फेमिनिस्ट परस्पेक्टीव्ह्ज ऑन सोशल रिसर्च (पुस्तक)
फेमिनिस्ट पर्सपेक्टीव्स ऑन सोशल रिसर्च[१] हे शेरलिन नेगी हेसे बैबर व मिशेल येईसेर द्वारा २००४ मध्ये संपादित पुस्तक आहे. सदरचे पुस्तक हे ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस द्वारे प्रकाशित केले गेले. तीन भागांमध्ये विभागलेल्या या संपादित पुस्तकाद्वारे संपादक स्त्रीवादी संशोधनात येणारे ज्ञानमीमांसा (epistemology), पद्धतीशास्त्र (methodology) व पद्धती (methods) याबाबतीतील प्रश्नांना सामोरे जातात.
प्रस्तावना व योगदान
पारंपारिक पद्ध्तीशास्त्रासोबत झालेल्या सातत्याच्या संवादातून स्त्रीवादी पद्धतीशास्त्र विकसित होत असताना स्त्रीवादी भाष्यकारांनी समाज विज्ञानातून केले गेलेले स्त्री, पुरुष आणि सामाजिक जीवनाच्या विश्लेषणाला मुलभूत आव्हान दिले आहेत.[२] स्त्रीवादी संशोधकांमध्ये स्त्रीवादी पद्ध्तीशास्त्राचं वेगळेपण काय किंवा स्त्रीवादी अभ्यासपद्धती पारंपारिक अभ्यास पद्धतीनां कोणत्या प्रकारे आव्हान देते किंवा पूरक ठरते, ते वेगळेपण स्त्रीवादी संशोधनात् कसे प्रतिबिंबित होते?, संशोधनासाठी अशी काही विशिष्ठ स्त्रीवादी पद्धत आहे का?, असे व अशा तऱ्हेची चर्चा विविध विषयांवर सातत्याने चालू आहे. तसेच स्त्रीवादी संशोधन बहुतेक वेळा आंतरविद्याशाखीय (interdisciplinary) पद्धतीनी होत असले तरीही आंतरविद्याशाखीय पद्धतीने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचे पद्ध्तीशास्त्र व तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन करणारी पुस्तके कमी आहेत असे दिसते. वरील सर्व मुद्यांवर चर्चा या पुस्तकातून केलेली दिसते. संशोधन पद्धती, स्त्रीवादी पद्धती, गुणात्मक संशोधन पद्ध्तीशास्त्र, स्त्रीवादी तत्त्वज्ञान व स्त्री अभ्यास या ज्ञानशाखांमधील अभ्यासक्रमात सदरचे पुस्तक विशेषतः उपयोगी ठरेल.
स्त्रीवादी ज्ञानमीमांसा, पद्ध्तीशास्त्र व् पद्ध्तीने पार्ंपारिक पद्ध्तीशास्त्राला दिलेले आव्हान
पुस्तकातील भाग १ मध्ये स्त्रीवादी संशोधन करताना येणारे ज्ञानमीमांसा, पद्धतीशास्त्र व पद्धती संबंधी प्रश्न हाताळले गेलेले आहेत. यामध्ये स्त्रीवादी संशोधनाच्या वेळी येणारे तात्त्विक मुद्दे व चर्चेचा आढावा घेतलेला आहे तसेच स्त्रीवादी संशोधनाने केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेतलेली आहे. विज्ञान व समाजविज्ञान या दोन्ही शाखांमधील संशोधनातील प्रत्यक्षज्ञानवाद (positivism) व पुरुषकेन्द्री पूर्वग्रहांना (androcentrism) सामोरे जात स्त्रीवादी संशोधन कसे विकसित झाले व निरपेक्षतावाद, प्रत्यक्षतावाद व स्त्रीवादी पद्धती यासंदर्भातील