Jump to content

प्र.बा. जोग

प्रभाकर बाळकृष्ण जोग हे पुण्यातील एक प्रसिद्ध वकील होते. क्लासवाले सुहास जोग, अस्थिशल्यविशारद विलास जोग, बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग ही प्र.बा. जोग यांची मुले होत. अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा.

मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी यांनी दारुबंदी केली, आणि प्र.बा. जोगांची वकिली फळफळली. 'दारुबंदीचा गुन्हा करा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडवीन' अशी जाहिरातच त्यांनी करायला सुरुवात केली. या दारुबंदीच्या खटल्यांमध्ये जोगांनी एवढा पैसा मिळवला, की त्यांनी आपल्या घराला 'मोरारजीकृपा' असे नाव दिले.

प्र.बा. जोग हे विलक्षण तऱ्हेवाईक होते. त्यांच्यामध्ये अस्सल पुणेरीपणा ओतप्रोत भरला होता. त्यांच्या घरावर एक छोटी पाटी व एक उंच फलक होता. त्यांतील मजकूर असा :-

"माझ्यावर विश्वास असेल तर या, नाहीतर कायमचे कटा (गणगोतासह). या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून ‘कटण्याचा मार्ग’ही दाखवलेला! अशी पाटी पाहून आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. त्यात दहा सूचना लिहिलेल्या. '‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये'’ किंवा ‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये. तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका, असा सल्ला देत असतानाच खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ कोणीही येऊ नये, अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे : "वरील सूचना सर्वासाठी आहेत. गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व!" - प्र. बा. जोग

पुण्यामध्ये वक्तृत्वोजेक सभा ही संस्था वसंत व्याख्यानमाला चालवायची. तिच्यात भाषण द्यायला मिळावे म्हणून जोगांनी संस्थेला विनंती केली. जोगांची अगोचर बोलण्यात प्रसिद्धी असल्याने, ही विनंती नाकारली गेली. जोगांनी ताबडतोब पसंत व्याख्यानमाला नावाची व्याख्यानमाला सुरू केली, आणि तिच्यात बोलण्यासाठी इच्छुक वक्त्यांना संधी दिली.

पुण्यातील नेहरू स्टेडियममध्ये रणजी ट्राॅफिसाठी क्रिकेटचा सामना होत होता. सामन्यांचे समालोचन करण्यास दि.ब. देवधर आदी नामवंत समालोचक असत. प्र.बा. जोगांनीही आपल्याला संधी मिळावी अशी मागणी केली, आणि ती यथापेक्षित नाकारली गेली. त्यावर मात करायची म्हणून, जोगांनी मैदानाच्या बाहेर एक उंच मचाण उभे केले, आणि त्या मचाणावरून त्यांनी मैदानात चाललेल्या मॅचचे निरीक्षण करून लाऊड स्पीकरवर क्रिकेटची काॅमेन्टरी करण्याचा उद्योग सुरू केला. जोगांची ही काॅमेन्टरी ऐकण्यास मंचाभोवती तुफान गर्दी जमली होती.

प्र.बा. जोग पुण्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले, आणि निवडून आल्यावर नगरसेवक आणि नंतर उपमहापौर झाले. पुण्यातील शनिवाराड्याच्या समोर असलेल्या मैदानाभोवती फरशी घालून देण्याचे त्यांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले होते, ते निवडून आल्यावर त्यांनी पूर्ण केले. शनिवारवाड्यासमोरच्या मैदानाभोवती आज जी शहाबादी फरशी दिसते ती जोगांच्या कृपेमुळे झाली आहे.

अस्सल पुणेरीपणा ओतप्रोत भरलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये प्र. बा. जोग यांना अग्रक्रमच द्यायला हवा. आयुष्यभर अन्यायाशी झगडताना कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, त्याला शिंगावर घेण्याचे धाडस करणारा हा पुणेकर म्हणजे पुण्याची शान होती. व्यवसाय वकिलीचा. उत्तम चालणारा. खरेतर खोट्याचे खरे करू शकणारा असा हा व्यवसाय. पण जोगांनी त्याबाबत आपली शुचिता आयुष्यभर सांभाळली. आपण चुकलो नसू तर उगीचच कुणाच्याही शिव्या खायच्या नाहीत, उलट त्याला चार अस्सल शिव्या हासडून त्याची बोलती बंद करण्याची प्र. बां.ची हातोटी जगावेगळी होती. त्यामुळेच त्यांची भाषणे म्हणजे श्रोत्यांसाठी हास्याचा धबधबा आणि मनमुराद करमणूक होती. जोग आपली परखड मते जाहीरपणे मांडण्यास कधी कचरले नाहीत. महापालिकेच्या कारभारावरचे वाभाडे काढणारा जोगांसारखा नगरसेवक आणि वक्ता पुन्हा झाला नाही, हेच खरे. पुणे महापालिकेचे नगरसेवक झाल्यावर त्यांनी प्रत्येक बाबतीत आपली मते शक्य तेथपर्यंत रेटण्याचा कसोशीने प्रयत्न केला.




(अपूर्ण)