Jump to content

फेमिनिस्ट कॉन्सेप्ट्स सिरीझ (पुस्तक)

'मैत्रेयी कृष्णराज' यांनी संपादित केलेली व एस.एन.डीटी महिला महाविद्यालयाच्या स्त्री-अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेली स्त्रीवादी संकल्पनांची चर्चा करणारी ‘फेमिनीस्ट कन्सेप्ट’ ही मार्गदर्शक मालिका आहे.

प्रस्तावना

भिन्न प्रदेश,संस्कृती,ज्ञानशाखा, वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रियांचे अनुभव,ज्ञान,आकलन या सर्वांनी मिळून स्त्री -अभ्यासविश्वाची उभारणी झालेली आहे आणि भौतिक परिस्थिती,सांस्कृतिक संरचना आणि वैचारिक संरचना यांतील गुंतागुंतीचे सहसंबंध समजून घ्यायला स्त्री-अभ्यासकांनी सुरुवात केलेली आहे.

ठळक मुद्दे

पाश्चात्य अभ्यासकांनी बिगर पाश्चात्य संस्कृतीचा वेध घेणे आणि बिगर पाश्चात्य अभ्यासकांनी त्यांच्या संस्कृतीचे पुर्नपरीक्षण करणे या दोन्ही गोष्टी खूप उपयुक्त आणि विश्लेषणाच्या पातळीवर गरजेच्या ठरल्या.सुरुवातीच्या काळात स्त्री चळवळीचा हा विश्वास होता की स्त्रियांचे दुय्यमत्व हे वैश्विक आहे आणि म्हणूनच सर्व स्त्रिया'भगिनिभावाच्या'सिद्धान्ताखाली त्याविरोधात एकत्र येतील.कालांतराने हे सिद्ध झाले की, स्त्रिया या वर्गाने,वंशाने, आर्थिक पातळीच्या दृष्टीने विभागलेल्या असतात. त्यामुळे 'भगिनिभाव' ही संकल्पना सहजपणे अमलात येऊ शकत नाही.समाजातल्या भिन्न स्तरातील समस्या या एकजिनसी स्वरूपाच्या असू शकत नाहीत. परंतु,यातून ही मांडणी पुढे आली कि,समाजव्यवस्थेतील अनेक शोषणात्मक संरचना या केवळ स्त्रियांचेच नव्हे तर पुरुषांचे आणि लहान मुलांचेही शोषण करते. त्यामुळे,स्त्रिया या शोषणयुक्त समाजामध्ये खरी स्वायत्तता मिळवू शकतात का आणि अधिकाधिक गुणवत्तापूर्ण अश्या मानवी धारणांची रुजवण करू शकतात का? तसेच सत्तास्पर्धेवर आधारलेल्या या समाजव्यवस्थेत भगिनीभाव नावाची गोष्ट आपल्याला विणता येईल का?याशिवाय,जैविकशास्त्रामधील सिद्धांत हे व्यवस्थेच्या पूर्वग्रहदृष्टीतून मांडले गेलेले आहेत व जीवशास्त्रीय व्यवस्था ही बंदिस्त व्यवस्था नसून ती खुली व बदल करता येणारी व्यवस्था आहे अश्या प्रकारची जीवशास्त्राच्या क्षेत्रामध्ये आव्हानात्मक संशोधने पुढे आली. ‘पितृसत्ता’या तीन खंडांतील शोधनिबंधांनी स्त्री-अभ्याच्या अभ्याससंशोधनातून आलेल्या संकल्पनांची ओळख वाचकांना करून दिलेली आहे.पुस्तकाच्या पहिल्या खंडात पितृसत्ता-मातृसत्ता;लिंगाधारित श्रमविभागणी,घरकाम,उत्पादन आणि पुनरुत्पादन या संकल्पनांची चर्चा झालेली आहे.स्त्रियांच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याकरिता या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. पुरुषी वर्चस्व व स्त्रियांचे दुय्यमत्व रूढ करणाऱ्या संरचनेचे विश्लेषण करण्याकरिता,'पितृसत्ता'ही विश्लेषणात्मक संकल्पना उदयास आलेली दिसते.लिंगाधारित श्रमविभागणी ही संकल्पना स्त्रियांच्या श्रमाचे विश्लेषण करण्याकरीता सध्या व्यापकपणे वापरली जाते. उत्पादन व्यवस्थेची जगण्यासाठीची भौतिक साधने व पुनरुत्पादन यांतील सहसंबंध व व्यवस्थेने स्त्रियांच्या पुनरुत्पादन क्षमतांवर प्रस्थापित केलेले नियंत्रण याबाबतची चर्चा उत्पादन व पुरुत्पादन या दोन्ही सहसंबंधित विश्लेषणात्मक संकल्पनांच्या आधारे करता येते. दुसऱ्या खंडामध्ये स्त्रीवादी लिखाणातील संकल्पनांचे,स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचे आकलन होण्याकरता या संकल्पना किती उपयुक्त ठरतात याचे मुल्यमापन केलेले आहे.या संकल्पना पूर्णता विकसित झालेल्या नाहीत तसेच त्यांची अंमलबजावणी करणे कठीण आहे आणि या संकल्पनांच्या बांधणीशिवाय आपणांस हवी असलेली समाजव्यवस्था वास्तवात आणता येणार नाही.या संकल्पना स्वतंत्र आणि परस्पर असंबंधित नाहीत.पितृसत्ता या विश्लेषणात्मक चौकटीमध्ये इतर सर्व सत्तासंरचना समजून घेता येतात.

योगदान

मैत्रेयी कृष्णराज यांनी संपादित केलेले व एस.एन.डीटी महिला स्त्री- अभ्यास केंद्राकडून प्रसिद्ध झालेली ही स्त्रीवादी संकल्पनांची मालिका विविध ज्ञानशाखांतील स्त्रीवादी अभ्यासकांकरिता उपयुक्त ठरणारी मालिका आहे. स्त्रियांच्या सामाजिक दुय्यमत्वाचे विश्लेषण करण्याकरिता व स्त्री- अभ्यासविश्वाची मजबूत बांधणी करण्याकरीता विश्लेषणात्मक स्त्रीवादी संकल्पना आवश्यक आहेत.

महत्त्वाच्या संकल्पना

भगिनिभाव,पुनरुत्पादन,लिंगाधारित श्रमविभागणी,घरकाम,उत्पादन.