वादविवादांचा येथे आढावा घेतलेला आहे. या पुस्तकात संपादक, विविध लेखांच्या संकलनातून विज्ञान व समाजविज्ञानातील संशोधनामधील प्रत्यक्षतावादाला व पुरूषकेन्द्री पूर्वग्रहांना, स्त्रीवाद्यांनी दिलेल्या विविध प्रतिक्रिया, विशेषतः ज्यांना सॅन्ड्रा हार्डिंग (१) स्त्रीवादी भूमिदृष्टी (Feminist Standpoint) व (२) उत्स्फूर्त स्त्रीवादी अनुभववादी (Spontaneous Feminist empiricists)[३] असे संबोधितात, त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवतात. दोन्ही विचारप्रवाहांनी कशा प्रकारे वैज्ञानिक संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये दिसणाऱ्या लैंगिक व पुरुषकेंद्री पूर्वग्रहांची कारणं मांडली आहेत हे स्पष्ट करत ते स्त्रीवादी भूमिदृष्टी कशाप्रकारे संशोधनाला स्त्रीवादी बनवते याची मांडणी करतात. जिथे एकाबाजूला उत्स्फूर्त स्त्रीवादी अनुभववादी, संशोधनातील मुलभूत तर्काला विरोध न करता, स्त्रीवादी अभ्यासाला 'चांगले विज्ञान' व 'चांगले तत्त्वज्ञान' मधील उपलब्ध निकषांमध्ये बसवू पाहतात तेथे दुसऱ्या बाजूला स्त्रीवादी भूमिदृश्टीचे समर्थक प्रत्यक्षतावादातील ज्ञानमीमांसा व पद्धतीशास्त्रालाच लैंगिक व पुरुषकेंद्री पूर्वग्रहांचे कारण सांगून त्याला आव्हान देतात. उत्स्फूर्त अनुभववादी, वैज्ञानिक संशोधनात दिसणाऱ्या पुरुषकेंद्री पूर्वग्रहांच कारण, अस्तित्वात असलेल्या पद्धती व नियमांचं अपूर पालन मानतात. त्यांच्या मते त्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास पूर्वग्रह टाळण शक्य आहे. याउलट भूमिदृष्टीवादी याला समस्येच केवळ एक भाग मानतात. त्यांच्या मते संपूर्ण वैज्ञानिक समुदायाचे भाग असलेले सामाजिक मुल्य, हितसंबंध व उद्देश समजण्यास व संशोधनाच्या निष्कर्षात त्याचे परिणाम उमटू न देण्यास, उपलब्ध पद्धती आणि नियम अपुरे व कमकुवत आहेत. संशोधनामधील लैंगिक व पुरुषकेंद्री पूर्वग्रह शोधून काढण्याइतपत निरपेक्षतावादाची व्याख्या अजून झालेली नाही. स्त्रीवादी भूमिदृश्तीचे समर्थक या प्रश्नाचे उत्तर, अधिक चांगले व सशक्त पद्धती निर्माण करून देतात जे संशोधनामधील निरपेक्षता वाढवण्यासाठी अधिक चांगले प्रयत्न करण्यास मार्गदर्शन देतील. तसेच संशोधन प्रश्नांची निर्मिती स्त्रियांच्या अनुभवविश्वातून करून, व 'स्त्री' हा एकजिनसी कोटिक्रम नाकारत, स्त्रीवादी भूमिदृष्टी 'भिन्नतेचा मुद्धा पुढे आणते व सामाजिक पातळीवर निर्माण झालेले कोटिक्रम उदा. वर्ण, जात इत्यादी कसे तुमच्या लिंगभावात्मक अनुभवांवर परिणाम पाडतात याचा स्वीकार कशा प्रकारे प्रत्यक्षतावादी ज्ञानमीमांसेला आव्हान देते याचा आढावा या पुस्तकाद्वारे घेतलेला दिसतो.
