Jump to content

पुष्पसजावट

Roses

फुलांचा वापर विविध प्रकारच्या सजावटीसाठी तसेच सौंदर्यप्रसाधनासाठी करण्याची प्रथा प्राचीन व सार्वत्रिक आहे. फुलांचे विविध रंग, गंध वा आकार यांचे नित्य आकर्षण माणसाला वाटत आले आहे. प्रदेशपरत्वे फुलांची विविधता व विपुलता यांचे प्रमाण कमीअधिक असले, तरी सामान्यतः ती सर्वांना सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळेच गरीब व श्रीमंत, आदिवासी व आधुनिक, ग्रामीण आणि नागरी अशा सर्वच गटांतील स्त्री-पुरुषांना, फुलांचे सुशोभन आणि प्रसाधन करण्याची सारखीच आवड असते. फुलांच्या नित्यनैमित्तिक वापरातूनच प्रत्येक समाजात पुष्पसजावट व पुष्पप्रसाधन यांबाबत काही संकेत रूढ झाल्याचे दिसून येतात. स्त्री-पुरूषांच्या वैयक्तिक प्रसाधनात समाजविशिष्ट शैली दिसून येतात व समाजातील धार्मिक विधी, विवाह सोहळे तसेच इतर सण-समारंभ यांसारख्या प्रसंगी करावयाचे फुलांचे साजशृंगारही संकेतबद्ध असतात. काही राष्ट्रांनी विशिष्ट फुलांना आपले राष्ट्रीय फूल मानले आहे. ऊदा., भारताचे व ईजिप्तचे कमळ, इंग्लंडइराण यांचा गुलाब, रशियाचे सूर्यफूल, चीनचे नर्गिस (नार्सिसस), जपानचे हेमपुष्प (क्रिसॅन्‌थिमम्) इत्यादी. फुलबाग राखून समाजाच्या फुलासंबंधीच्या नित्यनैमित्तिक गरजा भागविणारा फुलमाळ्यांचा स्वतंत्र वर्गही उदयास आल्याचे दिसून येते.

इजिप्त मधील पुष्पसजावट

प्राचीन ईजिप्तमध्ये कमळ हे पवित्र फूल मानण्यात येई. गळ्यातील हार, मनगटावरील गजरे हे कमळाचेच करीत. अतिथीचे हारतुऱ्यांनी स्वागत करण्याची प्रथा प्राचीन ईजिप्तप्रमाणेच प्राचीन ग्रीक व रोमन समाजातही होती. यूरोपात मध्ययुगीन कालखंडात, विशेषतः सरदारवर्गात, गुलाबाच्या फुलास प्रीतीचे प्रतीक समजण्यात येई. फुलांनी घरेदारे सुशोभित करण्याची प्रथा प्रबोधनकाळातील यूरोपीय समाजात असल्याचे दिसून येते. पुष्पपात्रात पुष्पगुच्छ ठेवण्याची पद्धतही त्या काळात विशेष लोकप्रिय ठरली होती. सतराव्या शतकात पुष्पसजावटीचे प्रयत्न जाणीवपूर्वक होऊ लागले. फुले, पाने, डहाळ्या यांना विशिष्ट प्रकारे बाक देऊन त्यांतून नवे नवे आकृतिबंध साधण्याकडे लोकांचा कल वाढला. त्यामुळे पुष्पगुच्छाचे सौंदर्यही विकास पावू लागले. अभीष्टचिंतन म्हणून पुष्पगुच्छ देण्याची प्रथा यूरोपीय समाजात आहे. १८– १९ व्या शतकांत पश्चिमी कलाक्षेत्रातील ⇨ रोकोको कला व ⇨ नव्य कला इत्यादींच्या प्रभावातून पुष्पगुच्छाच्या आकृतिबंधातही नवे प्रयोग करण्यात आले. स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिगत सौंदर्यप्रसाधनात मात्र यूरोपीय समाजात फुलांना विशेष महत्त्व मिळाल्याचे दिसत नाही.

चीन-जपानमध्ये पुष्पसजावटीचे सर्वसाधारण प्रकार रूढ असले, तरी तेथे पुष्पपात्रातील पुष्परचना अधिक विकसित झाली. विशेषतः जपानी पुष्परचनेच्या अनेक शैलींचे अनुकरण आधुनिक काळात सर्वत्र होत आल्याचे दिसून येते.

