बंगाली लिपी
बंगाली लिपी बंगाली भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. सध्याचा बिहार, प. बंगाल, बांगला देश, आसाम, नेपाळ व ओरिसा या प्रदेशात दहाव्या शतकानंतर सापडणाऱ्या शिलालेखांतून आणि बाराव्या शतकानंतरच्या हस्तलिखितांतून ही लिपी आढळून येते.
ही लिपी नागरी लिपीपासून उत्पन्न झाली. दहाव्या शतकातील बंगालचा राजा नारायणपाल याच्या लेखात जवळजवळ सर्व लिपी नागरी आहे; फक्त ‘ए’ आणि ‘ख’ ही अक्षरे बंगाली लिपिकडे झुकणारी आहेत. अकराव्या शतकातील पालवंशी विजयपाल याच्या देवपाडा लेखात ‘ए’, ‘ख’, ‘ञ’, ‘त’, ‘थ’, ‘म’, ‘र’, ‘ल’ आणि ‘स’ ही अक्षरे नागरी लिपीपेक्षा वेगळ्या वळणाची आहेत. यानंतरच्या काळात उपलब्ध झालेल्या लेखांतून नागरी अक्षरांचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आणि त्यातूनच बंगाली लिपी उत्क्रांत झाली. बाराव्या शतकातील वैद्यदेवाच्या लेखात ‘ॠ’, ‘ए’, ‘ऐ’, ‘ख’, ‘ग’, ‘ञ’, ‘त’, ‘थ’, ‘न’, ‘म’, ‘य’, ‘र’, आणि ‘व’ ही बंगाली अक्षरे आली आहेत.त्या लिपीस प्राक् बंगाली म्हणता येईल. प्राक् बंगाली व आधुनिक बंगाली लिपीमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे या काळात अक्षरांच्या डोक्यावर त्रिकोण दिसू लागले. याशिवाय अक्षरावर डावीकडे आडवी रेघ असे आणि ती ‘हूक’ प्रमाणे म्हणजे आकड्यांप्रमाणे वळलेली असे. त्यास ‘नेपाळी हूक’ असे म्हणत. देवपाडा लेखात ‘क’ आणि ‘त’ या अक्षरांवर असे हूक दिसून येतात. लक्ष्मणसेनाच्या बाराव्या शतकातील तर्पणदिघी लेखात नेपाळी हूक एका आड एक अक्षरांवर दिसून येतात. बंगाली लिपीतील ‘अ’, ‘आ’, ‘क’, ‘ञ’, आणि ‘र’ या अक्षरांतील उभा दंड डाव्या बाजूला वळला आहे. ‘ए’, ‘ॠ’, ‘र’, या अक्षरांचे दाक्षिणात्य लिपीशी साम्य आहे. त्याचप्रमाणे ‘ख’, ‘ग’, आणि ‘श’ ही अक्षरेही दाक्षिणात्य तमिळ लिपीमध्ये सापडतात. मुसलमानी आक्रमणामुळे भारताचे सामाजिक व राजकीय जीवन ढवळून निघाले. या काळात लिपीतही फरक पडला. अठराव्या शतकात पाश्चात्त्य संस्कृतीच्या संपर्कामुळे व मुद्रण कलेमुळे पुन्हा अक्षराच्या वळणात फरक पडला. बंगाली लिपीपासूनच मैथिली लिपीची उत्पत्ती झाली. मिथिला भागातील ब्राह्मणवर्ग या लिपीमध्ये संस्कृत ग्रंथ लिहीत असत.
संदर्भ
- Banerji, R. D. Origin of the Bengali Script, Calcutta, 1919.
- Buhler, George, Indian Palaeography, Calcutta. 1962.
- ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.
- मराठी विश्वकोश
- http://mr.vikaspedia.in/