बंजारा
बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये 'गौर' तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. गौरराजवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हणले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय.भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे बघितल्या जाते. काटक, लढवय्या, साहसी व निसर्गप्रेमी अशी त्यांची खरी ओळख. त्यांचे पुर्वीचे मुख्य स्थान राजपुताना, मारवाड मानले जाते. मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर राजपुतानाचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे गौर बंजारा समुह व उपसमुहाच्या अनेक टोळया राजस्थानमधून दक्षिण मध्य, उत्तर भारतातील काही राज्यामध्ये तर काहींनी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश मध्ये येऊन वेगवेगळ्या नावांनी राहू लागली. महाराणा प्रताप सोबत यातील गौर बंजारा टोळ्या जंगलात गेल्या आणि जंगलात आपले बस्तान त्यांनी बसविले. गोर बंजारा हे राजपूताची एक शाखा असल्याचे अनेक इतिहासकारांचे मत आहे.
गोर बंजारा समाजासाठी 'गोरमाटी' असाही एक शब्दप्रयोग केला जातो. 'मातीशी जुळलेला माणूस' , 'मातीशी नातं ठेवणारा माणूस' म्हणजे गोरमाटी. हिंदी , राजस्थानी भाषेत 'गौर' नावाने उल्लेख होतो. गौरमाटीला गोरमाटी हा शब्दप्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकीयांसाठीच करताना दिसतात. तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही. अनेक सिनेगीतातून, हिंदी काव्यरचना इत्यादींमधून 'बंजारा' या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आपणास सापडतो. 'बंजारा' लोकगणातील राजवंशीसाठी 'गौर बणजारा' असा शब्द प्रयोग होताना दिसतो. या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे 'गौर क्षत्रिय असलेल्या या लढवय्या समाजाचे साम्राज्य अस्तास आल्यानंतर रानावनात गेला' असा होतो. कालांतराने 'बंजारा' हा शब्द रुढ झाला असे निष्कर्ष अनेक इतिहास संशोधकांनी काढलेली आहे.
मुळ राजपुताना मधला वैभवशाली इतिहास व संस्कृती असणाऱा हा समाज कालांतराने भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात आपल्या विविध व्यवसायावरून गौर-बंजारा', 'गोरमाटी' , 'लमाणी',' ' 'वंजारा' 'लभाणा' , 'बाजीगर', 'नायक' , राजपूत बंजारा , 'बामनिया बंजारा' इत्यादी नावाने ओळखला जातो. परंतु या समुदातातील विविध उपसमुहाचे व्यवसाय पूर्वी जरी भिन्न होते, परंतु यातील अनेक उपसमुह हे स्वतः बंजारा नाव धारण केल्याने बंजारा म्हणून ओळखू लागली. गौरबंजारा ही क्षत्रिय जमात असून यात अनेक शूरवीर, छोट्या छोट्या भूभागाचे साम्राज्याचे अधिपती असल्याचे संदर्भ ही इतिहासात सापडतो. आपली वैभवशाली संस्कृती आणि इतिहास आजही या समाजाने जपल्याचे दिसून येते. नेतृत्व करणारा समाज , निडरपणे लढणारा यावरून बंजारा समाजाला 'नायक' असे म्हणतात. तसेच तांडा वसाहतीच्या प्रमुखांना सुद्धा 'नायक किंवा नाईक' असे म्हणले जाते. आजमितीला बंजारा समाज हा भारतातील जवळ जवळ सर्वच राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळते. बंजारा भाषा , बंजारा संस्कृती , बंजारा समाज, बंजारा साहित्य अशा स्वरूपात 'बंजारा' याच नावाने सध्या ओळखले जाते.
बंजारा शब्दाचा अर्थ आणि उत्पत्ती
- बंजारा शब्दाचा अर्थ व उत्पत्ती :-
१. वाणिज्यकार :- ऋग्वेदात व्यापाराशी संबंध असणाऱ्या व्यक्तीस 'वाणिज्य' असे म्हणले आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती 'वाणिज्य' या संस्कृत शब्दापासून झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. बंजारा लोक पूर्वीच्या काळी कापडाचे धागे, अन्नधान्य, केशर, मसाले पदार्थ , शस्त्रसाठा, युद्ध सामुग्री पुरवीत . पद्धतशीरपणे आपल्या बैलांच्या पाठीवर लादून भारतातील वेगवेगळ्या प्रांतात, युरोपियन देशातही वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असत. जीवनावश्यक वस्तू आपल्या बैलांच्या पाठीवर लादून व्यापार करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमण करणे याला 'लदेणी' असे म्हणतात.
