Jump to content

फिरोदिया करंडक

फिरोदिया करंडक स्पर्धा ही पुण्यातली एक नावाजलेली आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा आहे. १९७४ पासून दर वर्षी ही स्पर्धा होत आली आहे. स्पर्धेसाठी नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन, अभिनय, नृत्य, संगीत, शिल्पकला एवढे विषय असतात. पण स्पर्धा गाजते ती सादर केलेल्या एकांकिकांनी.

इतिहास :

१९७३ साली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये एम.ए.साठी प्रवेश घेतलेल्या सूर्यकांत कुलकर्णीला पुण्यातील कॉलेजांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांत रंगमंचावर नाटके होत नाहीत हे समजल्यावर धक्काच बसला. बहुतेक नाटके विद्यार्थी प्रेक्षकांच्या आरडाओरडी आणि हुल्लडबाजीमुळे रद्द होत. स्नेहसंमेलनांत मारामाऱ्या होत. क्वचित वाडियासारख्या एखाद्या कॉलेजात स्नेहसंमेलनात शिस्त दिसे. इतर कॉलेजांत मेलडीमेकर्ससारख्या कॉलेजबाहेरील संगीत संस्थांचे ऑर्केस्ट्रावजा कार्यक्रम होत असत. फर्ग्युसनचे तेव्हाचे कार्यक्रम-संयोजक पारगांवकर, यांच्या डोक्याला तर विद्यार्थी प्रेक्षकांनी केलेल्या दगडफेकीमुळे जखमा झाल्या होत्या. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्याच कॉमर्स कॉलेजमध्येसुद्धा दगडफेकीमुळे कार्यक्रम रद्द करायची वेळ आली होती.

सूर्यकांत कुलकर्णींनी एक वर्ष जाऊ दिले. पुढच्या वर्षी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी या संदर्भात बोलणे सुरू केले. त्याच सुमारास, लालबहादूरशास्त्री आणि पंडित हृदयनाथ कुंझरू आदी काही नेत्यांनी ‘राष्ट्रीय सहमती मंच‘ या नावाची एक संस्था काढली होती. राष्ट्रीय प्रश्नांवर सहमती वाढवून सामंजस्य निर्माण करणे यासाठी ही संस्था प्रयत्‍नशील होती. संस्थेचे दिल्लीतील समन्वयक रामेश्वरदयाल तोतला यांच्याशी सूर्यकांतची ओळख झाली होती. ‘सहमती मंचा‘ची १९७३-७४ सालातली एक बैठक मुंबईत हिदायतुल्ला यांच्या घरी होणार असल्याचे समल्यावर सूर्यकांत त्या बैठकीसाठी मुंबईला गेले. बैठकीचे मुंबईतील समन्वयक दादासाहेब रूपवते होते आणि पानकुंवरताई फिरोदिया या सचिव होत्या. त्यांनी सूर्यकांत कुलकर्णींची ओळख सहसचिव म्हणून करून दिली.

हे तथाकथित ‘राष्ट्रीय सहमती मंच‘ पुण्यात एक संमेलन आयोजित करणार होते. पानकुंवरताई यांच्याकडे सर्व जबाबदारी होती. कुलकर्णी आपल्या स्वयंसेवकाच्या ताफ्यासहित संमेलनात दाखल झाले. कॉलेज विद्यार्थ्यांमधील कलागुणांना कसा वाव मिळेल याची एक योजना सूर्यकांत कुलकर्णींनी पानकुंवर फिरोदियांना सादर केली.

त्यांच्या सूचनेप्रमाणे, कुलकर्णी पुण्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना भेटले. प्राचार्य आणि कॉलेजांचे व्यवस्थापन यांच्या मते मुले फार बिघडलेली आहेत आणि ती, विद्यार्थ्यांनी अथवा बाहेरच्या कुणीही सादर केलेल्या कार्यक्रमांत धुडगूस घालणारच. त्यामुळे स्नेहसंमेलनात कार्यक्रम सुरळीत होण्याची सुतराम शक्यता नाही.

