पूर्णयोग
पूर्णयोगाचे स्वरूप
- श्रीअरविंद (अरविंद घोष) आणि श्रीमाताजी (मीरा अल्फासा ) यांच्या योगसाधनेवर हे तत्त्वज्ञान आणि ही साधना आधारलेली आहे. योगी श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष यांनी कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. या तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याचा प्रयत्न करण्यावर भर आहे.
- पूर्णयोग (Integral Yoga) यास अतिमानस योग (Supramental Yoga) असेही म्हणण्यात येते. चैतन्य हे अतिमानस, मन, प्राण आणि शरीर अशाप्रकारे क्रमाक्रमाने (involution) तिरोधान पावत गेले. आणि उत्क्रांतीच्या (evolution) द्वारे ते पुन्हा चैतन्यरूपापर्यंत जाणार आहे, ही संकल्पना या योगाच्या केंद्रस्थानी आहे.
- योग हा असंख्य व विविध रीतींनी करता येतो, त्याचा एकच एक किंवा एकमेव विशिष्ट मार्ग आहे असे ते मानत नाहीत. तर उलट योगाचे क्षेत्र इतके भव्य व विराट आहे की ज्याने त्याने आपला प्रकृतिधर्म, प्रवृत्ती, ओढ, स्वभाव, कुवत आणि मनोवृत्ती यांना अनुसरून योग करणे चांगले असे श्रीअरविंद म्हणतात.[१]
- आपला योग हा केवळ व्यक्तींच्या स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी नाही तर समग्र मानवजातीच्या मुक्तीसाठी आहे, असे ते म्हणतात. काही थोड्या व्यक्तींना वैयक्तिक मोक्ष वा मुक्ती मिळून या पार्थिव जगाची परिस्थिती आहे तशीच दुःखपूर्ण, अपूर्ण आणि दुरितपूर्ण राहू देणे श्रीअरविंदांना मान्य नाही. उलट, सर्व पार्थिव जीवनात परमेशाच्या दिव्य आनंदाची, प्रकाशाची, ज्ञानाची आणि शक्तीची पूर्ण अभिव्यक्ती घडवून आणून समग्र पार्थिवतेचे दैवीकरण (divinisation) करून पृथ्वीवर परमेशाचे राज्य निर्माण केले पाहिजे, आणि हे कार्य योगाने करावयास पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.[२]
पूर्णयोग म्हणजे काय?
(१) ‘ईश्वरा’कडे केवळ मनाच्या माध्यमातून (ज्ञानयोग) किंवा केवळ हृदयाच्या माध्यमातून (भक्तियोग) किंवा केवळ इच्छा आणि कर्म यांच्या माध्यमातून (कर्मयोग) जाण्याऐवजी, पूर्णयोगामध्ये व्यक्ती चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी आणि शक्तींनिशी ‘ईश्वर’प्राप्तीसाठी धडपड करते; हे करत असताना व्यक्ती उपरोक्त तिन्ही मार्गांचे आणि अन्य अनेक मार्गांचे एका योगामध्ये एकीकरण करते आणि ईश्वराचे, त्याच्या उपस्थितीसहित, चेतना, शक्ती, प्रकाश आणि आनंद यांसहित सर्वकाही, आपल्या स्वतःच्या चेतनेमध्ये आणि व्यक्तित्वामध्ये ग्रहण करते.
(२) येथे व्यक्ती आपल्या स्वमध्ये आणि जिवामध्येच ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या संपूर्ण प्रकृतीमध्येच साक्षात्कार करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते. म्हणजे कनिष्ठ मानवी प्रकृतीचे ईश्वरी आध्यात्मिक प्रकृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते.
(३) येथे व्यक्ती (जन्मप्रक्रियेला विराम देऊन) केवळ जीवनाच्या अतीतच ईश्वरप्राप्तीसाठी धडपडत नसते तर, ती या जीवनामध्येच त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते, जेणेकरून जीवनसुद्धा ईश्वराचा साक्षात्कार आणि दिव्य प्रकृतीचे आविष्करण व्हावे.[३]
पूर्णयोगाची वैशिष्ट्ये
- पूर्णयोग जीवनलक्षी व जीवनविकासी आहे. [४] जीवन व अस्तित्व यांना गौण न समजता त्यांना मध्यवर्ती मानून त्यांचे परिवर्तन करणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे.
