Jump to content

बब्रूवान रुद्रकंठावार

धनंजय चिंचोलीकर तथा बब्रूवान रुद्रकंठावार (जन्म : करकंब, ११ जानेवारी १९६५) त्यांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांनी बी ए आणि बी जे (पत्रकारिता) पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते मराठी लेखक आहेत. त्यांचे मूळ गाव चिंचोली - लिंबाजी. हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. बब्रूवान रुद्रकंठावार हे त्यांचे टोपण नाव असून ते विनोदी लेखन करतात. त्यांचे नाव मराठी साहित्यात गाजले, कारण त्यांच्या लिखाणातील अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा असते..

बब्रूवान हे राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर निर्भीडपणे लिहिणारे लेखक आहेत. ते व्यवसायाने पत्रकार असून ते तरुण भारत दैनिकामध्ये नियमित सदर लिहीत असत.

बब्रूवान रुद्रकंठावार ह्यांनी 'पुन्यांदा चबढब' हे कथासंग्रहाचे पहिले पुस्तक लिहिले. त्यानंतर त्यांनी 'बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी', 'ट्रर्या, डिंग्या आणि गळे', 'आमादमी विदाऊट पार्टी' ही पुस्तके आणि 'चौथ्या इस्टेटच्या बैलाला' हे नाटक लिहिले. ते नाटक औरंगाबादसकट पुणे-मुंबईत फार गाजले. त्यांच्या 'आमादमी विदाऊट पार्टी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला. ‘पुन्यांदा चबढब’ या पुस्तकाला १९९८ सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा 'दत्तू बांदेकर' पुरस्कार मिळाला; तर, 'टर्र्या, डिंग्या आन् गळे' या पुस्तकाला बी. रघुनाथ पुरस्कार, नाशिकचा विमादी पटवर्धन पुरस्कार प्राप्त झाले.

धनंजय चिंचोलीकरांचे नाव ‘न घेतलेल्या मुलाखती’ या पुस्तकामुळे कला, अभिनय, राजकीय क्षेत्रातही जाऊन पोचले. त्यांनी त्या पुस्तकात सतरा व्यक्तींच्या मुलाखती कल्पनेच्या जोरावर लिहिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, चंदशेखर गोखले, अटलबिहारी वाजपेयी, अशोक चव्हाण, सुरेखा पुणेकर, लादेन, वीरप्पन, अमिताभ बच्चन अशा सतरा व्यक्ती आणि कुत्रा, बैल, कोंबडा असे तीन प्राणी यांचा त्यांत समावेश आहे. ते विनोदी पुस्तक फार गाजले.

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार दत्ता भगत यांनी बब्रूवान यांच्या भाषेबद्दल मार्मिक विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, मराठवाडी ही स्वतंत्र बोली आहे किंवा नाही याविषयी शंका असणाऱ्या मंडळींनी एक संशोधन सामग्री म्हणून बब्रूवान यांच्या लेखनाचा विचार करण्यास हरकत नाही. ज्यांना विनोद केवळ हसण्यावारी नेण्यासाठी नाही, तर तो वाचकाला अंतर्मुखही करत असतो असे वाटते, त्यांना बब्रूवान यांच्या या लेखनात बरेच काही गवसेल.

बब्रूवान रुद्रकंठावार यांनी लिहिलेली पुस्तके

  • आमादमी विदाऊट पार्टी (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला आहे.)
  • चौथ्या इस्टेटच्या बैलाला (नाटक)
  • ट्रर्या, डिंग्या आन् गळे
  • न घेतलेल्या मुलाखती
  • पुन्यांदा चबढब (कथासंग्रह)
  • बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी

बब्रूवान रुद्रकंठावार यांना मिळालेले पुरस्कार

  • टर्र्या, डिंग्या आन् गळे या पुस्तकाला बी. रघुनाथ आणि वि.मा.दी. पटवर्धन हे पुरस्कार
  • आमादमी विदाऊट पार्टी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार