पुनर्नवा
पुनर्नवा, अर्थात घेटुळी (शास्त्रीय नाव: Boerhavia diffusa) महाराष्ट्रात वसू किंवा खापरा या नावाने देखील ओळखली जाणारी ही दक्षिण आशिया, प्रशांत महासागरी परिसरातील भूभागात व अमेरिकेच्या दक्षिणेकडील प्रदेशांत आढळणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हा ०.६६ मी. ते १ मीटर उंचीचा, अनेक वर्षे जगणारा वेल आहे. ग्रीष्मात पुनर्नवा सुकते व पावसाळयात तिला पुन्हा पालवी फुटते. पुनर्नव्यास २.५ सें.मी. ते ४ सें.मी. लांबीची गोल किंवा लंबवर्तुळाकार, मांसल व पांढुरक्या पाठीची पाने असतात. पाने अभिमुख असून, बहुधा त्यांतील एक लहान व एक मोठे असते. पुनर्नव्यास वर्षाऋतूत फुले व फळे येतात. हिची फुले लहान, पांढऱ्या किंवा गुलाबी रंगांची असतात. पुनर्नव्याला पांढुरक्या रंगाचे, मोठे, बळकट व वाळल्यावर पिळा पडणारे मूळ असते.
औषधी गुणधर्म
पुनर्नव्यापासून पुनर्नवासव हे औषधी आसव बनवतात. शरीराच्या एखाद्या अवयवावरील सुजेवर देवदार, सुंठ व वाळा यांसोबत पुनर्नव्याचा काढा गुणकारी मानला जातो. रांताधळेपणात पांढऱ्या पुनर्नवेची मुळी कांजीत उगाळून अंजन लावण्याचा उपाय काहीजण करतात. लघवीची वरचेवर भावना होत असल्यास पुनर्नव्याचा काढा २० ते ४० मिलिलिटर या प्रमाणात रोज दोन वेळा घेतल्यास गुण येतो, असे मानले जाते. तसेच दर चार दिवसांनी येणाऱ्या तापावर श्वेत पुनर्नवाची मुळे दुधात उगाळून देतात.
बाह्य दुवे
- ट्रॉपिकल प्लांट डेटाबेस - पुनर्नवा (इंग्लिश मजकूर)