प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती
प्राचीन भारताच्या क्रांती व प्रतिक्रांती हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ऐतिहासिक पुस्तक आहे. पुस्तकाचे संपूर्ण लिखाण करण्यापूर्वीच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे हे पुस्तक अपूर्ण राहिलेले आहे. या पुस्तकाचा डॉ. आंबेडकरांनी आराखडा तयार केला होता तेव्हा त्यामध्ये ४१ प्रकरणे राहणार होती. त्यापैकी १३ प्रकरणे महाराष्ट्र शासन प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणेच्या तिसऱ्या खंडात १९८७ साली पहिल्यांदा प्रसिद्ध झाली आहेत.
सिद्धान्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “भारताच्या क्रांती व प्रतिक्रांती” हा सिद्धांत मांडून असे प्रतिपादन केले की, बुद्धपूर्वकाळातील आर्य समाज हा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने अधःपतित झालेला होता व बौद्धधर्माने त्यात क्रांती घडवून आणली. बौद्धधर्माचा उदय ही केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक व राजकीय क्रांती होती. ‘बौद्धधर्माने चातुर्वर्ण्यव्यवस्थेला आव्हान देऊन सामाजिक समता प्रस्थापित केली होती. बौद्धकाळातच मौर्य साम्राज्य स्थापन झाले होते.’ बुद्धांनी केलेल्या धार्मिक व सामाजिक क्रांतीमुळेच चंद्रगुप्त मौर्याला राजकीय क्रांती करता आली. मौर्य साम्राज्याला त्यांनी ‘बौद्ध साम्राज्य’ म्हणले आहे. याच कालावधीत होऊन गेलेल्या सम्राट अशोकांच्या साम्राज्यात बौद्धधर्म हा 'राज्यधर्म' झालेला होता. बुद्धांनंतर काही शतकांत भारत बौद्धधर्मीय झाला होता. या काळात चातुर्वर्ण्याचे पूर्ण उच्चाटन झाले होते, असेही त्यांनी म्हणले आहे.
चातुर्वर्ण्याचे उच्चाटन ब्राह्मणवर्गासाठी हा मोठा आघात होता. ब्राह्मणांचे वर्चस्व जाऊन त्यांना खालच्या वर्गाचे जीवन जगणे भाग पडले. शेवटी इ.स.पू. १८५ला पुष्यमित्र शुंग या ब्राह्मण सेनापतीने बृहद्रथ या बौद्ध राजाची हत्या करून बौद्ध राज्य नष्ट केले व स्वतःच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणी राज्याची स्थापना केली. बाबासाहेबांचा निष्कर्ष असा की, ‘पुष्यमित्राच्या राज्यक्रांतीचे ध्येय बौद्धधर्माच्या जागी ब्राह्मणीधर्म (वैदिक धर्म) राज्यधर्म म्हणून प्रस्थापित करणे व ब्राह्मणांना भारताचे सार्वभौम राज्यकर्ते बनविणे हे होते.’ राज्यावर आल्यावर पुष्यमित्राने आणखी दोन गोष्टी केल्या. त्याने बौद्धधर्मीयांचा अतोनात छळ केला. बौद्ध भिक्खूंच्या प्रत्येक शिरासाठी १०० सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश काढला. तसेच ब्राह्मणीधर्माच्या तत्त्वज्ञानासाठी त्याने मनुस्मृती लिहून घेतली व तिची राज्याचा कायदा म्हणून घोषणा केली. मनुस्मृतीतील धर्म हा राज्याचा धर्म झाला. शुंग व त्यानंतरच्या कण्व व आंध्र या ब्राह्मणी राजवंशांचा समान उद्देश बौद्ध साम्राज्याचा व बौद्धधर्माचा नाश करणे हा होता व तो त्यांनी पार पाडला, अशी बाबासाहेबांची मीमांसा आहे. बौद्धधर्माचा उदय ही क्रांती तर पुष्यमित्राची राज्यक्रांती ही प्रतिक्रांती, असा सिद्धान्त त्यांनी मांडला आहे. याचा समग्र इतिहास त्यांना लिहायचा होता. त्यांनी म्हणले की, ‘बौद्ध भारतावरील ब्राह्मणी भारताच्या आक्रमणाच्या व बौद्धधर्मावरील ब्राह्मणीधर्माच्या राजकीय विजयाच्या इतिहासाची पुनर्माडणी करणे मला भाग पडत आहे.’ परंतु कमी आयुष्याने त्यांचे हे लेखनकार्य अपूर्ण राहिले.
प्रकरणे
- प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश
- प्राचीन शासन प्रणाली: आर्यांची सामाजिक स्थिती
- निकृष्टतेच्या थराला पोहचलेला ब्राह्मणवाद
- बुद्ध आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन
- बौद्ध धर्माची अवनती व ऱ्हास
- ब्राह्मण साहित्य
- राज्यहत्या किंवा प्रतिक्रांतीचा जन्म – ब्राह्मणवादाचा विजय
- हिंदू समाजाचक आचार-विचार – मनुस्मृतीतील प्रतिक्रांतीचे विचार
- प्रतिक्रांतीचे धार्मिक समर्थन – कृष्ण आणि त्याची गीता
- ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय
- शूद्र आणि प्रतिक्रांती
- स्त्री आणि प्रतिक्रांती
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयी पुस्तके