प्रकाश भातम्ब्रेकर
प्रकाश भातम्ब्रेकर (१९४७) हे हिंदी पुस्तकांचे मराठी आणि मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद करणारे मराठी लेखक आहेत.
शिक्षण आणि कारकीर्द
मराठवाडा विद्यापीठातून बी.एस.सी. झाल्यावर भातम्ब्रेकर औरंगाबाद येथील मराठवाडा दैनिकाच्या संपादकीय विभागात दाखल झाले. वर्षभर पत्रकारिता केल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य शासनाच्या मत्स्यविकास विभागात रुजू झाले.
पुढै त्यांनी हिंदी विषयात कोल्हापूर विद्यापीठातून बी.ए. तर राजस्थान विद्यापीठातून एम.ए. केले. महाराष्ट्र सरकारची नोकरी सोडून मग ते राजस्थान सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागात गेले.[१] या काळात कादम्बिनी, धर्मयुग, साप्ताहिक हिंदुस्तान, सारिका आदी नियतकालिकांतून त्यांचे अनुवाद प्रसिद्ध होत होते. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच. मग चांगल्या साहित्याचा अनुवाद करणे हेच त्यांचे ध्येय बनले, आणि अरविंद गोखले, अरुण साधू, आशा बगे, गंगाधर गाडगीळ, चिं.त्र्यं. खानोलकर, जयवंत दळवी, जी.ए. कुलकर्णी, ना.सी. फडके, पु.भा. भावे, बाबूराव बागूल, माधव कोंडविलकर, विजया राजाध्यक्ष, विद्याधर पुंडलिक, सुभाष भेंडे, .. अशा किती तरी नामवंत लेखकांच्या कथा वा कविता त्यांनी हिंदीत अनुवादित केल्या.
दरम्यानच्या काळात भातम्ब्रेकर यांना युनियन बँकेत राजभाषा अधिकारी म्हणून जाण्याची संधी मिळाली. सुमारे १२ वर्षे ते या बँकेत होते. ही नोकरी चालू असतानाच साहित्य क्षेत्रात आणखी काही तरी करावे ही इच्छा होतीच. त्यांना महाराष्ट्र साहित्य अकादमीच्या मुंबई कार्यालयात बोलावणे आले आणि त्यांनी तडकाफडकी बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला. साहित्य अकादमीचे सचिव म्हणून त्यांनी सुमारे २० वर्षे काम केले. येथे आल्यानंतर त्यांनी समकालीन मराठी कविता, कथा यांचा आढावा घेणारी दर्जेदार व साहित्याच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरतील अशी पुस्तके अकादमीतर्फे प्रसिद्ध केली. विविध साहित्यिकांच्या साहित्यावर विचारमंथन घडवून आणण्यासाठी परिसंवाद, चर्चासत्रे घेतली. विविध साहित्य प्रकारांतील ५०हून अधिक मराठी पुस्तकांचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला. हिंदीतील सहा तर गुजरातीमधील पाच पुस्तके त्यांनी मराठी भाषेत आणली. या शिवाय अनेक हिंदी पुस्तकांच्या संपादनात त्यांचे योगदान होते.
भातम्ब्रेकरांनी विंदा करंदीकर यांच्या अनुवादित केलेल्या कवितांपैकी 'बुनियाद'चा अनुवाद येथे Archived 2020-07-11 at the Wayback Machine. आहे.
भातम्ब्रेकरांनी हिंदीत अनुवादिलेली काही मराठी पुस्तके
- पांगिरा (मूळ मराठी लेखक - विश्वास पाटील)
- लाव्हा (मूळ मराठी लेखिक - ह.मो. मराठे)
- स्वरसम्राट दीनानाथ मंगेशकर (मूळ मराठी लेखिका - वंदना रवींद्र घांगुर्डे)
भातंब्रेकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- ‘सिंहासन’ आणि ‘दुर्दम्य’ या मराठी कादंबऱ्यांच्या हिंदी अनुवादाबद्दल त्यांना मानाचे पुरस्कार मिळाले.
- महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी आणि हिंदी प्रचार सभेकडून गौरव
- साहित्यिक उपक्रमांसाठी चीन, अमेरिका, कझाकस्तान, जर्मनी, ब्रिटन आदी अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.
- हिंदी भाषेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्तर प्रदेशातील हिंदी संस्थेतर्फे दिला जाणारा दोन लाख रुपयांचा सौहार्द सन्मान, वगैरे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ लोकसत्ता टीम (२१ डिसेंबर २०१७). "प्रकाश भातम्ब्रेकर". दैनिक लोकसत्ता. ३० डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.