Jump to content

फिलिप्स घराणे

फिलिप्स घराणे हे नेदर्लंड्‌समधील जगप्रसिद्ध आधुनिक उद्योगसमूहाचे प्रवर्तक घराणे. विद्युत् ‌दीप, विद्युत् ‌उपकरणे, रेडिओ व दूरचित्रवाणी यांची निर्मिती करणारे तसेच इलेक्ट्रॉनीय क्षेत्रातील एक अग्रगण्य उद्योगसमूह म्हणून या घराण्याला जगभर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या उद्योगसमूहाचा प्रारंभ नेदर्लंड्‌समधील आयंटहोव्हेन शहरी १५ मे १८९१ रोजी झाला. जेरार्ड (९ ऑक्टोबर १८५८-२६ जानेवारी १९४२) आणि अँटन (१४ मार्च १८७४- ७ ऑक्टोबर १९५१) फिलिप्स या दोन बंधूंनी सतत परिश्रम, चिकाटी, दीर्घोद्योगी, संशोधकवृत्ती या गुणांच्या जोरावर फिलिप्स उद्योग नावारूपास आणला एवढेच नव्हे, तर विसाव्या शतकातील जगड्‌व्याळ कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असे त्या उद्योगाला ख्यातकीर्त केले.


जेरार्ड व अँटन या दोघा बंधूंचा जन्म झाल्टबॉमाल या गावी झाला. त्या दोघांमध्ये १६ वर्षांचे अंतर होते. त्यांचे वडील फ्रेडरिक फिलिप्स यांचा तंबाखूचा व्यापार होता झाल्टबॉमाल गॅस कारखाना त्यांनी इंग्रज मिशनऱ्यांकडून विकत घेऊन ग्राहक व उत्पादक या दोघांचाही फायदा व्हावा अशा पद्धतीने गॅस उत्पादन सुरू केले. हेच तत्त्व या दोन बंधूंनी भावी कारखानदारी कारकिर्दीत अंमलात आणले.

जेरार्ड फ्रेडरिकचे शिक्षण डेल्फच्या ‘ पॉलिटेक्‍निक विद्यालया’त झाले व १८८३ साली त्याने अभियांत्रिकीमधील पदवी संपादन केली. प्रायोगिक भौतिकीचा, विशेषतः इलेक्ट्रॉनिकीचा, विशेष अभ्यास त्याने केला. विद्युत् ‌उत्पादनाबाबत जेथे जेथे प्रयोग चालू होते, तेथील संशोधनाबाबतची वृत्ते, प्रबंध मोठ्या आवडीने तो वाचत असे. २१ ऑक्टोबर १८७९ रोजी टॉमस आल्वा एडिसनने यशस्वीपणे प्रदीप्त दीपाचा प्रयोग केला होता १८८१ मध्ये पॅरिस येथे पहिले वीजप्रदर्शन भरविण्यात आले. १८८१ मध्येच जर्मनीत सीमेन्स व हॉल्स्क यांनी प्रदीप्त दीपनिर्मितीचा एक प्रायोगिक स्वरूपाचा छोटासा कारखाना उभारला होता. १८८३ मध्ये ‘जर्मन एडिसन कंपनी फॉर ॲप्लाइड इलेक्ट्रिसिटी’ या कंपनीची ५० लक्ष मार्क भांडवलावर स्थापना करण्यात आली होती. सीमेन्स व हॉल्स्क यांनी ‘एईजी’ (AEG-जनरल इलेक्ट्रिक कंपनी) कंपनीची स्थापना केली होती. याच सुमारास इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी या देशांत प्रदीप्त दीपनिर्मितीचे छोटे कारखाने उभारण्यात आले होते.


