Jump to content

बशर नवाज

बशर नवाज (इ.स. १९३५:औरंगाबाद - ९ जुलै, इ.स. २०१५) हे एक उर्दू कवी होते. १९५२ मध्ये मॅट्रिक झालेले बशर नवाज यांनी १९५४ मध्ये शाहराह या साहित्यविषयक मासिकात पहिली गझल लिहिली. त्या वर्षी ती सर्वोत्कृष्ट ठरली.[कोठे? कोणत्या निकषाने?]

बशर नवाज हे औरंगाबाद विद्यापीठाच्या उर्दू विभागात २००८ ते २०१० या दरम्यान ते विशेष निमंत्रित प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळ ते विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे प्रमुख होते.

व्यासंग

छंदशास्त्रावर हुकमत आणि अभिजात उर्दू शायरीचा व्यासंग हे बशर नवाज यांचे अनोखे वैशिष्ट्य होते.

एकदा औरंगाबाद येथील सुभेदारी गेस्ट हाऊस येथे उर्दू कवी फैजल जाफरी यांच्याशी त्यांचे वैचारिक वाद झाले. तेव्हा रात्री अकरा ते पहाटे चार दरम्यान रंगवलेल्या मैफलीमध्ये त्यांनी मुखोद्गत असलेले गालिब, मीर, अनिस, सौदा, अजगर गोंडवी, यगाना चंगेजी यांचे हजारो शेर ऐकवले होते.

पुरोगामी विचार

राजकीय भूमिका घ्यायला बशर नवाज कचरले नाहीत. त्यांनी आणीबाणीच्या विरोधात बरेच काम केले. पुरोगामी विचारांची रुजवणूक व्हावी, असे त्यांचे वर्तन होते.

लोकसंग्रह

बशर नवाज हे मराठी आणि उर्दू या दोन काव्यक्षेत्रातील दुवा म्हणून ओळखले जात. अनेक मराठी कवी त्यांचे मित्र होते. साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील अत्यंत छोट्या कार्यक्रमासही ते हजेरी लावत.

बशर नवाज यांचे लेखन

बशर नवाज यांनी आपल्या गझलांमध्ये पुरोगामी विचार मांडले. त्यांच्या कवितेत आणि समीक्षेतही ते मनाला पटलेली गोष्ट न सांगता ठेवत नसत. त्यांच्या गझला गुलाम अली, लता मंगेशकर, मोहम्मद अजीज, तलत अजीज, भूपिंदरसिंग, मेहदी हसन यांसारख्या नामवंत गायकांनी गायल्या.

त्यांच्या शायरीवर अनेकांनी पीएच. डी. केली. देश-विदेशांत त्यांचे चाहते आहेत, म्हणूनच त्यांची शायरी मराठी, हिंदी, गुजराती, कन्‍नड व पंजाबी भा्षांत अनुवादित झाली.

त्यांचे साहित्य इयत्ता पहिले ते पदावी पर्यंतच्या उर्दू अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले आहे.

१९८३ मध्ये दूरदर्शनने अमीर खुस्रो यांच्यावर मालिका सुरू केली होती. त्याच्या २६ भागांचे लिखाण बशर नवाज यांनी केले होतेे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रसारित झालेल्या डॉक्युमेंट्रीची पटकथा बशर नवाज यांनी लिहली होती.

'बाजार', 'लोरी', 'जाने वफा', 'तेरे शहर में' या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले.

बशर नवाज यांची पुस्तके

  • अजनबी समुंदर (कवितासंग्रह)
  • नया आदब नये मसायें (समीक्षाग्रंथ)
  • राहेगॉं (हा पहिला कवितासंग्रह). रायगा म्हणजे व्यर्थ किंवा निरथक.

पुरस्कार आणि सन्मान

  • "करोगे याद तो हर बात आयेगी " या बशर नवाज यांच्या ’बाजार’ या चित्रपटातील गझलेला राष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळाली होती.
  • केंद्र व राज्य सरकारच्या कला तसचे उर्दू अकादमीतर्फे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
  • बशर नवाज यांचा १९६० नंतरचा देशातील उत्तुंग प्रतिभेचा कवी म्हणून शायर निदा फाजली यांनी गौरव केला होता.
  • महाराष्ट्र सरकारने व महाराष्ट्र उर्दू अकादमीने बशर नवाज यांना सन्मानित केले आहे.
  • साहित्य अकादमीनेही बशर नवाज यांच्या कार्याची दखल घेतली आहे.