प्र.दा. राजर्षि
श्री राघवचैतन्य महाराज व श्री केशवचैतन्य महाराज ही गुरुपरंपरा लाभलेले ह. भ. प. कै. ओतुरकरबुवा (प्र. दा. राजर्षि - जन्म : २१ नोव्हेंबर १९१५ {कार्तिकी/त्रिपुरी पोर्णिमा} मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९७ {अश्विन-वद्य प्रतिपदा}) हे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ओळखले जात.
मूळचे ओतूरचे असलेले बुवा, भारदस्त व्यक्तिमत्त्व, विद्वत्ताप्रचुर पूर्वरंग निरूपण व अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण अशी आख्याने सांगण्याची शैली प्रसिद्ध होती. रंजन, अंजन आणि भंजन या तीन गोष्टी म्हणजे बुवांच्या कीर्तनाचे वैशिष्टय. त्यांची अत्यंत जोशपूर्ण ऐतिहासिक आख्याने ही त्यावेळच्या तरुण वर्गासाठी प्रभावी ठरत होती. एकाचवेळी ऐतिहासिक आख्यानंबरोबर संतचरित्र किंवा पौराणिक आख्यान अशी 'जोडाख्याने' सांगण्यात बुवांचा हातखंडा होता, त्याचबरोबर कीर्तनातील त्याची 'स्वरचित पद्ये' ही प्रसंगाला अनुरूप अशा भावगीते, नाट्यपदे, व सिनेसंगीताच्या चालींवर आधारित असायची. बुवांची ही अतिशय अर्थपूर्ण असलेली अनेक पद्ये आजही लोकांच्या स्मरणात आहेत. पोरांपसून थोरांपर्यंत कीर्तंनश्रवणाची आवड बुवांच्या कीर्तनातून निर्माण होत होती. बुवा स्वतः संवादिनी वाजवूनही कीर्तन करत असत. पूर्वरंग निरूपणतील विद्वत्ता, प्रासादिक वाणी, स्वरचित पद्यांमधील अलौकिक प्रतिभा आणि श्रोत्यांसमोर चरित्रभाग किंवा प्रसंग उभा करण्याची ताकद या सर्वच गोष्टी बुवांकडे होत्या.
कीर्तनसेवेला सर्वस्व वाहिल्याने असे कीर्तनकार तयार होतात व पूर्णतः समाजमनात आपले स्थान निर्माण करतात, हे ह. भ. प. कै. ओतुरकरबुवा (प्र. दा. राजर्षि) यांच्या कीर्तनातून समाजास जाणवत होते. बुवा त्यांच्या कीर्तनाची सांगता त्यांचीच स्वरचित भैरवीतील प्रार्थना ' अंतरात मंदिरात वैकुंठ विहारी...' याने करत असत. महाराष्ट्रातील प्रथितयश कीर्तनकार सौ. पूजाताई देशमुख या त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.