जेरार्डला या पार्श्वभूमीवर ग्‍लासगो येथे अनुक्रमे लॉर्ड केल्व्हिन या भौतिकीविज्ञाच्या प्रयोगशाळेत आणि ‘ग्‍लासगो कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्‌स’च्या प्रा. जेमीसन यांच्या हाताखाली काम करण्याची दुर्मिळ संधी मिळाली. ‘लंडन सिटी अँड गिल्ड्‌स’च्या ‘इलेक्ट्रिक लाइटनिंग अँड द ट्रान्स्‌मिशन ऑफ पॉवर अँड टेलेग्राफी’ या स्पर्धात्मक परीक्षेत तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यानंतर काही वर्षे जेरार्डने लंडनमध्येच जर्मन कारखानदारांचा एजंट म्हणून काम करून अनुभव मिळविला. १८८९ मध्ये तो ॲमस्टरडॅमला परतला व ‘एईजी’ कंपनीचा एजंट म्हणून काम पाहू लागला. जेरार्डच्या वडिलांनी झाल्टबॉमाल येथेच राहत्या घरी जेरार्डकरिता एक छोटीशी प्रयोगशाळा उघडून दिली. १८९० मध्ये जेरार्डला सेल्यूलोज तंतूंचे प्रचंड उत्पादन करता येईल, अशी एक निर्मितीप्रक्रिया प्रयोगांती सापडली. वडिलांनी भांडवल पुरविल्यामुळे जेरार्डने १५ मे १८९१ रोजी ‘फिलिप्स अँड कंपनी’ स्थापन केली. त्याचा धाकटा भाऊ अँटन त्यावेळी सतरा वर्षाचा होता. कल्पनाशक्ती, संवेदनशीलता, खेळांची आवड इ. गुण त्याच्यात होते. झाल्टबॉमालच्या शाळेच त्याची फारशी प्रगती  दिसून न आल्याने त्याला ॲमस्टरडॅमच्या व्यापारी शाळेत घालण्यात आले. येथेही त्याचे मन फारसे रमले नाही. यामुळे अँटनच्या वडिलांनी त्याला ॲमस्टरडॅमच्या एका शेअरदलालाच्या फर्ममध्ये उमेदवार म्हणून पाठविले. लवकरच या कामात त्याला गोडी निर्माण झाली व तो शेअरबाजारात आत्मविश्वासपूर्वक वावरू लागला. १८९४ मध्ये अँटनला शेअरबाजाराच्या पुढील शिक्षणासाठी लंडनला पाठविण्यात आले. इकडे आयंटहोव्हेनचा जेरार्डचा कारखाना पहिली काही वर्षे तोट्यातच चालत होता. भावाच्या मदतीसाठी अँटनला आयंटहोव्हेनला येण्याची विनंती करण्यात आली. प्रथम सहा महिने विक्रेता म्हणून ‘फिलिप्स अँड कंपनी’त काम करावयाचे अँटनने मान्य केले व त्याप्रमाणे तो १८९५ च्या प्रारंभी आयंटहोव्हेनला परतला.

जेरार्डने उद्योगाची तांत्रिक व अँटनने व्यापारी बाजू सांभाळावी, अशी त्यावेळी व्यवस्था करण्यात आली. तथापि थोड्याच दिवसांत अँटनने तांत्रिक बाबीही दीर्घ परिश्रमांनी व चिकाटीने आत्मसात केल्या. १८९५ मध्ये कंपनीचे दिव्यांचे उत्पादन प्रतिदिनी ५०० नग असे होऊ लागले आणि कंपनीला थोडा थोडा नफा होऊ लागला. अँटनने लवकरच आपले विक्रेत्याचे कौशल्य पणास लावून धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्याच्या बोलण्यातील सफाई, आर्जवीपणा आणि सौजन्यशील वागणूक यांमुळे नवीन मालाची विक्री होण्यातील अडथळे दूर होत असत.

जर्मन शहरांना व गावांना विक्रेता म्हणून भेटी देत असतानाच अँटनच्या मनावर जर्मन उद्योगांनी केलेल्या अफाट प्रगतीचा फार मोठा परिणाम झाला. ब्रॅबंट भागातील आयंटहोव्हेन येथे उभारण्यात आलेल्या फिलिप्स कारखान्यामध्ये येणारे कमी उत्पादन परिव्यय, जेरार्ड फिलिप्सची तांत्रिक विषयातील अफाट बुद्धिमत्ता आणि अँटनचे उत्कृष्ट विक्रीकौशल्य या तिन्ही गुणांमुळे यूरोपच्या औद्योगिक बाजारात ‘फिलिप्स अँड कंपनी’ला फार मोठे यश लाभण्याची शक्यता अँटनला जाणवू लागली.

कंपनीला १८९५-९६ या पहिल्या आर्थिक वर्षात सु.१,२०० पाउंड नफा मिळाला. त्यातूनच फिलिप्स बंधूंनी आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करून कारखाना सुसज्‍ज बनविला. १८९५ मधील १,०९,००० नग दिव्यांच्या उत्पादनावरून १८९६ मधील उत्पादन २·८० लक्ष नगांवर गेले. जेरार्ड व अँटन यांच्यामध्ये पुढेपुढे अधिक उत्पादन की अधिक विक्री अशी जणू स्पर्धाच सुरू झाली. १८९७ मध्ये दिव्यांचे उत्पादन ६·३० लक्ष नग झाले. कामगारांची संख्याही याच काळात ६० वरून १७० वर गेली. ९ जून १८९९ रोजी अँटनचा रॉटरडॅम म्युनिसिपल वर्क्सचे संचालक जी.जे.डी. जाँग यांच्या ॲना नावाच्या मुलीशी विवाह झाला.