स्त्रीवादी व् भिन्नता
पुस्तकातील दुसऱ्या भागात भिन्नतेच्या मुद्यावर स्त्रीवाद्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा आढावा घेतलेला दिसतो. स्त्री व पुरुषांमधील भिन्नता दाखवून स्त्रीवाद्यांनी प्रत्यक्षतावादातील सार्वत्रिकतेच्या मूल्याला आव्हान दिले. पुढे स्त्रीवादी अभ्यासकांवर, वंश, वर्ग, लिंगभाव, लैंगिकता, लैंगिक निवड, राष्ट्रीयत्व व मानववंशीय पार्श्वभूमीवर आधारित भिन्न्तेचा आढावा घेत नसल्याचे किंवा घेतलेच तर त्यातील अंतरसंबंधांचे विश्लेषण न करण्याबाबत टीका केली गेली. या टीकेला प्रतिक्रिया देत स्त्रीवादी अभ्यासात भिन्नतेचा मुद्दा कसा सामावला गेला याबाबत सदरचा भागात भाष्य केलेले दिसते. भिन्न्तेला संबोधण्यासाठी प्रचलित 'स्त्रिया घाला व ढवळा' या पद्धतीच्या थोडक्यात मर्यादा सांगत सदरचे भाग वेबरच्या[४] लेखाद्वारे आपल्या समोर वंश, वर्ग, लिंगभाव, लैंगिकता समजून घेण्यासाठी उपयुक्त तात्त्विक चौकाट मांडतात. भिन्न्तेला हाताळण्यासाठी वेबर आपल्याला खालील प्रमाणे सहा मुद्धे सांगतात: १. भिन्न्तेला संदर्भ असतो. २. त्या सामाजिक पातळीवर घडवण्यात आलेल्या आहेत. ३. भिन्नता ही सत्ता संबंधांची व्यवस्था आहे. ४. भिन्नतेचा अभ्यास करताना सामाजिक संरचना व सामाजिक मानसिक संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे. ५. विविध भिन्नतेचे अवकाश एकाचवेळी कार्यरत असतात. ६. ज्ञान व कृती यामधील परस्परावलम्बित्व ते अधोरेखित करतात. या विभागात, संपादक मांडतात की, स्त्रीवादी संशोधनात भिन्नता व त्यातील आंतरसंबंधांचा स्वीकार हा यशस्वी व अर्थपूर्णरित्या भिन्नतेवर काम करण्याची पहिली पायरी मात्र आहे. त्यावर यशस्वीपणे काम करण्यासाठी हे पुस्तक विमर्षतेला (संशोधन प्रक्रियेत संशोधकाचे सामाजिक स्थान व पार्श्वभूमी मांडणे) एक महत्त्वपूर्ण साधन मानते. यामध्ये दाखवून दिलेले आहे कि भिन्नतेचा अभ्यास व अभ्यासात 'कोणती स्त्री' हा प्रश्न विचारणे संशोधकासाठी भिन्न सत्य बघण्यासाठी उपयुक्त साधन ठरतात. भिन्नतेचा अभ्यास व अभ्यासात 'कोणती स्त्री' हा प्रश्न विचारणे संशोधकासाठी भिन्न सत्य बघण्यासाठी उपयुक्त साधन ठरतात. उदाहरणार्थ वंश, वर्ग व लिंगभावाच्या संवादातून कशा प्रकारे काळे व गोऱ्या कुटुंबातील पालकत्वाची पद्धती व मुलं व स्वतः कडील अपेक्षा वेगळ्या ठरतात तसेच यावर हिल व् स्प्रेग[५] प्रकाश टाकतात्. गुंतागुंतीचे व बहुअंगी सत्याच्या स्वीकारातून संशोधक व 'ज्यांच्यावर संशोधन होत आहे' ते दोघेही एकाच पातळीवर येतात व पारंपारिक संशोधनातील सत्ता संबंधाना आव्हान देतात. प्रत्यक्षतावादात काही पद्धतीनां तटस्थ मानण्यात आलेले आहे, पण बहुअंगी सत्याच्या स्वीकारामुळे या विचारांना शह मिळाले. संशोधन पद्धती तटस्थ नसून त्यांच्यावर संशोधकाचे स्थान व उद्देशांचा परिणाम पडतो. त्यामुळे भिन्नतेचा अभ्यास करण्यासाठी विमर्षता हे उपयुक्त तंत्र ठरते. विमर्षतेच्या उपयोगाचे एक चांगले उदाहरण आपल्याला काथ वेस्टन[६]च्या लेखात मिळते जिथे ती विमर्षतेचा उपयोग करून तिच्या अभ्यासात तिचे 'लेसबियन' असणे कसे उपयुक्त ठरले हे दाखवून देते.
