Jump to content

बलराज मधोक

बलराज मधोक (२५ फेब्रुवारी. इ.स. १९२०: स्कर्डू, जम्मू आणि काश्मीर, भारत - २ मे, इ.स. २०१६: नवी दिल्ली) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि जनसंघ या राजकीय पक्षाचे सहसंस्थापक व माजी अध्यक्ष होते.

लाहोरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९३८ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले. १९४२ मध्ये पूर्णवेळ प्रचारक बनल्यानंतर त्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर ते श्रीनगरमध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर दिल्ली विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. नवी दिल्लीत त्यांनी १९६१ मध्ये लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली, तर १९६७ मध्ये ते दक्षिण दिल्लीतून लोकसभेवर गेले. आणीबाणीत १८ महिन्यांचा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला. मधोक यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या चरित्रासह काश्मीरवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. जीत या हार ही त्यांची कादंबरी आत्मचरित्रात्मक मानली जाते.

लोकसभा निवडणुकीत १९६७ मध्ये मधोक यांनी त्यांनी जनसंघाला ३५ जागा मिळवून दिल्या होत्या. जनसंघाचे तोवरचे हे सर्वांत मोठे यश होते.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या उदयानंतर मधोक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची १९३७ मध्ये संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती

राजकीय कारकीर्द आणि अस्त

एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी यांचे पक्षांतर्गत ज्येष्ठ स्पर्धक म्हणून ओळखले जाणारे मधोक आधी पक्षामधून आणि नंतर राजकारणातूनही हद्दपार झाले. मधोक हे १९६० नंतरच्या दशकात जनसंघाचे प्रमुख नेते आणि १९६६-६७ मध्ये अध्यक्ष होते. १९६७ नंतर पक्षांतर्गत राजकारणात मधोक यांचा निभाव लागला नाही. १९७३ मध्ये पक्षाच्या गोपनीय बाबींचा बभ्रा केल्याचा ठपका ठेवून मधोक यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपली.

राजकारणात दीर्घकाळ उपेक्षित राहिलेले बलराज मधोक ह्यांचे वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.