बदाम
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बदामबीज हे पुष्टीदायक व शक्तिवर्धक आहे.
बदाम : (हि.. बादाम; क. बादावी, बादामी; सं वाताम; इं आमंड; लॅ. प्रूनस ॲमिग्डॅलस, प्रू. कॉम्यूनिस; कुल-रोझेसी). सुमारे ८ मी. उंचीचा हा पानझडी पृक्ष मूळचा मध्य व पश्चिम आशियातील असून अद्याप तेथे वन्य अवस्थेत आढळतो; इ. स. पू. दहाव्या शतकात चीनमध्ये व इ. स. पू. पाचव्या शतकात ग्रीसमध्ये याची लागवड होती, असे म्हणतात. काहींच्या मते जरदाळू, सफरचंद, केळ व आंबा यांच्याप्रमाणे सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून मनुष्य त्याची लागवड करीत आला असावा. चरकसंहिता (इ. स.चे दुसरे शतक) आणि सुश्रुतसंहिता (इ.स.चे तिसरे शतक) यांमध्ये ‘वाताम’ नावाने बदामाचा उल्लेख आला आहे. बदाम मूळचा इराणातील असून तेथून तो इतरत्र नेला गेला आहे, असेही म्हटलेले आढळते. हल्ली द. युरोप, अमेरिका (कॅलिफोर्निया), ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका या प्रदेशांत बदामाची लागवड आढळते. भारतात सु. ७६०-२,४०० मी. उंचीपर्यंत (काश्मीरात) बदाम पिकविला जातो. त्याच्या लागवडीखाली २,४०० हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ५,६०० क्विंटल बदामाचे उत्पादन होते; तसेच हिमाचल प्रदेशात २०० हेक्टरात पीक काढतात; उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागात सु. ५,००० हेक्टरात अक्रोड व बदाम यांची लागवड केली आहे..
आ . बदाम :( १) फूल, (२) तडकलेले फळ, (३) फलांसह शाखा. आ . बदाम :( १) फूल, (२) तडकलेले फळ, (३) फलांसह शाखा.
बदाम वृक्षाची साल करडी; पाने साधी, आयत-कुंतसम (भाल्या सारखी), एकाआड एक, चिवट, चकचकीत व दातेरी असतात. फुले पांढरी, पण त्यांवर तांबूस झाक असते. ती सु. २.५ सेंमी. व्यासाची, आकर्षक असून कोवळ्या पालवीबरोबर किंवा पाने येण्यापूर्वी एकेकटी येतात. फुले व कच्ची फळे असताना हा वृक्ष ⇨सप्ताळूसारखा दिसतो. एकाट किंजदलापासून बनलेले, बिनदेठाचे मोठे, ३-६ सेंमी. लांब, अश्मगर्भी फळ (आठळी फळ) काहीसे चपटे असते. त्यातील मगज (गर) कठीण असून फळ पिकल्यावर ते तडकते व लांबट अंडाकृती, गर्द तपकिरी असे एकच बीज असलेली आठळी बाहेर पडते. पांढरी फुले, दुहेरी पुष्पमुकुट, विविधवर्णी पाने, लोंबती पाने इ. लक्षणांचे अनेक संकरज प्रकार उपलब्ध असून ते बागेत शोभेकरिताच लावले जातात. जरदाळू, चेरी, अलुबुखार व सप्ताळू ही सर्व बदामाच्या प्रूनस या वंशातील असल्याने व त्यांचा अंतर्भाव रोझेसी कुलात [⟶रोझेलीझ] केल्याने त्यांच्या अनेक लक्षणांत साम्य आहे. बदामाच्या जातीचे तीन प्रमुख प्रकार करतात : (१) ॲमिग्डॅलस, (२) अमारा आणि (३)सटायव्हा. यांपैकी पहिला प्रकार वन्य असून प. आशिया, ग्रीस व उ. आफ्रिका येथे आढळतो. बहुतेक लागवडीतील प्रकार दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारचे आहेत. दुसऱ्याला कडू (‘कडवा’) व तिसऱ्याला ‘गोडा’ म्हणतात. कडवा प्रकार व्यापारी महत्त्वाच्या तेलाकरिता आणि गोड्या प्रकाराची कलमे करण्यास खुंट म्हणून उपयुक्त ठरला आहे. फळांच्या सालीनुसार गोड्या बदामाचे तीन उपप्रकार आहेत : घनकवची, मृदुकवची आणि कागदी (कागझी किंवा रूमाली). भारतातील लागवडीत बियांचा वापर होत असल्याने फळांत विविधता आढळते. अमेरिकेतून ‘नॉन परेल’, ‘थिन शेल’ (विरल कवची), ‘ने-प्लस-अल्ट्रा’ आणि ‘ड्रेक’ (घनकवची) हे प्रकार आणून लागवड केली आहे.