- पूर्णयोगात आरोहण व अवरोहण या दोन्हीस महत्त्वाचे स्थान आहे.
- भौतिक जगतामध्ये सत्याचा प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान व आनंद आणणे हे या योगाचे ध्येय आहे.
- पूर्णयोगात ज्ञान, भक्ती व कर्म या सर्वांना प्रत्येकाचे योग्य स्थान असून प्रत्येकाने निहित कार्य करायचे असल्याने हा योग व्यापक, सर्वसमावेशक आणि समन्वयकारी आहे.[५]
पूर्णयोगाची साधनापद्धती
पूर्णयोगात अभीप्सा (Aspiration), नकार (Rejection), समर्पण (Surrender) ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. पूर्णयोग ठरावीक साचेबंद ध्यानाच्या व मंत्रजपाच्या व इतर उपासनामार्गाचा अवलंब करत नाही, तर त्याचा मुख्य मार्ग व पद्धत अंतरंगात किंवा ईश्वराप्रत आत्म-एकाग्रता करणे, ईश्वराची शक्ती झेलण्यासाठी तिला आत्मसात करण्यासाठी स्वतःचे चित्त व आत्मा खुला करणे (Aspiration) अभीप्सा म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीची आस बाळगणे [६] व ईश्वराव्यतिरिक्त जे जे काही असेल ते परके व अनिष्ट समजून त्यास नकार देणे (Rejection)आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाऊन समर्पणाच्या भावनेने जगणे, (Surrender) ही आहे. ईश्वराची करुणा भाकणे व त्याला सर्वस्वी शरण जाऊन व समर्पित होऊन आपल्या संपूर्ण जीवनाचे रूपांतरण करण्यासाठी ईश्वराने अवतरित व्हावे यासाठी मनोभावाने त्याचा धावा करणे आणि आपले शरीर, प्राण व मन ईश्वराच्या हाती पूर्णतया सोपवून त्याचा दिव्य प्रकाश, ज्ञान व आनंद व्यक्त करण्यास, त्यांना त्याची कार्यक्षम व प्रभावे साधने बनविणे ही या योगाची पद्धती आहे.[७]
मानवाची अतिमानवाकडे चाललेली उत्क्रांती
प्रकृतीची उत्क्रांती मनुष्यापाशी थांबलेली नाही. तिची वाटचाल अजूनही सुरू आहे. मानवानंतर अतिमानव (Superman) आणि त्यानंतर अतिमानसिक जीव (Supramental Being) उदयाला यायचे आहेत, असे त्यांचे तत्त्वज्ञान सांगते.
पंचकोश आणि उत्क्रांती[edit]
उपनिषदांनी 'पंचकोशा'ची कल्पना मांडली आहे. त्या कल्पनेनुसार अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश अशी एकीहून एक उच्च दर्जाची एकेक पातळी आहे, आणि उत्क्रान्तीचा हा चढता क्रम आहे.
श्रीअरविंदांना पंचकोशांची ही उत्क्रान्ति-क्रमाची कल्पना बरोबर वाटते. त्यांच्या मते ' अन्नमय कोश' हा जडद्रव्याची (Inert or Inconscient Matter) अवस्था आहे व तिच्यातून 'प्राणाचा ' (Vital, Life) उदय झाला. प्राणमय अवस्था ही जीवाची (Life of Vital being) निदर्शक अवस्था आहे. प्राणातून नंतर मनाचा ( Mind ) उदय मन' हे जाणिवेचे (Consciousness), चेतनेचे, बुद्धीचे, विचार- शीलतेचे व विवेकशीलतेचे निदर्शक तत्त्व व अवस्था आहे. सध्या मानव या पातळीवर येऊन ठेपला आहे. सध्याची विकासाची अवस्था मधली व संक्रमणाची (Transitional) अवस्था आहे. [८]
मनुष्य - एक प्रयोगशाळा[edit]
श्रीअरविंद लिहितात, ''आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याचा प्रकृतीचा संकल्प आहे. दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याचा व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याचा तिचा संकल्प आहे. [९]
चेतनेच्या उत्क्रांतीचे विविध स्तर
उत्क्रांतीच्या वाटचालीत मन आणि अतिमानस यांच्या दरम्यान चेतनेचे अनेक टप्पे असणार आहेत, याकडे श्रीअरविंद यांनी निर्देश केलेला आहे. त्या टप्प्यांचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. हे टप्पे अनुक्रमे असे [१०]
भौतिक मन (Physcial Mind)
उच्च मन (Higher Mind)
याचे मुख्य लक्षण म्हणजे विशालता, व्यापकता व एकता.
