Jump to content

फेर्दीनां फॉश

फेर्दीनां फॉश हे एक पहिल्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांचा सर्वोच्च. ओत-पीरेने प्रांतातील तार्ब गावी एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्म. तत्कालीन कॅथलिकविरोधी वातावरणामुळे त्याच्या व्यावसायिक प्रगतीत अडथळे आले. शालेय शिक्षणानंतर १८७० सालच्या ⇨ फ्रँकोप्रशियन (जर्मन) युद्धाच्या वेळी फ्रेंच पायदळात तो भरती झाला व पुढे १८७३ मध्ये फ्रेंच तोफखान्यात अधिकारी बनला. १८९५ ते १९०० या काळात एकॉल द गॅर या सैनिकी विद्यालयात प्राध्यापक असताना अभिजात युद्धतंत्रज्ञ म्हणून त्याचा लौकिक झाला. १९०३ मध्ये त्याचा दे प्रँसीप दला गॅर हा युद्धतंत्रावरील सैद्धांतिक विवेचन करणारा ग्रंथ प्रसिद्ध झाला.


या ग्रंथात त्याने सैन्याच्या मनोधैर्याचा विचार प्रभावीपणे मांडला होता. या ग्रंथाखेरीज त्याचा दला काँद्युईत दला गॅर हा युद्धशास्त्रावरील ग्रंथही अभ्यासनीय आहे. रायफल आणि मशिनगन या अस्त्रांमुळे पायदळाचे आक्रमकबळ दुर्दम्य असते, असे त्यास वाटे. सेनेने सतत आक्रमणशील असावे, या तत्त्वाचा पुरस्कार तो आवर्जून करी पण दुर्दैवाने महायुद्धाच्या आरंभीच्या महिन्यांतच फ्रेंच सैन्याची फार हानी झाली व त्याच्या या तंत्रांतील त्रुटी उघड झाल्या. फेरविचारांती त्याने पुढे त्यांत योग्य ते बदल केले. तत्कालीन फ्रेंच सर सेनापती जे. जे. सी. झॉफ्र याने फॉशची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यास नवव्या सेनेचे सेनापतिपद दिले. १९१६ साली त्याच्या डावपेचांमुळे दोस्तराष्ट्रांच्या कोलमडू लागलेल्या इटलीतील सैनिक-आघाडीला स्थैर्य मिळाले. १९१७ साली रशिया जर्मनीला शरण गेल्यामुळे व १९१८ च्या प्रारंभी जर्मनांनी जोरदार चढाई केल्यामुळे परिस्थिती बिकट झाली होती. दोस्तराष्ट्रांच्या सैनिकी कारवायांचे नियंत्रण एकाच व्यक्तीकडे असावे, असे ब्रिटिश सेनापती डग्‍लस हेग याने फ्रेंच पंतप्रधान ⇨ झॉर्झ क्लेमांसो व ब्रिटिश पंतप्रधान लॉइड-जॉर्ज यांना सुचविले. त्यामुळे फॉशला सर्वोच्च म्हणून नेमण्यात आले. फॉशने जर्मन चढाईस पायबंद घातला. जर्मनीची पीछेहाट सुरू झाली. फॉशने जर्मन सेनेच्या सर्व आघाड्यांवर प्रतिहल्‍ले चढवून दोस्त राष्ट्रांना विजय मिळवून दिला. फ्रान्स, पोलंड व ब्रिटन या देशांनी त्यास मार्शलचा हुद्दा दिला, तर फ्रेंच अकादमीने त्यास सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. पॅरिस येथे त्याचे निधन झाले. लंडनमधील व्हिक्टोरिया रेल्वे स्थानकाजवळ (येथूनच १९१४-१८ या कालात लाखो ब्रिटिश सैनिक फ्रान्सच्या रणांगणावर गेले होते.) त्याचा पुतळा उभारण्यात आला. विशेष म्हणजे पुतळा ज्या भूभागावर उभा आहे, तो भूभाग फ्रेंच राष्ट्राच्या ताब्यात आहे.