हवामान व मशागत : प्रारंभी थंड पण कोरडी आणि फळे पिकण्याच्या वेळी गरम हवा बदामास आवश्यक असते; तसेच ६० सेंमी. किंवा थोडा अधिक पाऊस असल्यास पीक चांगले येते. वसंत ऋतूत फुलांचा बहर येत असल्याने थंडीचा कडाका त्या वेळी पडल्यास मोहोर नासतो; अशा परिस्थितीत उशिरा फुलणाऱ्या जाती टिकून राहतात. खोल, सकस व निचऱ्याची जमीन बदामवृक्षांना उपयुक्त ठरते कारण त्यांची मुळे खोल जातात. भारतात बियांपासून बहुतांश लागवड होते; त्याकरिता जुले-सप्टेंबरात जमविलेले बी डिसेंबरामध्ये पन्हेरीत पेरतात व वर्षानंतर रोपे बाहेर कायम जागी लावतात. याशिवाय कलमांनीही निवडक वाणांची लागवड करतात; त्याकरिता कडवा किंवा गोडा बदाम, जरदाळू, सप्ताळू अलुबुखार इत्यादींच्या खुंटावर कलम बांधतात. वृक्षांची लागण करण्यास ६ - ८ मी. अंतरावर १ मी. व्यासाचे खोल खड्डे वापरतात. उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते; कंपोस्ट खते व नायट्रोजनुक्त खते दिल्यास उत्पादन अधिक येते. तसेच वाढ होत असताना छाटणी करावी लागते. वय, विकृती किंवा अयोग्य खुंट यांमुळे उत्पादन कमी होते. अशा वेळी शेंड्याकडे छाट देऊन तात्पुरते पुनरूज्जीवन करतात किंवा जुन्या झाडांमधून नवीन रोपे लावतात आणि पुढे जुनी झाडे काढून टाकतात. याच्या फळबागांतून मधमाश्यांच्या पेट्या ठेवणे चांगले कारण त्यामुळे परपरागणाला मदत होते.
आ. २. बदाम (प्रूनस ॲमिग्डॅलस) व बदामबी यांच्या विविध प्रती.आ. २. बदाम (प्रूनस ॲमिग्डॅलस) व बदामबी यांच्या विविध प्रती.
उत्पादन : रोपे लावल्यापासून सु. तीनचार वर्षांत फळे येऊ लागून आठदहा वर्षांत भरपूर उत्पन्न मिळते. साधारणतः जुलै ते सप्टेंबरमध्ये फळातून आठळ्या डोकावू लागतात. त्या वेळी ती फळे काढून हातांनी सोलून आठळ्या उन्हात वाळवितात. अमेरिकेत आठळ्या सोलण्यासाठी यंत्रे वापरतात. आठळ्यांवर स्वच्छतेकरिता व पिवळट आकर्षक रंग येण्यास योग्य असे संस्कार (वाफारणे व गंधक-धुरी देणे) करतात. कॅलिफोर्नियात दर हेक्टरी ४०० - १,२२० किगॅ इतके उत्पादन येते. बलुचिस्तानात हेक्टरी उत्पन्न सरासरीने २,३७५ किग्रॅ. असते; येथे दर हेक्टरी ३२५ झाडे व दर झाडागणिक ७.३ किग्रॅ. आठळ्या असे प्रमाण धरले आहे. काशमीरात दर झाडापासून २.७ किग्रॅ. फलोत्पादन होते. आठळ्या थंड, कोरड्य व हवा खेळणाऱ्या जागेत ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकतात; शीतगृहातही ठेवतात व तेथे त्या अधिक काळ टिकतात. अमेरिकेत आठळ्या यांत्रिक पद्धतीने फोडून फक्त बिया वेगळ्या काढतात व त्यांचे प्रकार पाहून त्यांची प्रतवारी करतात. आठळ्या व बिया नंतर बाजारात येतात.