'वाणिज्य' या संस्कृत शब्दासाठी हिंदी भाषेत 'बनज' असा शब्द प्रयोग आढळतो. 'बनज' म्हणजे व्यापार करणाऱ्यांस 'बनिज' असे संबोधले जाई. पुढे 'बनिज' या शब्दावरून 'बंजारा' हा शब्द रूढ झाला असावा असा युक्तिवाद केला जातो.
२. बनचर :- 'बंजारा' हा लोकवाचक शब्द 'बनचर' या हिंदी शब्दावरून रूढ झाला असावा असाही तर्क वर्तविला जातो. व्यापाराच्या निमित्ताने 'भटकंती करणारा' या अर्थाने बंजारा शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे, असे गोर- बंजारा संस्कृतीचे अभ्यासक आत्माराम राठोड, डॉ.सुभाष राठोड म्हणतात. 'बनचर' म्हणजे वनात वास्तव्य करणारा लोकसमूह.
बंजारा लोकगणाच्या संदर्भात एक बाब अशी दिसते की, बंजारांची लोकवस्ती आजही प्रामुख्याने डोंगराळ भागात डोंगर पायथ्याच्या जवळ असल्याचे दिसून येते. त्यांचे डोंगराळ भाग निवडण्यामागे एक मुख्य कारण असे दिसते की गोरबंजाराकडे मोठ्या प्रमाणात गुरे - ढोरे होती. त्यांना चारण्यासाठी ते वनाचा आसरा घेत असत. कालांतराने त्यांचा लदेणीचा व्यवसाय बंद पडल्याने ते जेथे होते तेथेच त्यांना स्थिरावणे भाग पडले असावे. व 'बनचर' या शब्दाचे अपभ्रंश रूप 'बंजारा' असे झाले असावे. म्हणून 'बनचर' या शब्दापासून 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती झाली असावी हेही नाकारता येत नाही. परंतु इतिहासातील संशोधनावरून राजपुतान्यातील अस्थिरतेमुळे क्षत्रिय समुह वेगवेगळ्या प्रदेशात रानावनात राहू लागले, यालाच पुढे बंजारा हे नाव धारण केल्याचेही संदर्भ इतिहासात सापडतो.
बंजारा गौत्र आणि कुळ
गोर बंजारा समाजात राठोड, पवार, चव्हाण आणि जाधव हे प्रमुख कूल मानले जातात. यांची वंशावळी व गोत्र राजस्थानमधील क्षत्रियाशी पुर्णतः मिळतेजुळते आहे. आजही त्यांच्या नावात अधिकतेने 'सिंह किंवा 'सिंग' असे नावापुढे लावले जाते. उदा. फुलसिंग, लाल सिंग, चतुरसिंह, हरीसिंघ वगैरे, तसेच गोत्र देखील राणावत, रणसोत, रामावत, सांगावत , झरपला, झारापत , बिंजरावत, मुनावत, मेघावत, खेतावत, धेगावत गोरावत, आमगोत, पालतीया , मालोत, पंवार, सांगावत, उधावत, धारावत, लोकावत, जाठरोत , बाणोत, घुगलोत, नुणसावत, गोरामा , वाकडोत, लाखावत असे गोत्र आढळून येतात.कुलानुसार प्रत्येकाची गोत्रे देखील आहे.चव्हाण कुलाचे ०६ गोत्र.जसे कि ऋतूची संख्या सहा असते.पवार कुलाचे १२ गोत्र आहे.जसे की वर्षाचे बारा महिने असते. राठोड कुलाचे २७ गोत्र आहे.जसे की वर्षाचे सत्तावीस नक्षत्रे असते.जाधव कुलाचे ५२ गोत्र आहे.जसे की वर्षाचे बावन्न आठवडे असते.यावरून असे निष्कर्ष काढला जातो की ,हा निसर्गत: हा प्रकृतीपुजक , निसर्ग प्रेमी आहे. या ९७ कुळी गोरराजवंशी बंजाराच्या प्रत्येक कुलाची आराधनाही स्वतंत्र स्वरुपात असते. कुलदैवत महाकाली, जगदंबा असुन यालाच महागौरी असे म्हणतात. महागौरी हे गौर वंश सुचक दिसून येते. बंजारी देवी यासह व्यंकटेश्वर तिरूपती बालाजीला मनोभावे पुजतात. विशेषतः गौर बंजारा समाजात सातीभवानीला पुजल्या जाते. भगवान शंकराचा वाहन असलेल्या नंदीची पुजा आजही मोठ्या आस्थेने केली जाते. यालाच 'गराशा' असेही म्हणले जाते. महागौर , महागौरी , सतगुरू हाथीराम बाबा महाराज, संत सेवालाल महाराज, राणा लखीराय बंजारा (राणा लखी शाह) , बंजारी माता, संत रूपसिंह महाराज, सामकी माता, संत सामतदादा, संत लक्ष्मण चैतन्य महाराज, महानायक वसंतराव नाईक, संत ईश्वरसिंह महाराज, संत रामराव महाराज , सुधाकरराव नाईक ही बंजारा समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते. यासह वीर गोरा बादल , राजा गौरभोज, राणी दूर्गावती बंजारन , गुरुगोविंद गौर , राणा प्रतापसिंह , वीर मनिसींह पंवार , राजा गोपीचंद गौर , वीरांगना मलुकी आदी शुरवीर महापुरुषांचे स्मरण समाजात विविध उत्सव विधीप्रंसगी स्मरण केले जाते.
