग (स्त्री - पुरूष), जात, जन्म ठिकाण असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक स्त्री - पुरुषाला लिंग धारण करून लिंगायत होता येते. इष्टलिंग हे समतेचे व विज्ञानाचे प्रतिक आहे. महात्मा बसवेश्वरांनी इष्टलिंगाची निर्मिती करून समतावादी वीरशैव लिंगायत धर्म प्रचार व प्रसार १२ व्या शतकात केला.महात्मा बसवसार महाराज
लिंगायत धर्म संस्कार
लिंगायत धर्मातले सर्व संस्कार हे अब्राम्हणी आणि अवैदिक पद्धतीने करतात. जंगमक्रियामूर्ती बोलावून विश्वगुरू महात्मा बसवेश्वरांच्या साक्षीने हे संस्कार करतात.
गर्भधारणा संस्कार
नामकरण सोहळा
इष्टलिंग दीक्षा संस्कार
कल्याण महोत्सव (विवाह)
वाढदिवस
अंतिम संस्कार.
लिंगायत धर्म: मुख्य तत्त्वे
वेदशास्त्र,अगमादी शैव संस्कार पुनरुज्जीवित केला. मानव सर्व एकच आहोत हे सांगताना बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात (वचन कन्नड भाषेत) : -
"इवनारव, इवनारव, इवनारवनेंदनिसदिरयया इस नम्मव,
इव नम्मव, नम्मवनेंदनिसयया, कुडलसंगमदेवा, निम्म मनेय मगनैदानिय्या." वरील वचन मराठीत :-
हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा ऐसे नच म्हणवावे;
हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा ऐसेचि वदवावे.
कुडलसंगमदेवा, तुमचा घरचा पुत्र म्हणवावे.
'वेद शास्त्र धर्म जे काही सांगतील मी त्यांना मानणार नाही.' आपल्या वचनात बसवण्णा म्हणतात,
"वेदक्के ओरेय कट्टवे,शास्त्रक्के निगळवनिक्कु वे,
तर्कद बेन्न बारनेत्तुव, आगमद मूग कोयिवे, नोडखा,
महादानी कुडलसंगमदेवा, मादार चेन्नय्यन, मनेय मग नामय्या."
वचन मराठीत :-
वेदावर खडग प्रहार करेन
शास्त्राला बेड्या लावीन
तर्कशास्त्राच्या पाठीवर आसूड ओढेन
आगमशास्त्राचे नाक कापेन
मातंग चेन्नयाचा प्रिय आहे मी,
कुडलसंगमदेवा.
मंदिर म्हणजे बहुजनाचे अंधश्रद्धा व भोळी मनोवृत्तीचे केंद्र आहे. म्हणून बसवण्णांनी आपल्या अनुयायांना मंदिर न बांधण्याचा आदेश दिला आहे. आपल्या देहालाच देवालय माना. देवालयापेक्षा देहालय श्रेष्ठ आहे.अशी शुद्ध विचारसरणी बसवण्णांची होती.
शरण सर्वंज्ञांचे वचन
बसवगुरूंचे नाव जाणेना कोण? या जगी नाश होनेना बोलुनी खोटे लिंगायतांचा कर्ता बसवण्णांच जाणा सर्वज्ञ.
लिंगायत धर्म चळवळ
लिंगायत स्वतंत्र धर्म आहे. तो अन्य कोणत्याही धर्माची जात, उपजात, शाखा अथवा पंथ नव्हे. बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माला ज्या वैशिष्ट्यामुळे स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली ती सर्व वैशिष्ट्ये लिंगायत धर्म पूर्ण करतो. म्हणून तो एक स्वतंत्र धर्म आहे. स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळविण्यासाठी धर्मगुरू, धर्मसंहिता, धर्मचिन्ह,धर्माचे नाव,धर्मक्षेत्र, धार्मिक केंद्र, धर्मसंस्कार, धार्मिक विधी, धर्माचा ध्वज, धर्माचे ध्येय इ. लक्षणे असावी लागतात. ती लिंगायत धर्मात आहेत. म्हणून तो स्वतंत्र धर्म आहे.[ संदर्भ हवा ]
- धर्मगुरू:- विश्वगुरू महात्मा बसवण्णा.
- धर्मसंहिता:- वचनसंहिता.
