प्रतिभा रानडे
डाॅ. प्रतिभा रानडे (जन्म : २० ऑगस्ट १९३७) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची २०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांत कादंबऱ्या, समाजशास्त्रीय लेखन, चरित्रे आदींचा समावेश आहे.
फक्त कथा आणि कादंबऱ्या या पद्धतीच्या चाकोरीबद्ध लेखनपद्धतीत न अडकता दरवेळी काहीतरी वेगळे लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतिभा रानडे यांच्या प्रत्येक लेखनात नावीन्य असते. त्यांचे लेखन हे संवेदना आणि कलात्मकतेचा मिलाफ असते..
शिक्षण आणि कार्य
प्रतिभा रानडे यांचा जन्म पुण्यात त्यांच्या मावशीच्या घरी झाला असला तरी त्यांचे शाळा कॉलेजचे सर्व शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्या बी.ए. आहेत.
त्यांचे पती फिरोज ऊर्फ पंढरीनाथ रानडे हे भारत सरकारच्या सेवेत होते. त्यामुळे लग्नानंतर प्रतिभा रानडे यांना भारतभ्रमण करता आले. पतीच्या वरचेवर बदल्या होत असत. त्यामुळे कलकत्ता, मणिपूर, शिलॉंग, दिल्ली, अफगणिस्तान आणि आता मुंबई असा प्रवास त्यांना करावयास मिळाला. या प्रत्येक बदल्यांच्यावेळी पतीबरोबर फिरत असताना आलेले अनुभव प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या लेखनातून मांडले.
प्रतिभा रानडे यांनी दिल्लीत असताना इन्स्टिटयूट ऑफ जरनॅलिझमचा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि मग त्यातूनच त्यांची लिखाणाची आवड वाढली. त्यांचा दैनिक ’केसरी’मध्ये दिल्लीतल्या सांस्कृतिक घडामोडीवर एक लेख छापून आला आणि त्यानंतर त्यांचे नियमित लेखन सुरू झाले.
दिल्लीतल्या `पुराना किल्ला’ या विषयावर प्रतिभा रानडे यांनी विस्तृत लिहिले होते. तिथून त्यांची खऱ्या अर्थाने लेखनास सुरुवात झाली.
दिल्लीत असताना प्रतिभा रानडे यांची लेखिका अमृता प्रीतम यांच्याशी ओळख झाली. मग रानडे यांनी त्यांच्या `बंद दरवाजा’चा अनुवाद केला आणि त्यांचा पुस्तकांच्या जगात प्रवेश झाला.
प्रतिभा रानडे यांची देश-परदेशांत, आणि भारतातील विविध संस्थांमध्ये व्याख्याने झाली आहेत. भारतात आकाशवाणीवरील आणि दूरचित्रवाणीतील कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांनी काही मालिकांचे लेखनही केले आहे. वर्तमानपत्रांतून त्यांचे लेख सातत्याने प्रकाशित होत असतात.
प्रतिभा रानडे यांचे पती फिरोज रानडे यांचे काबूलनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
प्रतिभा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके
- अखेरचा बादशहा (हिंदी ’बदनसीब’चा अनुवाद)
- अनुबंध धर्म संस्कृतींचे : आर्थिक सत्ता आणि राजकारणाची धग
- अफगाण डायरी : काल आणि आज
- अबोलीची भाषा
- अमीर खुसरो : एक मस्त कलंदर
- ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी
- काझी नसरूल इस्लाम : एक आर्त
- झाशीची राणी लक्ष्मीबाई (चरित्र) : या पुस्तकाच्या ६ आवृत्या निघाल्या. इंग्रजी, हिंदी, कानडी, ओरिया या भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे.
- नल पाकदर्पण(संपादित)
- परकं रक्त (कथासंग्रह)
- पाकिस्तान अस्मितेच्या शोधात
- पाकिस्तान डायरी
- फाळणी ते फाळणी
- बंद दरवाजा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका अमृता प्रीतम)
- Behind the Veil : In search oh Truth
- बुरख्याआडच्या स्त्रिया : काल आणि आज
- मरुगान (ललित)
- मानुषी (कथा)
- मी नाही ख्रिस्ती, मुस्लिम, हिंदू (या पुस्तकामध्ये बर्ट्रांड रसेल, कांचा इलैया आणि अल वर्राक या तीन पुस्तकांची ओळख करून दिली आहे.
- यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी
- Rani Laxmibai Warrior Queen Of Jhansi (इंग्रजी)
- रेघोट्या (कादंबरी)
- शुक्रवारची कहाणी (लेख)
- स्त्री प्रश्नांची चर्चा : १९वे शतक (या समाजशास्त्रीय पुस्तकाच्या लेखनासाठी फोर्ड फाऊंडेशनचे अनुदान मिळाले होते.)
- स्मरणवेळा (कादंबरी)
- ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे
सन्मान
- प्रतिभा रानडे या बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेने भरविलेल्या एका वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या.
- पुण्यात २०१५ सालच्या डिसेंबर महिन्यात भरलेल्या स्त्री साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
पुरस्कार
महाराष्ट्र राज्य शासन, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आदींकडून विविध पुरस्कार.
- ’ऐसपैस गप्प दुर्गाबाईशी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९८-९९चा पुरस्कार
- ’झाशीची राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिर यांच्यातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार (२००३)
- ’पाकिस्तान ...अस्मितेच्या शोधात’ या पुस्तकाला मुंबईतील विलेपार्लेच्या उत्कर्ष मंडळाचा हेडगेवार पुरस्कार