Jump to content

फसीउद्दिन कैसर काझी

इतिहासाच्या मध्ययुगीन काळातील नाण्यांचा संग्रह आणि अभ्यास करणारे फसीउद्दिन कैसर काझी यांचा जन्म सन १९६० मध्ये नागपूरजवळच्या दारवा या गावी झाला. तेथे त्यांच्या वाडवडिलांची शेती त्यांचे वडील पहात असत. बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन नंतर काझीसाहेब उर्दू विषय घेऊन बी.ए. झाले. आपल्या घराण्याचा वंशवृक्ष तयार करण्याच्या निमित्ताने गावोगाव फिरताना आणि संदर्भ गोळा करताना त्यांना इतिहासाची गोडी लागली. ऐतिहासिक स्थळांची भटकंती करत असताना एका गावी त्यांना काही जुनी नाणी मिळाली. त्यातूनच काझींनी पुरातन नाण्यांचा अभ्यास सुरू केला. हा छंद पुढे इतका वाढला की वयाच्या सव्विसाव्या वर्षापासून ते मरेपर्यंत ते गावोगाव हिंडून भंगारातून आणि धातू वितळवण्याचे काम करणाऱ्या झारेकऱ्यांकडून नाणी गोळा करत राहिले. जुनी नाणी गोळा करून ती संग्राहकांना आणि नाणकशास्त्राच्या अभ्यासकांना उपलब्ध करून देणे हा त्यांचा व्यवसायच झाला.

काझींचा मध्ययुगीन नाण्यांचा अभ्यास इतका झाला की त्यांना राजांची-सुलतानांची नावे आणि सनावळ्या तोंडपाठ असत. नाण्यांवरील अवघड मजकुराची फार्सी लिपी वाचून दाखवण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. मध्य युगातले कुठलेही नाणे त्यांना दाखवले की ते तत्काळ त्याची माहिती सांगत.

असे हे फसीउद्दिन कैसर काझी मधुमेहाच्या विकाराने १३ जून २०११ रोजी निधन पावले. त्यांच्या मृत्यूमुळे मध्ययुगीन नाण्यांचा जिता जागता ज्ञानकोशच जणू अस्त पावला.