उपयोग : गोड्या प्रकारातील कच्च्या वा पक्व झालेल्या बादाम बिया खातात; त्यांची टरफले काढून, भाजून, तळून, खारवून खाण्यास अधिक चविष्ट लागतात. मिठाईत सोललेल्या बादामबियांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात; ‘मॅकरून’ या केकसारख्या पदार्थांत बदामबी पेस्टच्या रूपात वापरतात. भारतात मिठाई, पक्वान्ने, तांबूल इत्यांदींत बदामबीचे काप घालतात. बदामबी फार पौष्टिक, शामक, उत्तेजक व तंत्रिका तंत्राच्या दृष्टीने पोषक असून देशी औषधात वापरली जाते. बिब्बा उतल्यास व्रणावर व गोम चावल्यास जखमेवर बी उगाळून लावतात. बिया मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या) असून त्यांचे पोटीस त्वचेवरील पुरळ व नाजूक दुखरे भाग यांवर लावतात; ⇨ पचनज व्रण (अल्सर) व जठरव्रण झालेल्या रोग्याच्या खाण्यात बदामबी पथ्यकर असते. गोड्या व कडव्या प्रकारच्या बदामबीचे तेल अनेक प्रकारे उपयुक्त आहे; ते मिठाई, औषधे व सौंदर्यप्रसाधने यांत वापरतात. तेल काढून राहिलेल्या चोथ्याचे पीठ आणि बदाम लोणी यांत स्टार्च नसल्याने त्यांचा उपयोग मधुमेही रोग्यांच्या अन्नात, तसेच साबण, सौंदर्यप्रसाधने व मलशुद्धीकारक द्रव्ये यांत करतात. घनकवची बदामातील बी ३३ % तर पातळ सालीच्या बदामातील बी ७० % असते. बियांत प्रथिन व तेल भरपूर असते. गोड्या बदामबीच्या रासायनिक विश्लेषणात प्रतिशत जलांश ५.२, प्रथिन २०.८, तेल ५८.९, कार्बोहायड्रेटे १०.५ आणि अ जीवनसत्त्व असते. कडव्या बदामबीमध्ये १० % अधिक प्रथिन व तेल १० % कमी असते. कडव्यात २.५ - ३.५ % ॲमिग्डॅलीन हे ग्लुकोसाइड असल्याने व ते गोड्या बदामबीत नसल्याने कडवे बी खाद्य नसते. गोड्या व कडव्या बदामबियांतील स्थिर (बाष्परूपाने उडून न जाणारे) तेल शीतदलन (थंड अवस्थेत दाबून काढणाऱ्या ) प्रक्रियेने काढतात. तथापि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे तेल कडव्या बीपासूनच काढतात कारण गोडे बदामबी इतर महत्त्वाच्या उपयोगांकरिता वापरले जाते. दोन्हींच्या तेलांत फरक नसतो. ते तेल स्वच्छ, फिकट पिवळे किंवा रंगहीन असून त्याला सौम्य सुगंध येतो; ते दीर्घकाळ टिकते. ते शामक, पौष्टिक व किंचित सारक असते; ते खाद्य असले, तरी महाग असल्याने खाणे परवडत नाही; औषधे, सौंदर्यप्रसाधने व तेलाचे अंतःक्षेपण यांत उपयोगात आहे; कानाच्या विकारांत ते कानात घालतात; हे स्थिर तेल काढून राहिलेल्या पेंडीतून ‘कडू बदाम तेल’ हे उडून जाणारे तेल काढतात. त्यानंतर उरलेली पेंड गुरांना खाऊ घालतात. तेलाला विशिष्ट कडू वास येतो; त्यात हायड्रोसायनिक आम्ल असते. त्याचा मर्यादित औषधी उपयोग (उदा., आचके बंद करण्यास व शामक म्हणून) करतात. शुद्ध केलेले कडू तेल (नैसर्गिक बेंझाल्डिहाइड) एरंडेलाची व कॉडलिव्हर तेलाची रूची छपविण्यास वापरतात. हे साबण, सौंदर्यप्रसाधने, औषधे, मिठाई व अत्तरे यांत वापरले जात होते; हल्ली कृत्रिम बेंझाल्डिहाइड वापरणे स्वस्त