- धर्मग्रंथ:- समानता पटवून देणारे वचन साहित्य.
- धर्मभाषा:- लोकभाषा कन्नड.
- धर्मचिन्ह:-सुष्टीकर्ता, समतेचे प्रतिक असणारे इष्टलिंग.
- धर्माचे नाव:- लिंगायत
- धर्मक्षेत्र:- बसवण्णांचे ऐक्य क्षेत्र कुडलसंगम, शरण भूमी बसवकल्याण, उळवी, बसवन-बागेवाडी.
- धर्मसंस्कार:- इष्टलिंग दीक्षा.
- धार्मिक व्रत:- शरण व्रत.
- प्रार्थना केंद्र:- अनुभवमंटप.
- धर्मतत्त्वे:- अष्टावरण, पंचाचार, षटस्थल.
- धर्माचा ध्वज:- इष्टलिंग असणारे षटस्थल ध्वज.
- धर्माचे ध्येयः- जात , वर्ग, वर्णरहित धर्मसहित कल्याण राज्य निर्माण करणे.
- धार्मिक सण आणि उत्सव:- बसवादी शरणांचे स्मृती उत्सव
- धर्मानुयायी:- शरण: कोटींच्या संख्येत आहेत.
व्यवस्था परिवर्तन
महात्मा बसवण्णांनी व्यवस्था परिवर्तन केले व्यवस्थेत बदल केला. एकांताकडून- लोकांताकडे, अज्ञानाकडून- ज्ञानाकडे दानधर्माकडून- दासोहाकडे, मंदिराकडून- अनुभवमंटपाकडे, वैराग्याकडून- गृहस्थीजीवनाकडे, कठोरतेकडून- सहजतेकडे, शिष्यत्वाकडून- शरणजीवनाकडे, बहुदेवतावादाकडून-एकेश्वरवादाकडे, संस्कृतकडून- लोकभाषा कन्नडकडे, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे ऐतखाऊवृत्तीकडून कायकवादाकडे, विषमतेकडून- - समानतेकडे, शिवलिंगाकडून- इष्टलिंगाकडे, देवालयाकडून-देहालयाकडे, शैवपंथाकडुन- स्वतंत्र लिंगायत धर्माकडे, कल्पोकल्पित ग्रंथाकडून- अनुभवी वचनसाहित्याकडे, देहदंडणाकडून- देहधर्माकडे, ग्रंथप्रमाण्यवादाकडून-बुद्धिप्रामाण्यवादाकडे घेऊन जाणारी नवी व्यवस्था निर्माण करणारे बसवण्णा सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होती. नवा पथ मार्ग शोधणारे ते एक पथदर्शी होते.
महात्मा बसवेश्वरांचा संदेश
महात्मा बसवण्णांनी जनसामान्यांना सहज साधी शिकवण दिली. त्यांची शिकवण सामान्य माणसासाठी आहे. ती सहज साधी आणि सोपी आहे. संसारी माणसाच्या जगण्याचे जीवन तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. ते घरोघरी जात. शरणूशरणार्थी करत. शरण कक्कय्या, हरळय्या, चेन्नय्या, नुलीय चंदय्या, मडिवाळ माचीदेव, व घटीवाळय्या या कष्टकरी, दीनदलित, आदिवासी, अठरा आलुतेदार, बारा बलुतेदार, यांना बसवण्णा एकत्र करू लागले. त्यांना सहज साधे जीवन तत्त्वज्ञान सांगू लागली एकाच देवाची इष्टलिंगाची साधना करा. देहच देवालय आहे. एकत्र या चर्चा करा. सुसंवाद करा. स्त्रियांना समान अधिकार द्या. पंचसूतके पाहू नका. दलितांना समान संधी द्या. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका. कोंबडे-बकरे कापू नका. स्वकष्टावर जगा. भिक्षा मागून खाऊ नका. काम कष्ट करा. कायकात कैलास आहे. दासोह समाजसेवा आहे. पर्यावरण रक्षण करा. दगडधोंडे पुजू नका. पुरोहिताच्याहस्ते देवपूजा करू नका. ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र, पंचांग पाहू नका. यज्ञ, होम-हवन करु नका. अनुभव मंटपात बसा. प्रश्न उत्तर करा, चर्चा करा. वचन साहित्य द्या. शुभाशुभ पाहू नका. नदी-स्नान करू नका. एकमेकांच्या पाया पडू नका. शरणूशरणार्थी म्हणा. संन्यासवादाचे उदात्तीकरण करू नका. संसारिक जीवन जगा. अस्पृश्यता पाळू नका. माणसाला माणसाप्रमाणे वागवा. पशुहत्या करू नका. मांसाहार करू नका व्यसनाधीन बनू नका. चोरी करु नका. हत्या करु नका. रागावू नका. खोटे बोलू नका. कोणाची घृणा करु नका. दया हाच धर्म आहे. सदाचाराने वागा. निती-नैतिकता