तांडा व्यवस्था
संपूर्ण भारतात बंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या स्वतंत्र वसाहती आहेत. लदेणी व्यवसायाच्या निमित्ताने मध्य युगापर्यंत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात आढळतो. आपला परंपरागत व्यवसाय इंग्रजांच्या आगमनानंतर उद्ध्वस्त झाल्याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तो एका ठिकाणी स्थिरावल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. गौरबंजारा वस्तीस्थानास तांडा असे म्हणतात. तांडयाच्या प्रमुखाला नाईक (नायक) असे म्हणतात. 'तांडा' मध्ये प्राचीन काळापासून आजही 'सेनं सायी वेस' ही वैश्विक कल्याणासाठी सामुदायिक प्रार्थना केली जाते. थोर समाजसुधारक महानायक वसंतराव नाईक यांच्या परिश्रमातून तांड्याला स्थिर जीवन मिळाले. तर तांड्यात सामाजिक सुधारणांची सुरुवात थोर समाजसुधारक बळीराम पाटील मांडवीकर यांनी केली. तांडा हा बंजारा समाजाचा दर्पण मानला जातो. तांडा सक्षमीकरणासाठी आणि तांडा व्यवस्था ग्लोबल व्हावी यासाठी प्रख्यात विचारवंत एकनाथ पवार-नायक यांनी 'तांडेसामू चालो' या तांडावादी विचारांची रुजवणूक केली. बंजारा समाजात तांडा व्यवस्थेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण तांडा द्वारे संस्कृती,भाषा, साहित्य जपण्याचे अत्यंत मोलाचे कार्य आजवर होत आले.
पारंपरिक बंजारा कला
भारतीय बंजारा समाज एक आदिम क्षत्रिय समाजगण असून त्यांची लोकसंस्कृती ही तितकीच पुरातन व लौकिक असल्याचे दिसते. बंजाराचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य व पराक्रम यांनी समृद्ध आहे. पारंपरिक बंजारा कला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.कशिदाकाम , पोशाखशैली, वास्तुकला, 'गोरला' युद्धकला,व्यंजनशैली,घेर-घुमर न्रृत्यकला ही पारंपरिक कलाकौशल्य बंजारा समाजाने आजही जपल्याचे दिसून येते. उपजत कष्टाळू,साहसी मुलत:च सृजनशील असा हा समाजगण असून आपले सांस्कृतिक आविष्कार सण-उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच-गाण्यात आनंद शोधणाऱ्या बंजारा समाजाने काशीदाकारी सारख्या अनेक कलाकुसरींची मनोभावे जपणूक केली आहे.
हे सुद्धा पहा
- बंजारा तांडा
- ^ LOHGARH -The worlds largest fort,The capital of the sikh kingdom. दिल्ली: ब्ल्यू रोज पब्लिशर्स. २०१९.
- ^ पाटील, बळीराम हिरामण (२०१२). बंजारा लोगोका इतिहास. गुजरात: नवदुर्गा प्रकाशन.
- ^ राठौड, डॉ. जयपाल सिंह (२०१५). बंजारो का सांस्कृतिक इतिहास. जोधपूर, राजस्थान: राजस्थानी ग्रंथागार.
- ^ राठोड, डॉ. गोविंदसिंह. मारवाड की सांस्कृतिक धरोहर.
- ^ कापडी, रामसिंह (१९६३). गोर वंश का इतिहास. हरियाणा.
- ^ बलजोत, इंदरसींग (२०१२). गोर राजपूतो के अनमोल रतन. पंजाब.
- ^ Vaidya, C. V. (१९२१). History of Medieval Hindu.