बनगरवाडी (चित्रपट)
बनगरवाडी (चित्रपट) | |
---|---|
दिग्दर्शन | अमोल पालेकर |
पटकथा | व्यंकटेश माडगूळकर |
संगीत | वनराज भाटिया |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९९५ |
पुरस्कार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार |
बनगरवाडी हा अमोल पालेकर दिग्दर्शित १९९५ मधील भारतीय-मराठी चित्रपट आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि १९५५ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. १९४० च्या दशकात औंध संस्थानातील मेंढपाळांच्या एका छोट्या गावातल्या एका तरुण शालेय शिक्षकाची आणि त्याच्या अनुभवांची ही कथा आहे.
कथा
चित्रपट कथेची सुरुवात होते एका तरुण शालेय शिक्षकाच्या भूमिकेने, ज्याची भूमिका चंद्रकांत कुलकर्णीने केली होती. हा शिक्षक एकटाच एका निर्जन भाग ओलांडून बनगरवाडी नावाच्या गावाकडे जात असतो. जेव्हा तो बनगरवाडीत पोहोचतो तेव्हा त्याला समजते की शाळा बंद झाली आहे आणि गावातील लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. कारभारी (गावप्रमुख) यांच्या पाठिंब्याने तो गावकऱ्यांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास पटवून देतो. पुढचे काही महिने तो शाळा चालवतो आणि गावातील निरक्षर, गरजूंची मदत करतो, ज्यामुळे तो कधीकधी स्वतःच अडचणीत येतो. लवकरच तो गावकऱ्यांना समाजाच्या सहभागातून व्यायामशाळा उभारण्यासाठी पटवून देतो. तो राज्याचा राजा पंतप्रतिनिधी यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करतो. पुढे गावप्रमुखाच्या आकस्मिक मृत्यूने गाव आणि शिक्षकाला देखील धक्का बसतो. त्यानंतर त्या गावात प्रदीर्घ दुष्काळ पडतो. शिक्षक सरकारकडून मदत मिळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्यासाठी तो परिस्थितीची गंभीरता सांगणारी पत्रे वारंवार लिहितो, परंतु त्याला प्रतिसाद मिळत नाही. दुष्काळामुळे बनगरवाडीच्या लोकांना गाव सोडून जावे लागते. यामुळे शाळेतील शिक्षक एकटा राहतो जेथे विद्यार्थीच नसतात.
पुरस्कार
- मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९९६ [१]
- कालनिर्णय पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट, १९९७
- सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनासाठी फिल्मफेर पुरस्कार, १९९७
- पाच श्रेणींमध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९९६
चित्रपट महोत्सव
बनगरवाडी हा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आला :
- कार्लोवी वेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, १९९६
- बर्मिंगहॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, १९९६
- लंडन फिल्म फेस्टिव्हल, यूके, १९९६
- १५ वा FAJR आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इराण, १९९७
- कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इजिप्त, १९९६
- बोगोटा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलंबिया, १९९६
- साराजेवो चित्रपट महोत्सव, प्राग १९९६
संदर्भ
- ^ "43rd National Film Awards, 1996" (PDF). Directorate of Film Festivals. p. 80. 24 April 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 March 2012 रोजी पाहिले.