प्रीतम सिंग जौहल
प्रीतम सिंग जौहल (४ ऑक्टोबर, इ.स. १९२० - २८ जून, इ.स. २०१६) हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते.
जौहल यांचा जन्म पंजाबमधील एका छोट्या गावात झाला. हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण होणारे गावातील ते तिसरे विद्यार्थी uals. त्यांचे वडील लष्करात असल्याने प्रीतम सिंग यांनाही लष्करातच जायचे होते. १७ व्या वर्षी त्यांना दिल्लीतील एका नातेवाईकाकडे पाठवण्यात आले. तेथेही वर्षभर ते बेकारच राहून, शेवटी जून १९३८ मध्ये इंडियन सिग्नल कोअरमध्ये भरती झाले.
त्यानंतर एका वर्षातच दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि १९४० साली प्रीतम सिंगाना ऑपरेटर म्हणून पूर्व पूर्व आफ्रिकेत इंडियन इन्फन्ट्री डिव्हिजनमध्ये पाठवण्यात आले. तेथे पहिल्यांदाच ते युद्धात सहभागी झाले. त्यांची ब्रिगेड लिब्यात गेली आणि नंतर ती ब्रिटिश लष्कराचा भाग बनली. १९४२ मध्ये इजिप्तमध्ये जर्मन आक्रमण थोपवणा्ऱ्या तुकडीत ते वायरलेस ऑपरेटर होते. तेथून त्यांची तुकडी जपानशी लढण्यासाठी ब्रह्मदेशातही गेली. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ते सेकंड लेफ्टनंट हुद्द्यापर्यंत पोहोचले होते. खूप आजारी पडल्याने तेथून मग ते मायदेशी परतले आणि भारतीय लष्करात दाखल झाले.
पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही लढायांमध्ये प्रीतम सिंग यांचा सहभाग होता. काही काळ त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सेवेसाठीही पाठवण्यात आले होते. १९७६ मध्ये ते लेफ्टनंट कर्नल या पदावरून निवृत्त झाले आणि चंडीगढमध्ये स्थायिक झाले. १९८० मध्ये ते कॅनडातील सरे प्रांताचे रहिवासी बनले.
पगडीसाठी संघर्ष
कॅनडात सैन्यदलातील माजी जवान व अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या रॉयल कॅनेडियन लीजन या संस्थेतर्फे १९९३ साली जौहल यांना आमंत्रित करण्यात आले. पण तेथे गेल्यावर मुख्य कार्यक्रम असलेल्या सभागृहात त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आत जायचे असेल तर डोक्यावरील शीख फेटा (पगडी) काढूनच जावे लागेल असे त्यांना सांगण्यात आले. हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी त्याविरुद्ध संघर्ष केला. इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिल्यावर संस्थेने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी तर व्यक्त केलीच पण आपल्या नियमांतही सुधारणा केली.
पुस्तक
प्रीतम सिंग जौहल यांनी दुसऱ्या महायुद्धकालीन सैनिकी जीवनाबद्दल अ सोल्जर रिमेंबर्स नावाचे पुस्तक लिहिले आहे.