यावर उपाय म्हणून, सूर्यकांत कुलकर्णी आणि त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील सर्व कॉलेज विद्यार्थ्यांच्या स्पर्धा कॉलेजबाहेर, एखाद्या नाट्यगृहात घेण्याचे ठरवले. प्राचार्य दाभोळकरांनी सूर्यकांतला वेड्यात काढले. आम्ही एका कॉलेजची मुले सांभाळू शकत नाही, तर सर्व कॉलेजांतली मुले एकत्र आली तर शहरभर दंगेधोपे होतील. गोंधळ, हाणामाऱ्या आणि नुकसानीच्या भीतीने स्पर्धेसाठी कोणतेही नाट्यगृह मिळणे शक्य नाही.

सूर्यकांत कुलकर्णी, त्यांचे थोरले भाऊ रमाकांत यांनी, आणि त्यांच्या गटातल्या प्रकाश विद्वत, विक्रम शिंदे, विक्रम खांडेकर, रोहिणी देसाई, माधुरी लोहकरे आदींनी ज्यांत संगीत,नाट्य, नृत्य आदी असेल अश्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा भरवण्याचे ठरवले. स्पर्धेसाठी नाट्यगृह मिळेना. पुण्याचे महापौर भाई वैद्यांनी प्रयत्‍न केला, पण व्यर्थ. शेवटी फिरोदिया कुटुंब मदतीला आले. पानकुंवरताईंचे पती एच.के.फिरोदिया यांनी नाट्यगृहाचे नुकसान झाले तर भरून देण्याची हमी घेतली. आणि स्पर्धा झाल्या आणि विनाविध्वंस झाल्या. फिरोदियांचे ऋण व्यक्त करण्याकरिता स्पर्धेला ‘फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा‘ असे नाव देण्यात आले.

पहिल्या स्पर्धेला मुख्य पाहुणे म्हणून पूर्वी फर्ग्युसनचे प्राचार्य असलेले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू दाभोळकर आले होते. निमंत्रितांमध्ये चित्तरंजन कोल्हटकर होते. एच.के.फिरोदिया आणि पानकुंवर हे तर हजर असणारच होते. स्पर्धेतला पहिला करंडक एस.पी कॉलेजला तर दुसरा पूना कॉलेजला मिळाला.

१९७४ सालापासून ते आजतागायत या फिरोदिया करंडक स्पर्धा पुण्यात होत आहेत, आणि पुढेही होत राहतील.

फिरोदिया करंडक जिंकणारी कॉलेजे

सन पहिले बक्षिस दुसरे तिसरे उत्तेजनार्थ
२०१७विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)सर परशुरामभाऊ कॉलेज(SP)पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजी(PICT)विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी(VIIT)
२०११एम.आय.टी.(डिझाइन्स)
२०१०
२००९विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)पुणे इंजिनिअरिंग कॉलेज(COEP)लॉ कॉलेज(ILS)
२००८
२००७कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP)लॉ कॉलेज(ILS)पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग कॉलेज(PVG)विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)
२००६सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (SCOE)विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)पुणे इंजिनिअरिंग कॉलेज (COEP)पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजी(PICT)
२००५अभिनव कलासिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (SCOE)
२००४गरवारे(MES)सर परशुरामभाऊ कॉलेज (SP)विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)
२००३विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)क्यूमिन्स
२००२पुणे इंजिनिअरिंग कॉलेज(COEP)बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स(BMCC)
२००१विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)पुणे इंजिनिअरिंग कॉलेज(COEP)एस.पी.+पी.व्ही.जी.
२०००भारतीय विद्यापीठ(BVP)पुणे इंजिनिअरिंग कॉलेज(COEP)
१९९९
१९९८एम.आय.टी.(VIT)
१९९७विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)सर परशुरामभाऊ कॉलेज
१९९६विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(VIT)
१९९५
१९९४
१९९३
१९९२पुणे इंजिनिअरिंग कॉलेज(COEP)
१९९१
१९९०
१९८९
१९८८(COEP)|
१९८७पुणे इंजिनिअरिंग कॉलेज(COEP)
१९८६पुणे इंजिनिअरिंग कॉलेज(COEP)

}