स्त्रीवादी पद्ध्ती
स्त्रीवादी संशोधनात विशिष्ठ अशी पद्धती नाही. याउलट स्त्रीवादी संशोधनात ज्ञानमीमांसा, पद्धतीशास्त्र व पद्धती या तिघांमध्ये एक आंतरबद्धतेची प्रक्रिया घडते ज्याचा परिणाम पद्धतीच्या निवडीवर पडतो. म्हणून स्त्रीवादी कुठल्याही पद्धतीचा वापर करू शकतात व संशोधनामागील उद्देश त्या पद्धतीला स्त्रीवादी संशोधनाचा भाग बनवतात. उदा. थोमसन व केथ[७] संख्याशास्त्रीय पद्धतीशास्त्रात महत्त्वाचे मानले गेलेले सांख्यिकीय माहितीचा उपयोग स्त्रीवादी ज्ञान निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला आहे. येथे थोमसन व केथ काळ्या अमेरिकिंच्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील (National Survey of Black Americans)[८] सांख्यिकीय माहितीच्या आधारावर लिंगभाव, त्वचेचा रंगाचा, स्वाभिमान व सामर्थ्य यातील आंतरसंबंध दाखवून देतात. संशोधनात असे दिसून येते कि त्वचेच्या रंगाचा काळ्या पुरुषांपेक्षा काळ्या स्त्रियांवर जास्त नकारात्मक परिणाम दिसून येतो व त्यामुळे काळ्या स्त्रियांवर सर्वात जास्त शोषण होत असल्याचे दिसून येते. स्त्रीवादी पद्धतीशास्त्राचे वेगळेपण पद्धतीत नसून ज्ञानमीमांसा, पद्धतीशास्त्र व पद्धती यांचे समन्वयात्मक वापरात आहे. पद्धतीच्या वापरामागील उद्देश म्हणजेच संशोधनाची मुळे स्त्रियांच्या प्रश्नात असणे किंवा नसणे ज्यामुळे एकंदरीतच ज्ञानमीमांसा, पद्धतीशास्त्र व पद्धतीं मध्ये साजेसे बदल होतात, संशोधनाला व त्या पद्धतीला स्त्रीवादी ठरवतात.
प्रतिसाद
लियामपुतोंग[९] आपल्या पुस्तकात सदर पुस्तकाचा संदर्भ घेत म्हणतात कि स्त्रीवादी पद्ध्तीशास्त्र हे मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या व अंधारात असलेल्या सर्व शोषित गटांबाबत ज्ञान निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते कारण ते नवीन ज्ञान निर्मितीस प्रोत्साहन देते.
संदर्भसुची
- ^ हेसे - बायबर, एस. एन. व येइसर, एम.एल., (संपादित), Feminist Perspectives On Social Research, न्यू योर्क: ओक्सफर्ड विद्यापीठ.
- ^ goodliffe.byu.edu/310/protect/harding1.pdf
- ^ Harding, S. 2004. Rethinking Standpoint Epistemology: What is ‘‘Strong Objectivity’’?. In: Hesse-Biber, S.N. & Yaiser, M.L. (Ed.) Feminist Perspectives on Social Research. New York: Oxford University, pg. 39-64
- ^ Weber, L. 2004. A Conceptual Framework for Understanding Race, Class, Gender and Sexuality. In: Hesse-Biber, S.N. & Yaiser, M.L. (Ed.) Feminist Perspectives on Social Research. New York: Oxford University, pg.121-139
- ^ Hill,S.A. & Sprague, J. 2004. Parenting in Black and White Families: The Interaction of Gender and Race and Class. In: Hesse-Biber, S.N. & Yaiser, M.L. (Ed.) Feminist Perspectives on Social Research. New York: Oxford University, pg.155-176
- ^ Weston, K. 2004. Fieldwork in Lesbian and Gay Communities. In: Hesse-Biber, S.N. & Yaiser, M.L. (Ed.) Feminist Perspectives on Social Research. New York: Oxford University, pg.198-208
- ^ Thomson,M.S. & Keith, V.M. 2004. The Blacker the Berry: Gender, Skin Tone, Self-Esteem, and Self Efficacy. In: Hesse-Biber, S.N. & Yaiser, M.L. (Ed.) Feminist Perspectives on Social Research. New York: Oxford University, pg. 330-350
- ^ http://www.icpsr.umich.edu/icpsrweb/ICPSR/series/164 -National Survey of Black Americans
- ^ Liamputtong, P. (2007). Researching the Vulnerable: A Guide to Sensitive Research Methods. New Delhi: Sage Publications India Pvt. Ltd.