भारतातील पुष्पसजावट

भारतात फुलांची सजावट व वैयक्तिक पुष्पप्रसाधन यांची परंपरा फार प्राचीन आहे. फुलांच्या माळा गुंफणे ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ‘पुष्पास्तरण’, ‘पुष्पशय्या’ किंवा ‘शय्यास्तरणसंयोगपुष्पादिग्रथन’ यांसारख्या संकल्पना प्राचीन भारतीय साहित्यात दिसून येतात. भरतमुनीचे नाट्यशास्त्र, ब्रह्मवैवर्तपुराण, कौटिलीय अर्थशास्त्र, भागवतपुराण, वात्स्यायनाचे कामसूत्र इ. प्राचीन ग्रंथांत वेगवेगळ्या संदर्भात पुष्पप्रसाधनाच्या व पुष्पसजावटीच्या कल्पना स्पष्ट केल्या आहेत. रामायण-महाभारतात स्त्री-पुरुषांच्या पुष्पालंकारांची तसेच अन्य तऱ्हेच्या पुष्पसजावटींची वर्णने अनेक स्थळी केलेली आढळतात. एकेकटे फूल, मंजिरी वा पल्लव यांचाही उपयोग कानावर वा भांगात ठेवण्यासाठी अथवा वेणी-अंबाड्यात खोवण्याकडे करण्यात येई. विशेषतः ग्रीष्मऋतूत शिरीष पुष्प, वर्षाऋतूत ककुभाची मंजिरी, शरदऋतूत नीलोत्पल, वसंतऋतून कदंबपुष्प, कुमुददल, मल्लिकामंजिरी, तसेच तमालपत्र, चंदन वा अशोक पल्लव इत्यादींचा कर्णफूल म्हणू वापर होई. फुले माळण्यात कलात्मक दृष्टी ठेवल्यामुळे फुलांचे रंग व पोषाखाचा रंग यांत एकप्रकारची संगती साधण्यात येई. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या उठावदारपणात व आकर्षकतेत अधिकच भर पडे. त्यानंतरच्या काळातही रंगसंगतीच्या कल्पनेत अधिकच विकास होत गेला आणि ‘हिरवासाज’, ‘पिवळासाज’ असे उल्लेख स्त्री-गीतांतून करण्यात येऊ लागले. आजही रंगसंगती साधून वेणीवर वा अंबाड्यात फुले माळण्यात येतात.

पूजाविधीमध्ये ऋतुकालोद्‌भव फुलांचा वापर करण्याची परंपरा जुनी आहे. देवदेवतांपुढे फुलांची कलात्मक आरास करण्याची परंपराही दिसून येते. फुलांच्या वेण्या, गजरे वा गुच्छ वापरणे ही भारतीय स्त्रियांची नैसर्गिक आवड आहे. सोनचाफा, मोगरा, बकुळ, शेवंती, जाईजुई, गुलाब, निशिगंध, अबोली, कुंदकळ्या इ. फुले त्यांची विशेष आवडीची होत. गुलाबासारखे टपोरे फूल ‘बटणहोल’ मध्ये खोवण्याची आवड पुरुषांतही आढळते. मनगटी गजरेही पुरुष वापरतात. सभा-संमेलनप्रसंगी पाहुण्यांचे हारतुऱ्यांनी स्वागत करण्याची प्रथा सर्रास रूढ आहे.

एखाद्या आनंदोत्सव प्रसंगी वा अभिनंदनीय व्यक्तीवर फुले उधळण्याची रूढी जुनीच आहे. तसेच उत्सवाच्या वेळी देवदेवतांचे रथ रंगीबेरंगी पुष्पमालांनी शृंगारणे, गाड्या सजविणे, दसरा-पोळा वा बलिप्रतिपदा या सणांच्या दिवशी हत्ती, घोडे वा बैल, गायी यांना फुलांच्या माळा किंवा तुरे घालून नटविणे, दसरा वा गुढीपाडवा यांसारख्या सणांत पानाफुलांच्या तोरणांनी, विशेषतः झेंडूच्या पुष्पमालांनी घरेदारे सुशोभित करणे, केळीचे खांब वा आम्रपर्ण किंवा अन्य लतापल्लवादिकांच्या माळांत फुले गुंफून त्यांनी चौरंग शृंगारणे, फुलांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करून चौक भरणे, फुलांचे झेले करणे, गालिचे घालणे असे नाना प्रकारचे संकेत भारतात रूढ आहेत. पाठारे प्रभूंची अनंतपूजा, मुंबईच्या कोळ्यांची सत्यनारायणपूजा, भंडारी लोकांचा शेज भरण्याचा प्रसंग, महाराष्ट्रातील मंगळागौर, गौरीगणपती, विदर्भातील श्रावणमासातील भराडी गौर, जैनांची पार्श्वनाथपूजा, मुसलमानांच्या ताबूताची रोषणाई इत्यादींतून पुष्पसजावटीचे नाना प्रकार दिसून येतात.

पानाफुलांचा गालिचा हा एक मोठा वैशिष्ट्यपूर्ण व कलात्मक प्रकार आहे. स्वच्छ जमिनीवर विविधरंगी फुले व हिरवीगार पाने यांच्या मांडणीतून हा गालिचा तयार करण्यात येतो. फुलांचे गालिचे पाण्यावरही तयार करण्यात येतात. त्यासाठी संथ पाण्यावर कोळशाची पूड व लाकडाचा भूसा पसरवून त्यावर अनेकरंगी पानाफुलांच्या साह्याने मनोवेधक आकृतिबंध तयार करतात. गालिच्याप्रमाणेच भोजनप्रसंगी ताटांभोवती काढलेला पानाफुलांच्या सुंदर वेलबुटींचा प्रकार फुलांच्या रांगोळीचाच एक नमुना होय. नाना आकृतिबंधांच्या फुलांच्या परड्या तयार करून त्या जेवणाच्या टेबलाजवळ ठेवणे, हाही प्रकार रूढ होत आहे.