पडते, तसेच याची भेसळ नैसर्गिक कडू बदामतेलात करतात. बदामाच्या कडक अंतःकवचाचे विविध उपयोग करतातः लोकर स्वच्छ करणे, धातू सफाई, मसाल्यात भेसळ, जमिनीचा पोत सुधारणे. वनस्पतींच्या तळाशी भूमिजल संरक्षणार्थ पसरणे. कोंबडीच्या पिलांना शेज करणे, खतांत मिसळणे, दंतधावने इत्यांदी; तसेच बदामाच्या साली (फलावरणाचा बाहेरील भाग) सरबते, गुरांना चारा आणि कातडी कमाविणे यांकरिता वापरतात, कारण सालीत टॅनिन, शर्करा, प्रथिन, स्टार्च, पेक्टिन, धागे इत्यादींचे प्रमाण चांगले असते. शिवाय यांपासून इंधनासाठी लागणारे अल्कोहॉल बनविण्याचे प्रयत्नही चालू आहेत. खोडांच्या सालीतून पाझरणारा डिंक ट्रॅगकांथ डिंकाऐवची वापरला जातो. बदानवृक्षाचे लाकूड फिकठ लालसर असून कातीव व कोरीव कामांस वापरतात. मुळे शरीरातील दूषित पदार्थांचे विसर्जन करण्यास समर्थ असल्याचे सांगतात. १९७८ साली बदामाचे जागतिक उत्पादन सु. ८.३ लाख टन झाले होते. स्पेन (२.९८ लाख टन), इटली (१.६३ लाख टन), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१.५४ लाख टन) व इराण (५० हजार टन) हे प्रमुख उत्पादक देश होते. भारतातील बदामाचे उत्पादन पुरेसे नसल्याने त्याची अफगाणिस्तान व इराण येथून आयात होते; इराक, पाकिस्तान व इटली येथूनही थोडी आयात होत असे. १९६७-६८ सालात ४,२४४ टन आयात झाली होती. त्याची किंमत २६,७४६ हजार रुपये होती बदाम
आ. ३. देशी बदाम :(१)फुलोऱ्यासह फांदी, (२) नर-फूल, (३) द्विलिंगी फूल (उलगडलेले), (४) फळ, (५) फळांचा आडवा छेद, (६) बी.आ. ३. देशी बदाम :(१)फुलोऱ्यासह फांदी, (२) नर-फूल, (३) द्विलिंगी फूल (उलगडलेले), (४) फळ, (५) फळांचा आडवा छेद, (६) बी.
देशी बदाम : (हिं. जंगली बदाम, बंगाली बदाम, पत्ती बदाम; गु. लीली बदाम; क. तारी; सं. गृहद्रुम ; इं. ट्रॉपिकल आमंड, इंडियन आमंड; लॅ. टर्मिनॅलिया कटापा; कुल-कॉंब्रेटंसी). हा पानझडी वृक्ष ९-१२ मी. (काही ठिकाणी १८-२४ मी.) उंच असून मूळचा मलेशिया (मोलुकास) व अंदमान येथील आहे. ब्रह्मदेश व भारत येथील उष्ण भागांत, बागेत व कधी रस्त्याच्या दुतर्फा शोभेकरिता हा लावला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी हा सदापर्णीसारखा वाढत असल्याने सावलीकरिताही उपयुक्त ठरतो; कोकण व उत्तर कारवारातही हा लावलेला आढळतो. खोडाची साल करडी व गुळगुळीत आणि फांद्या आडव्या व मंडलित (एकावर एक मजल्याप्रमाणे) व घेर १.८ - २.४ मी.; पाने जाड, कोवळेपणी बहुधा केसाळ नंतर गुळगुळीत, चकचकीत, मोठी (१५ - २३ सेंमी.), फार लहान देठाची, एकाआड एक, तळाशी साधारण हृदयाकृती, टोकाकडे रुंद असून फांद्यांच्या टोकाला गर्दीने वाढतात; झडण्यापूर्वी लालबुंद होतात. फुले लहान व हिरवट पांढरी असून ती पानांबरोबर त्यांच्या बगलेतील कणिश-फुलोऱ्यावर [⟶पुष्पबंध] प्रथम द्विलिंगी व नंतर पुल्लिंगी अशी येतात. फुलांची संरचना व झाडाची इतर सामान्य लक्षणे ⇨कॉंब्रेटेसीमध्ये (अर्जुन कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. पाकळ्या नसतात. फळे अश्मगर्भी (२.