बबनराव नावडीकर
बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, १९२२ - २८ मार्च, २००६) हे मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार होते.[१] त्यांचे वडील ही कीर्तन करीत असत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कराड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारसुद्धा मिळाला. शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली. [बालगंधर्व| बालगंधर्वांबरोबर]] त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. ओरिजिनल गीत रामायण मध्ये उदास का तू , सेतू बांधा रे ही गाणी त्यांनी गायली आहेत पुण्यातील लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. त्याचा हा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.[२]
बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे
बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला.
'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात. बबनराव नावडीकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त दिनांक २८ मार्च २०१९ला साथी एस्.एम् जोशी सभागृहात अेडव्होकेट बाबुराव कानडे यांचे भाषण.
गायिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते
- आम्ही दोघं राजाराणी
- उदास तू आवर ते नयनांतिल पाणी (गीत रामायणातील गाणे)
- कुणीआलं कुणी गेलं
- जा रे चंद्रा क्षणभर जा
- नको बघूस येड्यावाणी
- पडले स्वप्न पहाटेला
- बघू नकोस येड्यावाणी गं तुझ्या डोळ्याचं न्यारं पानी
- राधिके ऐक जरा बाई
- रानात सांग कानात
- सांग पोरी सांग सारे
- सुरत सावळी साडी जांभळी
- ही नाव रिकामी उभी किनाऱ्याला
- कशी तुझं समजावू सांग? का भामिनी उगीच राग?
- कां अशी अकारण हसशी
- काय ह्या संतांचे मानू
- हरिनाम सदोदित गाई रे
बबनराव नावडीकर यांची पुस्तके
- गीत दासायन (धार्मिक; सहलेखक श्रीधरस्वामी निगडीकर)
- निरांजनातील वात (कवितासंग्रह)
- मी पाहिलेले बालगंधर्व (व्यक्तिचित्रण)
संदर्भ
- ^ "'रानात सांग कानात..'". Loksatta. 26 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "आरोग्य, प्रगतीसाठी संगीतशास्त्र लाभदायक". Lokmat. 26 मे 2020 रोजी पाहिले.