पुदिना
पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे लँटिन नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे लँटिन कूळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी,दातदुखी, वातविकार इत्यादी याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो. आतड्यांचे रोगातही हा उपकारक आहे.तुळशीच्या पानासारखेच, विषारी कीडा चावल्याच्या जागी हिची पाने चोळल्यास, कीडा चावल्यामुळे होणारी आग व कंड कमी होतो.या वनस्पतीचा स्वयंपाकातही वापर होतो.पाणीपुरी, कैरीची चटणी, जलजीरा आदींमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे.स्वयंपाकातील अन्य पदार्थांसाठीही याचा वापर होतो.भारतात, उन्हाळ्यात याचा वापर जास्त करण्यात येतो.
यातील एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे, याचा वापर साबण,त्वचेस लावावयाचे अवलेह, डोक्यास व शरीरास लावावयाची सुगंधी तैले, इत्यादींमध्ये विपुल प्रमाणात करण्यात येतो.