आणि विवेकाने वागा. दयाच धर्माचा मूलमंत्र आहे. शरणांची थट्टा मस्करी करू नका. नवस-सायास करू नका. अंधश्रद्धा सोडून द्या. प्राणीमात्रावर दया करा. भुकेलेल्याला अन्न द्या. घोर जपतप करू नका. झोपच जप आहे. कठोर देहदंडण, इंद्रियदमन करू नका. देहाला कष्ट देऊ नका. देह कायकासाठी कष्टवा. उपवास-तापास, व्रतवैकल्ये करू नका. वेळेवर दिवस वर्ष यात भेद करू नका. प्रत्येक दिवस, वार शुभच आहे. मरण महानवमी आहे, त्याचे स्वागत करा. सुखी संसार करा, संसार सोडून हिमालयात जाऊ नका. संन्यास धारण करण्याची गरज नाही. मूर्तिपूजा सोडून द्या. अनावश्यक खर्च करू नका. काल्पनिक स्वर्ग-नरक यावर विश्वास ठेवू नका. सदाचार स्वर्ग आहे. अनाचार नरक आहे. देवघर गाव सोडून अन्यत्र भटकू नका. शेत पावनभूमी आहे. कष्टाची भाकरच महाप्रसाद आहे. जिवंत नागाला मारून चित्रातल्या नागाची पूजा करू नका, विसंगत व्यवहार सोडून द्या. निसर्गनियमाप्रमाणे देहधर्माप्रमाणे वागा. अनावश्यक देहाला त्रास देऊ नका. चारित्र्य सांभाळा. दासोह करा. गरजेपुरती संपत्ती बाळगू नका. फुकटचे कोणाला काही देऊ नका. फुकटचे कोणाचे काही घेऊ नका. दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी शिकवण बसवण्णांनी दिली. आम-आदमीने ती आत्मसात केली आणि आचरणात आणले.
चातुर्वर्ण्य व कर्मकांड विषयक विचार
उचनीचतेवर टीका करताना बसवण्णा म्हणतात,
चांभार उत्तम तो दुर्वास
कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी
तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती
जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार.
भस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल, मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे. लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात. जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात,
दुग्ध ते उच्छिट तथा वासराचे।
पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची।
पुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे।
साधन पूजेचे काय सांगा ?
दूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का ? अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा,इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे.
वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे.
बसवण्णा एका वचनात म्हणतात : -
दगडाचा देव देव नव्हे।
मातीचा देव देव नव्हे।।
वृक्षदेव देव नव्हे।
सेतु बंध रामेश्वर।।
अन् इतर क्षेत्राचा।
देव देव नव्हे।।
देव तुमच्या अंतर्यामी।
हे कुडलसंगमदेवा।।
संत बसवण्णांनी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्यातून साहित्य निर्माण केले.उचनीचता,कर्मकांडे, पशुबली ही थोतांडे नाकारली व लिंगायत धर्माची स्थापना केली.
बसवण्णा हे देव,मत्य,नाग आदि लोकांचे दैवत आहे हे पटवून सांगताना अक्कामहादेवी आपल्या वचनात म्हणतात:-
देव लोकांचा देव बसवण्णा
मत्स लोकांचा देव बसवण्णा,
नाग लोकांचा देव बसवण्णा। मेदुगिरि मंदागिरीचा देव बसवण्णा।
चेन्नमल्लिकार्जुना माझा तुमचा। तव शरणांचा देव बसवण्णा।
संदर्भ
- ^ महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश - लेखक प्रा. आनंद बळीराम कर्णे
बाह्य दुवे
- लिंगायत धर्म (इंग्लिश मजकूर)
- विश्वगुरू बसवण्णा माहिती इंग्लिश (मराठी मजकूर)