प्रदीप्त मन (Iluminded Mind)
अंतर्ज्ञानात्मक मन (Intuitive Mind)
अधिमानस (Overmind)
अतिमानस (विज्ञान) (Supermind)
पारंपरिक योग व पूर्णयोग यातील साम्य-भेद
ज्ञानमार्ग व पूर्णयोग
कर्ममार्ग व पूर्णयोग
भक्तिमार्ग व पूर्णयोग
तंत्रमार्ग व पूर्णयोग -
"चक्रांमधून उन्नत होत होत, कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया आणि चक्रांचे शुद्धीकरण या गोष्टी ‘तंत्रयोगा’तील ज्ञानाचा भाग आहेत. पूर्णयोगामध्ये चक्रांच्या हेतूपूर्वक शुद्धीकरणाची आणि उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत नसते, तसेच विशिष्ट अशा ठरावीक प्रक्रियेद्वारा कुंडलिनीचे उत्थापन देखील अभिप्रेत नसते. परंतु तरीही तेथे विविध स्तरांकडून आणि विविध स्तरांद्वारे चेतनेचे आरोहण होऊन, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेशी ऐक्य घडून येते. तेथे चक्रांचे खुले होणे आणि त्या चक्रांचे ज्यांच्यावर नियंत्रण असते त्या (मानसिक, प्राणिक आणि शारीरिक) स्तरांचे खुले होणे देखील घडून येते; त्यामुळे, पूर्णयोगामध्ये रूपांतरणाच्या प्रक्रियेमागे ‘तंत्रयोगा’चे ज्ञान आहे.'' - श्रीअरविंद
‘पूर्णयोगा’मध्ये चक्रांचे प्रयत्नपूर्वक उन्मीलन केले जात नाही तर शक्तीच्या अवतरणामुळे ती चक्रे आपलीआपण स्वतःहून खुली होतात. तंत्रयोगाच्या साधनेमध्ये ती ‘मूलाधारा’पासून सुरुवात करून, खालून वर, ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात तर, पूर्णयोगामध्ये ती वरून खाली या दिशेने खुली होत जातात. [११]
हठयोग व पूर्णयोग
उद्दिष्टांमधील भेद - पाहा रूपांतरण
पूर्णयोगाच्या संदर्भातील साहित्य
पाहा- साचा:श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य
संदर्भ
- ^ डॉ. जोशी, गजानन नारायण (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे विद्यापीठ. pp. : ११३.
- ^ डॉ.गजानन नारायण जोशी (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे: पुणे विद्यापीठ.
- ^ Sri Aurobindo, अनुवाद - अभीप्सा मासिक. The complete works of Sri Aurobindo - Vol 29. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
- ^ श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. pp. : 113.
- ^ श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. pp. : ११४.
- ^ "mr.wiktionary.org".
- ^ डॉ.गजानन नारायण जोशी (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे: पुणे विद्यापीठ.
- ^ डॉ.ग.ना.जोशी (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे: पुणे विद्यापीठ.
- ^ 1. Sri Aurobindo (1998). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 13. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 502.
- ^ श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. pp. : १३१-१४५.
- ^ Sri Aurobindo. Complete Works of Sri Aurobindo Vol 29. Pondicherry. p. 460.
बाह्य दुवे
पारंपरिक योग व पूर्णयोग - भाग ०१