५-४ सेंमी.), लंबगोल, काहीशी चपटी व दोन्ही बाजूंस फुगीर असून त्यांवर कडेने पंखासारखी किनार असते. बीज एकच; आठळी फळातील व बीजातील मगज खाद्य; तथापि फळातील मगज बेचव व बीजातील तैलयुक्त असतो. हे तेल ‘खऱ्या बदामा’तील तेलासारखे असते व त्याऐवजी ते वापरतातही. सालीत नऊ टक्के टॅनिन असते; साल व पाने यांपासून काळा रंग काढतात; सूत, रेशीम व लोकर रंगविण्यासाठी पाने व सालीतील रंगद्रव्य उपयुक्त असते. ‘टसर’ जातीच्या रेशमाच्या किड्यांच्या वाढीकरिता पानांचा उपयोग करतात. लाकूड लालसर, कठीण, हलके व टिकाऊ असल्याने घरबांधणीत व शेतीच्या अवजारांकरिता उपयोगात आहे. साल स्तंभक (आकुंचन करणारी), मूत्रल व हृदयास शक्तिवर्धक असते. कोवळ्या पानांच्या रसाचे मलम कुष्ठ, खरूज इ. चर्मरोगांवर उपयुक्त असते. पोटदुखी व डोकेदुखी यांवर हा रस पोटात देतात. नवीन लागवड बियांनी होते.
कुलकर्णी, उ. के.
भुतिया बदाम : (हिं. उर्णी; इं. टर्किश हॅझेल; लॅ. कॉरीलस कॉल्यूनौ ; कुल-बेट्युलेसी). हा सु. २१ मी. उंच व पानझडी वृक्ष मूळचा यूरोपातील असून त्याचा प्रसार द. यूरोप, ट्रान्स कॅस्पियापर्यंत झाला आहे. प. समशीतोष्ण हिमालयात काशमीर ते कुमाऊॅंमध्ये १,६५०-३,१०० मी.उंचीपर्यंत तो आढळतो. काश्मीरातील वनात तो सामान्यपणे आढळतो. याची साल गर्द करडी व पातळ; पाने साधी, सोपपर्ण, हृदयाकृती, एकाआड एक, गोलसर-अंडाकृती, काहीशी खंडित व द्विदंतुर (किनारीवरच्या दात्यांवर पुन्हा दाते असलेली), वरून गुळगुळीत व खालून लवदार. ३-१० एकलिंगी फुलांचे झुबके लोंबत्या कणिशावर एकाच झाडावर येतात. नर-पुष्पे लोंबत्या कणिशावर छंदाच्या बगलेत एकेकटी असतात. परिदले नसतात; केसरदले आठ; स्त्री-पुष्पांचे फुलोरे लहान व खवलेदार कळी-प्रमाणे; चिवट छदमंडल टोकाशी उघडे व त्यावर प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) केसांची गर्दी असते [⟶फूल]. शुष्क फळ (कपाली) एकबीजी; कठीण आवरणाचे, गोलसर-अंडाकृती, केसाळ व १.८ सेंमी व्यासाचे असते. ‘कॉन्स्टॅंटिनोपल नट’, ‘फिलबर्ट’ व ‘हॅझेलनट’ या नावांनी फळे ओळखली जातात; ती खाद्य व पौष्टिक असतात. फळांचे घोस व शोभा यांकरिता ही झाडे लावतात. दर तीन वर्षानी फुलांचा बहर येतो व फळे भरपूर मिळतात. तुर्कस्तानातील फार मोठ्या लागवडीत, फुलांचा मोसम वार्षिक असून झाडे लावल्यापासून चार वर्षानी फुले व फळे येण्यास सुरुवात होते व वीस वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. याचे लाकूड फिकट लालसर, साधारण कठीण व स्थानिक सामान्य उपयोगाचे असते. हिमालयाच्या मध्य व पूर्व भागात २,४८० - ३,१०० मी. उंचीवर दुसरी पानझडी जाती हिमालयी हॅझेल (कॉ. फेरोक्स, नेपाळी नाव : करी; भुतिया नाव : लंगुरा) आढळते. हिच्या कपाली फळाच्या भोवती काटेरी पेल्याचे आवरण असते; फळातील मगज खाद्य असतो. छेदकमंडल जाड व मांसल असते.